पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने देशभरात अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एनसीबीच्या 38 पथकांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांतील 38 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.
समाजमाध्यमावर ‘एक्स’ पोस्ट करत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली. 23 ऑक्टोबरला सरकारी यंत्रणांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांतील 38 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले. या कारवाईत 100 कोटी रुपयांचे हवाला व्यवहार उघड झाले. 1,424 बँक खाती गोठवण्यात आली, तर 17.82 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. याशिवाय, 500 डिटोनेटर्स आणि 12 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, 18 जणांना अटक करण्यात आली असल्याचे शाह यांनी सांगितले.
हे तस्करीचे जाळे ‘डेथ ट्रँगल कॉरिडॉर’ या अंमली पदार्थ तस्करीचा ‘त्रिकोणी मार्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाचा वापर करून भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमा ओलांडून पसरले होते. 31 डिसेंबर 2029पर्यंत अंमली पदार्थांची तस्करी करणारे प्रत्येक जाळे पूर्णपणे नष्ट करण्याचा भारताचा ठाम निर्धार आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत भारताची कारवाई सुरूच राहील. या मोहिमेत सहभागी केंद्रीय यंत्रणा, तसेच आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तिन्ही राज्यांच्या पोलीस दलांतील अंमली पदार्थविरोधी पथकांचे, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कौतुक केले आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) 23 ऑक्टोबरच्या पहाटे “ऑपरेशन ट्रायडंट” मोहीम राबवली. अनेक संस्थांच्या समन्वयाचे एक विशेष उदाहरण ठरलेल्या या मोहिमेत, एनसीबीने मिझोराम पोलीस आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्याशी समन्वय साधून एकाचवेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या एका मोठ्या अंमली पदार्थ तस्कर टोळीची कार्यप्रणाली आणि आर्थिक कणा उद्ध्वस्त करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता. मिझोराममधील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या साथीदारांना लक्ष्य करण्यासाठी गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि कार्यात्मक नियोजनातील संस्थात्मक एकजुटीमध्ये ‘ऑपरेशन ट्रायडंट’ मोहीम आदर्श ठरली. केंद्रीय आणि राज्य सक्तवसुली संस्थांमध्ये अनेक दिवस गुप्त माहितीचे एकत्रिकरण, संयुक्त लक्ष्यनिश्चिती आणि उच्चस्तरीय सामरिक बैठकांनंतर या मोहीमेची आखणी करण्यात आली.
या टोळ्यांची रसद पुरवठायंत्रणा आणि अवैध आर्थिक मार्गांवर एकाचवेळी हल्ला करण्यासाठी ही मोहीम अत्यंत काळजीपूर्वक आखण्यात आली होती. एकात्मिक आदेश प्रणालीअंतर्गत अत्यंत अचूक कारवाई करत, ईशान्येकडील आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये पसरलेल्या 38 पूर्वनिश्चित ठिकाणी 38 बहुसंस्थात्मक संयुक्त पथके एकाचवेळी तैनात करण्यात आली. या समन्वित कारवाईत प्रमुख शहरी केंद्रे आणि संवेदनशील सीमावर्ती मार्गांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यात मिझोराममधले आयझॉल, चंफई आणि भारत-म्यानमार सीमेवरील मोक्याचे व्यापारी शहर झोखावथर यांचा समावेश होता. यासोबतच मणिपूरमधले चुराचंदपूर आणि आसाममधला कतार जिल्हा आणि तेथील संक्रमण मार्गावरील संबंधित तस्करी टोळ्यांची कार्यस्थळे यांचा समावेश होता. कार्यचालन तळही होते. दूर्गम भूप्रदेश आणि विशाल भौगोलिक विस्तार असूनही, अपवादात्मक आंतरविभागीय समन्वयामुळे सर्व शोधमोहीम, चौकशी आणि आर्थिक लेखापरीक्षण एकाचवेळी पार पाडण्यात आले. त्यामुळे संशयितांना पळून जाण्यापासून किंवा अवैध मालमत्ता लपवण्यापासून रोखता आले.
या मोहिमेतून मिळालेल्या यशानंतर करण्यात आलेल्या सविस्तर आर्थिक विश्लेषणातून आणि डिजिटल न्याय सहाय्यक तपासणीतून या तस्करीच्या जाळ्याला मदत करणारे मध्यस्थ, बनावट कंपन्या आणि पैशांची वाहतूक करणाऱ्यांचे एक मोठे जाळे उघडकीस आले. हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन ट्रायडंट’अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आणि समन्वित कारवाई करण्यात आली. ही कारवाई केंद्र सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ म्हणजेच अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारांविरोधात कोणतीही तडजोड न करण्याच्या धोरणाचा भाग आहे. केवळ अंमली पदार्थ जप्त करणे, एवढाच या मोहिमेचा उद्देश नाही, तर त्यांची तस्करी करणाऱ्या संपूर्ण टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे, हाही यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. या तीन राज्यांमध्ये सीमापार अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आता केवळ अंमली पदार्थ जप्त करण्याऐवजी तस्करीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी या टोळ्यांना पैसा पुरवणारे व्यवहार आणि आर्थिक साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या तस्करीच्या टोळ्यांचे जाळे मुळापासून नष्ट करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

