Homeचिट चॅट'अस्मिता मराठीची गौरव...

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांनी गौरवोद्गार काढले.

जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या प्रा. नयना रेगे यांनी आपला पुरस्कार जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांना तर तालतपस्वी श्रीपाद राजगुरु यांनी आपला पुरस्कार गुरु पंडित सुरेश तळवलकर आणि तमाम रसिक श्रोत्यांना अर्पण केला. प्रदीप मालणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक राजू देसाई, साहित्यिक रवि मल्ल्या, अभिनेते अनिल गवस, क्रिकेट प्रशिक्षक शेखर वराडकर, प्रा. नयना रेगे, शिवसेनेच्या मानवतावादी कार्यावर पीएचडी करणाऱ्या प्रा. डॉ. सरिता वाकोडे, कवी विजय तारी, श्रीपाद राजगुरु, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण पारदळे यांचा गौरव ओडिसी नृत्यगुरू शुभदा वराडकर, प्रदीप मालणकर, स्वाती मालणकर, मंजिरी शेटे, जान्हवी गुजराथी, प्रणिता कोळथरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या सर्व प्रतिभावंतांचा परिचय ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून रंगमंचावर उभारण्यात आलेल्या पडद्यावर करुन देण्यात आला. मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड, झी गौरव, मटा सन्मान असे डोळ्यांचे पारणे फिटेल असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अशाच किंबहुना त्याहीपेक्षा सुंदर सोहळा हा प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा असल्याचे अनिल गवस यांनी यावेळी सांगितले. शुभदा वराडकर यांनी आपल्याला मिळालेला सन्मान हा माझ्या माहेरचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगून अशा सोहळ्यांतूनच समाजातील खरे प्रतिभावंत समोर येत असतात असे स्पष्ट केले. प्रारंभी प्रख्यात गायिका रश्मी मुळे यांनी स्वा. वि. दा. सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सादर केली. याच पार्श्वभूमीवर तुतारी आणि गारद यांच्या निनादात राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील अपरिचित साम्राज्याचा इतिहास सादर करुन उपस्थितांना शिवकाळात नेले. प्रदीप मालणकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. दहा प्रतिभावंतांवर मंत्रोच्चारात पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रख्यात गायिका संगीता मिरकर यांच्या सुमधुर आवाजातील पसायदानाने देवदुर्लभ सोहोळ्याची सांगता झाली. आहुतिचे संपादक गिरीश त्रिवेदी, कार्यकारी संपादक मनीषा त्रिवेदी, निवड समिती सदस्या भक्ती सावंत आदी मान्यवरांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये यांनी सूत्रसंचालन केले.

Continue reading

रौनक, तन्मय, दिनेश,अमृता ठरले बेंचप्रेस स्पर्धेचे विजेते

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड यांच्यातर्फे व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे दीपक पाटकरच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या क्लासिक व इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत रौनक जितेकर, तन्मय पाटील, दिनेश पवार आणि अमृता भगतने आपापल्या गटांत सर्वोतम लिफ्टरचा मान मिळवला. समस्त पाटकर कुटुंबियांच्या सौजन्याने...

विनय आपटेंच्या स्मृतीदिनानिमित्त लघुपट स्पर्धा

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे ह्यांच्या १3व्या स्मृतीदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे....

वसुबारस आणि भाऊबीज नाहीत दीपावलीचे भाग!

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला...
Skip to content