Homeटॉप स्टोरीनैना प्रकल्पात ५...

नैना प्रकल्पात ५ लाख रोजगार उच्च वेतनाचे!

नवी मुंबई विमानतळाच्या प्रभावाखालील अधिसूचित क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासातून म्हणजेच नैना प्रकल्पातून जवळजवळ १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनवले जाईल. आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले.

महाराष्ट्राच्या पनवेल तालुक्यातल्या शिरढोण येथे नैना प्रकल्पातल्या विकासकामांचे भूमिपूजन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी विकसित करण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पूल या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भूधारकांना मालमत्तापत्रकांचे वाटपही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, अतुल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रांत पाटील, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, पनवेलचे महापौर नितीन पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेश मेंगडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ विमानतळ नसून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. या नियोजनबद्ध विकासातून रोजगारनिर्मितीला अधिक प्रमाणात चालना देण्यात येत आहे. भूधारकांच्या हातात जमिनीशी संबंधित कागदपत्रे दिल्यानंतरच विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. भूधारकांचे प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

नैना क्षेत्राचा विकास वेगाने करणार – एकनाथ शिंदे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूमुळे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगड परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, हा परिसर महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येत आहे. विमानतळाला जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या लोकार्पणामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांशी जोडणी अधिक सक्षम होणार आहे. नैना क्षेत्रातील जमीनधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासशुल्क आणि बेटरमेंट चार्ज शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्री होल्डसंदर्भातील कार्यवाहीही अंतिम टप्प्यात आहे. जमीनधारकांना मालमत्तापत्रके वितरित केल्यामुळे त्यांच्या भूखंडांवरील मालकी हक्कांची अधिकृत नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन या विकासाचा पाया रचला, त्यांना या विकासाचा योग्य लाभ मिळालाच पाहिजे, हीच शासनाची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘नैना’च्या विकासातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी – सुनेत्रा पवार

नैना क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सक्षम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. नैना परिसरातील विकासकामे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. सुमारे ९५३ कोटी रुपये खर्चाच्या एसबीआर-९, बीआर-४ आणि बीआर-५ या महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण परिसरातून विमानतळाकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होणार आहे. सुमारे ५० कोटी रुपये खर्चाच्या उरण बायपासमुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होऊन स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांचा प्रवास सुलभ होणार आहे. उलवे कोस्टल रोड, अटल सेतू आणि इतर महत्वपूर्ण मार्गांच्या जोडणीमुळे या परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रकल्पाविषयी थोडेसे…

उरण बायपास ब्रिज – उरण शहरातील वाहतूककोंडी दूर करून प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सिडकोच्या वतीने नवी मुंबईतील द्रोणागिरी परिसरात हॉटेल आनंदी ते उरण शहरादरम्यान ५०.२६ कोटी रुपये खर्चून ११ मीटर रुंदीच्या बायपास पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ९४१ मीटर असून, त्यामध्ये ६४० मीटर लांबीचा पूल, १५३ मीटर लांबीचा पोहोच रस्ता आणि १४८ मीटर लांबीचा जोडरस्ता यांचा समावेश आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १.७५ मीटर रुंदीचे पदपथ असून, वाहनांसाठी ७.५ मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे उरण शहरातील वाहतूककोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे.

एसबीआर-९, बीआर-४ आणि बीआर-५ प्रकल्प – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी पूर्वेकडून जलद, सुलभ आणि अखंड वाहतूक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सिडकोच्या वतीने ९५३ कोटी रुपये खर्चाचा एसबीआर-९, बीआर-४ आणि बीआर-५ या तीन पुलांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पनवेल खाडी ओलांडून उभारण्यात आलेल्या पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण या भागांतून राष्ट्रीय महामार्ग ४बीमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, उलवे किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि अमरा मार्ग यांच्याशी पूर्वेकडून थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे. या पुलांची एकूण लांबी मध्यवर्ती २ हजार ५९३ मीटर असून, पुलाची एकूण रुंदी ६० मीटर आहे. पुलावर दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिकांचा मुख्य रस्ता आणि प्रत्येकी दोन मार्गिकांचे सेवा रस्ते उपलब्ध आहेत. तसेच, १०० मीटर व्यासाचे मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेट उभारण्यात आले आहे. विमानतळाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस उभारण्यात आलेल्या क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक प्रवाहाला चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

माहीम चौपाटीवर मुंबईतला सी फूड प्लाझा पुन्हा कार्यरत

मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतला पहिला सी फूड प्लाझा, माहीम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा कार्यरत झाला आहे. शनिवार, २४ ऑक्टोबरपासून माहीम सी फूड प्लाझा येथे महिला बचत गटांचे हे स्टॉल्स कार्यरत...

पालिकांमध्ये हवी ‘मेयर इन कौन्सिल’!

भारताची लोकसंख्या अनेक दशके वाढत राहील आणि 2060च्या सुमारास ती 165 कोटींवर स्थिर होईल. 2050पर्यंत भारताची जवळपास निम्मी लोकसंख्या शहरी भागात राहण्याची अपेक्षा असून सध्याची 50 कोटी असलेली शहरी लोकसंख्या वाढून ती 85 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शहरी लोकसंख्येच्या...

मोदी सरकारकडून ‘ऑपरेशन ट्रायडंट’ सुरू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने देशभरात अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एनसीबीच्या 38 पथकांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांतील...
Skip to content