Homeन्यूज ॲट अ ग्लांसराज्यात पाइप गॅसच्या...

राज्यात पाइप गॅसच्या जोडण्यांसाठी 31 मार्चपर्यंत विविध सवलती!

जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत 31 मार्च 2027पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या 24 तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि 24 तास काम करण्याची परवानगी देणे अशा सवलतींचा समावेश आहे.

राज्यातील स्वंयपाकाच्या गॅसच्या सुलभ वितरणासाठी पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) वितरणाला गती मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यातील सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) नेटवर्कचा जलद आणि वेगवान विस्तार करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने ईज ऑफ डुइंगअंतर्गत परवाने देणे सुलभ केले असून काही परवान्यांच्या शुल्कमाफीसह अनेक सवलती घोषित केल्या आहेत. गॅस कंपन्याना या सवलती यापूर्वी 30 जून 2026पर्यंत देण्यात आल्या होत्या. आता या सवलतींना मुदतवाढ देण्यात आली असून त्या 31 मार्च 2027पर्यंत लागू राहणार आहेत. यासंदर्भातील शासननिर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे.

इराण-अमेरिका तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने एलपीजी उपलब्धतेवर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्यांचा विस्तार गतीने करण्यासाठी नगरविकास विभागाने सर्व महापालिका व नगरपालिकांसाठी सूचना निर्गमित केल्या आहेत. शासनाच्या निर्णयानुसार, महानगरपालिका, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर प्राधिकरणांकडे पाइपलाइनसाठी प्रलंबित असलेल्या परवानग्या मंजूर झालेल्या (Deemed Approval) समजण्यात येणार आहेत. तसेच नव्या परवानग्या केवळ 24 तासांत मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, गॅस पाइपलाईन पुरवठ्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी तसेच विविध परवानग्यांसाठी राज्यशासन, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या ठिकाणी इंधनपुरवठा करणाऱ्या कंपन्या स्वतःच्या खर्चातून सार्वजनिक मालमत्ता पूर्ववत करू शकतील, त्यांना त्यासाठी परवानगी दिली जाणार असून आवश्यक हमीपत्र घेण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी कंपन्यांना स्वतःच्या खर्चाने सार्वजनिक मालमत्ता पूर्ववत करुन देणे शक्य नसेल त्या ठिकाणी केंद्र शासनामार्फत दिलेल्या अधिसूचनेमधील विहित शुल्क भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गॅस पुरवठादार कंपन्यांना कामासाठी 24 तास काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  राज्यभरातील विविध विभागांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांना महाराष्ट्रासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना घरगुती नैसर्गिक वायू सुविधा अधिक वेगाने उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा विस्तारालाही गती मिळणार आहे.

Continue reading

दहावीतल्या निधी पावसकरचाही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. दहावीत शिकणाऱ्या निधी पावसकर या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी नुकतीच सुपूर्द केली. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी...

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज चमकले!

महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर...

पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या उपस्थितीने रंगला ‘आशाताई आणि मी’!

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 'आशाताई आणि मी' हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब...
Skip to content