चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना – भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल ४५ अपक्ष आमदारांचा या शिवशाही सरकारला भरभक्कम पाठिंबा होता. त्यामुळे राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्याकडून परवानगी मिळविणे गरजेचे होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे मन वळविण्याचे महाकठीण काम मनोहर जोशी यांना करावे लागणार होते. वर्षा, या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळीच मुख्यमंत्री जोशी यांना भेटायला नाना पाटेकर आले. मंत्रालयात वृत्तांकन करण्यासाठी कार्यरत असल्याने मी वर्षा निवासस्थानी गेलो. तिथे नाना मनोहर जोशी यांना भेटून बाहेर पडले. आपल्या मोटारीत बसता बसता त्यांनी आमच्याबरोबर गप्पा मारल्या आणि “सुरेशभाईंना (कलमाडी) राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून जोशी सरांना भेटायला आलो. मी जोशीसरांचा लाडका विद्यार्थी. त्यामुळे मी वर्षावर आलो. आता जोशी सर माननीय बाळासाहेबांबरोबर चर्चा करुन निर्णय घेतील”, असे पाटेकर यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात चर्चा होऊन तसेच ठाकरे, जोशी आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना भाजपा युतीचा पाठिंबा सुरेश कलमाडी यांना जाहीर केला. कलमाडींनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. एका पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांनी कलमाडी यांच्यासमोरच “उद्या हा बेडूक पटकन उडी मारुन पलिकडे गेला तर काय घ्या”, अशी कोपरखळी मारली होती. नाना पाटेकर यांनी केलेली रदबदली फळाला आली होती.

नाना पाटेकर अतिशय अघळपघळ बोलणारा खरा माणूस. जे मनात असेल ते परखडपणे बोलणारा. खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करणारा. जमिनीशी नाळ जोडलेला माणूस. परखड स्वभावामुळे अनेकदा त्यांना अडचणीत यावे लागले. एकदा असेच भाषेवर बोलताना त्यांनी परखडपणे भूमिका मांडली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी, “नाना, तुझ्यातील अभिनेता म्हणून आम्हाला निश्चितच तुझा आदर आहे. परंतु तू राजकारणात पडू नकोस. नको तिथे नाक खुपसू नकोस”, अशा शब्दांत सुनावले होते. अर्थात नाना आणि बाळासाहेब यांच्यात एकमेकांबद्दल निरतिशय प्रेम होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासमवेत नानांचे घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय कार्यक्रमात नाना पाटेकर परखडपणे नेत्यांना, “तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत “, असे खडे बोल सुनवायला मागे पुढे पाहत नसत. नटसम्राट म्हणून नाना पाटेकर हे खऱ्या अर्थाने नटसम्राट होते. सामाजिक कार्य, शेतकरी, पाणी प्रश्न हे नानांचे जिव्हाळ्याचे विषय. त्यातूनच मकरंद अनासपुरे यांना सोबत घेऊन नाम फौंडेशनच्या माध्यमातून प्रचंड मोठे कार्य नानांनी उभे केले. नानांबद्दल भरभरून लिहिण्याएवढा मी मोठा नाही. वर्षा निवासस्थानी असो की यशवंतराव चव्हाण केंद्र, नानांना भेटण्याची, गप्पा मारण्याची संधी अनेकदा मिळाली. एक माणूस म्हणून ते निश्चितच मोठे होते. तूर्त इतकेच!
(लेखक योगेश वसंत त्रिवेदी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- ९८९२९३५३२१)

