पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे भक्त आणि पर्यटकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होईल.
‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल केंद्र आहे. हे शहर अनेक प्रतिष्ठित संस्था, संशोधन केंद्रे आणि औद्योगिक क्षेत्रांचे माहेरघर आहे. देशभरातले विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या शहराकडे आकर्षित होतात. शनिवारवाडा आणि आगा खान पॅलेस यांसारखी महत्त्वाची ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, लोणावळा आणि महाबळेश्वर यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांशी असलेली जवळीक यामुळेही पुण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेले शिर्डी भारतातले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे श्री साईबाबांचे समाधीस्थळ आहे. या पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांची सेवा करण्याकरीता साईनगर शिर्डी रेल्वेस्थानक वर्षभर सेवा देते. पुण्यापासून सुरू होणाऱ्या या नवीन थेट रेल्वेसेवेमुळे भाविकांची मोठी सोय होईल. या भागातल्या धार्मिक पर्यटनाला अधिक चालना मिळेल.
ही पुणे आणि शिर्डीदरम्यानची पहिली थेट रेल्वेसेवा असेल. ही सेवा साईबाबांच्या मंदिराला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी, ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि समूहाने प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित, परवडणारी आणि आरामदायी प्रवासाची असेल. या रेल्वेमुळे अहिल्यानगर आणि शिर्डीतल्या रहिवाशांना पुण्यातल्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे शिर्डी परिसरातल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

प्रमुख थांबे आणि त्यांचे महत्त्व–
दौंड कॉर्ड केबिन- पुणे-दौंड मार्ग आणि उत्तरेकडे जाणाऱ्या दौंड-मनमाड मार्ग यांच्यादरम्यान स्थानिक प्रवाशांसाठी अखंड आणि जलद दळणवळण सुविधा उपलब्ध करून देते.
श्रीगोंदा- स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी परवडणारी व जलद दळणवळण सुविधा पुरवते.
अहिल्यानगर- हे एक प्रमुख प्रशासकीय, लष्करी आणि व्यापारी केंद्र आहे. येथे दररोज हजारो प्रवासी, नोकरदार आणि संरक्षण दलातील कर्मचारी ये-जा करतात.
राहुरी- हे एक नामांकित शैक्षणिक आणि कृषी केंद्र असून, येथे राज्याचे सर्वात मोठे कृषी विद्यापीठ आहे. या थांब्यामुळे विद्यापीठात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना, शास्त्रज्ञांना आणि स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
बेलापूर- येथे या भागातील काही प्रमुख साखर कारखाने आहेत आणि हे प्रसिद्ध ‘शनि शिंगणापूर’ मंदिराकडे जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

