Homeन्यूज ॲट अ ग्लांस१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने...

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्याक्रम पार पडला. विमानतळाच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाणात एक अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ज्या स्थानिक शेतकऱ्यांनी विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी आपल्या पूर्वजांची जमीन दिली, अशा १७२ शेतकऱ्यांना या पहिल्या विमानाने प्रवास करण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये २० महिलांचा समावेश होता. हे शेतकरी या पहिल्या ऐतिहासिक विमानाने लखनऊला रवाना झाले, जिथे त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

पहिले आगमन: लखनऊच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ७:१२ वाजता उड्डाण केलेले इंडिगोचे विमान सकाळी ७:५८ वाजता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरले. हे विमान नोएडावरून पुढे बेंगळुरूकडे रवाना झाले. इंडिगोपाठोपाठ अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेसदेखील या विमानतळावरून आपली सेवा सुरू करणार आहेत. या विमानतळामुळे दिल्ली-एनसीआर क्षेत्राला दुसरे मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. २८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. सर्व आवश्यक परवानग्या आणि चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, आजपासून हे विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे.

  • ठळक मुद्दे:
  • पहिले विमान: लखनऊहून आलेले इंडिगोचे विमान सकाळी ७:५५ वाजता जेवर येथे उतरले, ज्याचे जलतर्पण (Water Cannon Salute) करून जंगी स्वागत करण्यात आले.
  • कार्गो सेवा: प्रवासी वाहतुकीपाठोपाठ, १७ जूनपासून या विमानतळावरून देशांतर्गत मार्गावर पहिली मालवाहू (Cargo) विमान सेवा सुरू होणार आहे.
  • प्रवासी क्षमता: पहिल्या टप्प्यात हे विमानतळ वार्षिक १ कोटी २० लाख (12 Million) प्रवाशांना सेवा देण्यास सक्षम आहे. भविष्यात सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर ही क्षमता ७ कोटींवर जाईल.
  • गुंतवणूक आणि मॉडेल: पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ११,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, हे विमानतळ सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर ‘झ्युरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल एजी’च्या उपकंपनीद्वारे विकसित करण्यात आले आहे.
  • देशातील सर्वात मोठे विमानतळः जेवर विमानतळ हे उत्तर प्रदेशातील पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ते भारतातील सर्वात मोठे विमानतळ ठरेल. ३,९०० मीटर लांबीची धावपट्टी असलेल्या या विमानतळावर आधुनिक ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) बसवण्यात आली आहे, ज्यामुळे हिवाळ्यात दाट धुक्यातही विमानांचे लँडिंग सहज शक्य होईल.
  • संस्कृती आणि पर्यावरणाचा मेळः या विमानतळाच्या टर्मिनलची रचना भारतीय संस्कृतीवर आधारित आहे. यामध्ये वाराणसी आणि हरिद्वारच्या प्रसिद्ध घाटांची झलक, तसेच पारंपरिक ‘हवेली’ शैलीतील अंगण पाहायला मिळते. यासोबतच, हे विमानतळ ‘नेट-झिरो’ उत्सर्जन (Net-Zero Emissions) उद्दिष्टासह पर्यावरणपूरक पद्धतीने डिझाइन केले गेले आहे. या विमानतळामुळे नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, आग्रा आणि मथुरा या शहरांमधील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, शिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) प्रवाशांचा ताण कमालीचा कमी होईल. विमानांचे उड्डाण सुरू झाल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
  • कनेक्टिव्हिटीचा महाजालः जेवार विमानतळ केवळ विमानानेच नव्हे, तर रस्ते आणि रेल्वे मार्गानेही उत्तम रित्या जोडले जात आहे.
  • १. यमुना एक्सप्रेसवे: विमानतळ थेट यमुना एक्सप्रेसवेला जोडले गेले आहे, ज्यामुळे आग्रा आणि मथुरेकडून येणाऱ्या प्रवाशांना थेट प्रवेश मिळेल.
  • २. मेट्रो आणि हाय-स्पीड रेल: दिल्ली आणि ग्रेटर नोएडा दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचा विस्तार थेट विमानतळापर्यंत केला जात आहे. तसेच, भविष्यात बुलेट ट्रेनचे स्टेशनही येथे प्रस्तावित आहे.
  • ३. पॉड टॅक्सी (Pod Taxi): फिल्म सिटी आणि जेवार विमानतळादरम्यान भारतातील पहिली अत्याधुनिक ‘पॉड टॅक्सी’ सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...

अमेरिकी कोर्टाचा ट्रम्पना झटका! भारतीय कर्मचारी-विद्यार्थ्यांना दिलासा!!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाला अमेरिकन न्यायालयाने एक मोठा दणका दिला आहे. एच१-बी व्हिसावर नव्याने लावण्यात आलेली तब्बल १ लाख डॉलरची (सुमारे ९५ लाख रुपये) भक्कम फी 'बेकायदेशीर कर' असल्याचे सांगत बोस्टन येथील फेडरल कोर्टाने नुकतीच ती...
Skip to content