Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे पालिकेच्या गावदेवी...

ठाणे पालिकेच्या गावदेवी मार्केटला ना ओसी, ना योग्य अग्नीसुरक्षा!

ठाणे शहरातील महापालिकेच्या गावदेवी मार्केटला आग लागून सर्व मार्केट आगीत भस्मसात झाल्याला आज आठवडा झाला असूनही मार्केट सफाईचे काम अत्यंत हळू सुरु असल्याबाबत गाळेधारकांनी संताप व्यक्त केला आहे. यांत्रिक झाडू वा आधुनिक पद्धतीने सफाई न करता बाबा आदमच्या काळाप्रमाणे हातानेच सफाई करून मोठ्या शिटवर कचरा गोळा करून तो मार्केटच्या दरवाजासमोर फेकला जात असल्याचे मी स्वतः पाहिले आहे. अशाप्रकारे हाताने सफाई करायचे ठरवले असल्यास ही सफाई होण्यास अजून १५ दिवसही पुरणार नाहीत, असे त्या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

इमारतीला ओसीच नाही!

गावदेवी मार्केट ज्या इमारतीत आहे ती इमारत ठाणे महापालिकेची असूनही तिला अधिवास प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या इमारतीतील अग्निशमन यंत्रणेचेही लेखापरीक्षण झाले होते. (फार पूर्वी) या परीक्षणात अनेक त्रुटी आढलेल्या होत्या. या त्रुटीकडें ना प्रशासनाने लक्ष दिले, ना लोकप्रतिनिधीनी! साहजिकच या मार्केटचा कारभारही ‘आओ जाओ घर तुम्हारा..’ पद्धतीने चालवला जात होता, असे आता दबक्या स्वरात बोलले जात आहे. पालिकेच्या या इमारतीच्या बेसमेंटमध्ये वाहनतळ आहे. लिफ्ट आहे. असे असूनही अग्नीसुरक्षेकडे पालिकेनेच अक्षम्य दुर्लक्ष करणे म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणाच आहे. पर्यायाने याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी विरोधकांची मागणी आहे.

मूळ आराखड्याचा पत्ताच नाही!

या मार्केटचा मूळ आराखडा शोधण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु मुख्य कार्यालय ते प्रभाग समिती कार्यालय, ते अगदी बांधकाम कार्यालयापर्यंत विचारणा करूनही सर्वांनी ‘नन्ना’चाच पाढा वाचला. हाती आलेल्या माहितीनुसार, सुमारे ११ वर्षांपूर्वी ही इमारत अस्तित्त्वात येण्याअगोदर येथे एखाद्या गावमार्केटप्रमाणे जुन्या जमान्यातील बाजार भरत असे. याला लागूनच डॉ. बेडेकर यांच्या मालकीची छोटीशी बाग हॊती. मार्केटच्या इमारतीची चर्चा सुरु झाल्यानंतर डॉक्टरांनी स्वेच्छेने ती जागा पालिकेला दिली. हे झाल्यानंतर मूळ आराखडा तयार करण्यात आला. मूळ योजनेनुसार तळाला असलेल्या या मार्केटमध्ये जेमतेम ७०/७५ गाळेच ठरवण्यात आले होते. नंतर चर्चेअंती स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समझोता होऊन ८० गाळे बांधण्यात (ओटे) परवानगी देण्यात आली. मात्र ८०वरून या गाळ्यांची संख्या वाढता वाढता वाढून १५५ झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

चमकोंनी बाईक्स आणल्या

हे मार्केट भाजीपाला व फळ मार्केट असे संबोधले जात असले तरी यात मोठ्या प्रमाणात घुुसखोरी झाल्याचे प्रथमदर्शनीच दिसून येत आहे. हस्तानंतर झालेल्या गाळ्यामध्येही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. गाळेधारकांनीही पैसे चारून हळूहळू आपल्या गाळ्यांचा विस्तार केलेला दिसतो. महापालिका प्रशासनाचा वचक शून्यापर्यंत खाली आल्याने पैसे गाठीला आलेल्या गाळेधारकांच्या काही ‘चमको’ पोरांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या गाळ्याशेजारीच महागड्या बाईक्स मार्केटमध्ये आणण्यास सुरुवात केली होती. बाईक्स मार्केटमध्ये चढण्या-उतरण्यासाठी उतारही मुद्दाम तयार करवून घेतल्याचे दिसून येत आहे. संतापाची बाब म्हणजे याच इमारतीत वाहनतळ असूनही केवळ शायनिंगसाठी बाईक्स गाळ्याशेजारी उभी करणे हा गुन्हा ठरवून मोठा दंड वसूल केला जावा अशी जनतेची मागणी आहे.

आठवडा जाईलच सफाईत!

अजून चारपाच दिवस सफाईत जातीलच. नंतर कीटकनाशक फवारणी होईल. नंतर तात्पुरता व्हाईट वॉश मारला जाईल. विजेची जोडणी येण्यास किमान महिना जाईलच. ज्यांना गावदेवी मैदानात जायचे नाही अशा गाळेधारकांना पेट्रोमॅक्सचे दिवे (अथवा कंदील) वापरण्याची परवानगी देण्याबाबत उच्च पातळीवर विचारविनिमय सुरु असल्याचे समजले. “Small business bring cities to life” हे तत्त्व उराशी बाळगून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर व पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन गाळेधारकांच्या समस्या सोडवाव्यात. मात्र, कुठल्याही परिस्थितीत कपडेवाल्यांना मार्केटमध्ये स्थान देऊ नये, अशी ठाणेकरांचीच मागणी आहे. त्यांनी जास्तच हट्ट केला तर त्यांचे हस्तातांतरणच रद्द करून टाकावे. तेव्हाच अशी मंडळी ताळ्यावर येतील.

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

गावदेवी मार्केटची आग संशयाच्या भोवऱ्यात!

दोन दिवसांपूर्वीच आमचे वकीलमित्र गणेश सोवनी यांनी सव्वा सात वाजता पाठवलेला एक मेसेज पाहून मी हादरलोच! मेसेज छायाचित्रासह असल्याने त्याचे गांभीर्य लगेचच लक्षात आले व सकाळची सर्व कामे आटोपल्यावर ठाण्यातीलच गावदेवी मार्केट परिसरात जाण्याचे पक्के केले. वकीलसाहेबांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये...

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...
Skip to content