महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे उत्तर प्रदेशशी जोडणाऱ्या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. दररोज धावणारी बनारस-हडपसर (पुणे) आणि आठवड्यातून एकदा धावणारी अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) यांचा यात समावेश आहे. भारताच्या मुख्य सांस्कृतिक आणि वित्तीय मार्गिकांना परस्परांशी जोडणाऱ्या, या गाड्या, भविक आणि कामगारवर्गासाठीही प्रवासाच्या सुखकर सुविधा उपलब्ध करून देतील. सर्वसामान्य व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या अमृत भारत गाड्यांमध्ये, आरामदायी प्रवास, सुविधा आणि परवडणारे दर यांचा मिलाफ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, म्हणजेच 28 एप्रिलला बनारस-हडपसर (पुणे) आणि अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
अल्प उत्पन्न आणि मध्यम वर्गाच्या कुटुंबांसाठी, विशेषतः चालवण्यात येणाऱ्या, ह्या अमृत भारत गाड्या पूर्णपणे बिगर-वातानुकूलित, अत्याधुनिक सेवा असलेल्या आणि सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सुविधांवर भर देणाऱ्या आहेत. या गाड्यांमध्ये सामान्य आणि सामान्य शयन श्रेणीचे डबे असून, त्यात खानपान सेवा आणि दिव्यांगस्नेही सुविधाही आहेत. नव्या प्रकारच्या आसन आणि शयनव्यवस्था वंदे भारत स्लीपरपासून प्रेरणा घेऊन करण्यात आल्या आहेत. त्यात धक्के लागू नयेत असे सेमी-स्वयंचलित कपलर्स आणि अपघाताच्या वेळी सुरक्षा देणारी उच्च सुरक्षा मानके यांचा समावेश आहे. या गाड्या सीसीटीव्ही देखरेखीखालीही असतील. त्या आपत्कालीन टॉक-बॅक प्रणाली, एरोसोलआधारित अग्निशमनव्यवस्था आणि पूर्णतः सीलबंद गँगवे यांसारख्या आधुनिक सुविधांनीही त्या सुसज्ज आहेत.
बनारस-हडपसर(पुणे) गाडीमुळे, काशी विश्वनाथ धामला जाण्याची सोय होऊ शकेल, तर अयोध्या-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी, श्री राममंदिर तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. या गाड्यांमुळे महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणे शक्य होईल. विशेषतः दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित मंजूर आणि महाराष्ट्र व उत्तर प्रदेशदरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना या गाड्यांचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. थेट संपर्कामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि गाड्या बदलण्याची गरजही उरणार नाही.

बनारस -हडपसर (पुणे) अमृत भारत एक्सप्रेस
जगातल्या सर्वात प्राचीन, कालातीत आध्यात्मनगरी, संस्कृती आणि परंपरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या बनारसपासून ही गाडी सुरू होईल. काशी म्हणून पूजनीय असलेल्या या शहरात, पवित्र काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा घाट अनेक भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या शहरात, अध्यात्माची अनुभूती गंगेच्या प्रवाहाइतकीच खोल असते, असे म्हणतात. पुण्याशी थेट आणि परवडणारी संपर्कसेवा उपलब्ध झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांसाठी नवीन बाजारपेठा खुल्या होतील, तसेच स्थलांतरित कामगारांचा प्रवास अधिक सुलभ होईल. हडपसर, हे या मार्गाचे शेवटचे स्थानक आहे. पुणे शहराचे हे एक उपनगर आहे. हे महाराष्ट्रातले एक मोठे शैक्षणिक केंद्र असून, सांस्कृतिक आणि कला राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे.
जेव्हा ही गाडी बनारस सोडून पश्चिमेकडे निघते तेव्हा प्रवासाच्या सुरुवातीच्या थांब्यांपैकी एक प्रयागराज आहे. हे शहर त्रिवेणी संगम आणि कुंभमेळ्याचे स्थान आहे. अलाहाबाद विद्यापीठासारख्या संस्था असलेले एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. पुण्याप्रमाणेच अलाहाबादही आयटी आणि उत्पादन केंद्र आहे. त्यामुळे या जोडणीचा थेट फायदा महाराष्ट्रात संधी शोधणाऱ्या अलाहाबादमधल्या विद्यार्थी आणि व्यावसायिकवर्गाला होईल. बुंदेलखंडच्या मध्यवर्ती भागातून पुढे ही गाडी झाशीला पोहोचते. ओरछा आणि खजुराहो यांचा समावेश असलेल्या भारतातल्या सर्वात प्रसिद्ध पर्यटन मार्गांपैकी एकाचे झाशी हे प्रवेशद्वार आहे. मध्य प्रदेशात भोपाळमार्गे ती इटारसी आणि नर्मदापुरममधून जाते. हा भाग एकत्रितपणे मध्य प्रदेशातील सर्वात उत्पादक कृषी पट्ट्यांपैकी एक आहे. या क्षेत्रामध्ये गहू, सोयाबीन आणि कडधान्ये पिकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना महाराष्ट्राच्या घाऊक बाजारपेठांमध्ये जलद आणि स्वस्त प्रवेश मिळू शकेल. यामुळे उत्पादनाच्या वाहतूकखर्चात लक्षणीय घट अपेक्षित आहे.
पुढे, ही गाडी भारताची ‘केळीची राजधानी’ म्हणून ओळखले जाणाऱ्या जळगाव स्थानकात येते. पुण्याला थेट मार्ग मिळाल्यामुळे तेथील कृषी व्यापाऱ्यांना अधिक कार्यक्षम बाजारपेठ उपलब्ध होईल. भुसावळ, हे एक प्रमुख रेल्वे जंक्शन आणि मोठ्या औष्णिक वीज प्रकल्पाचे ठिकाण आहे, तेथील मोठ्या कामगारवर्गासाठी यामुळे सुधारित प्रवासी संपर्कमार्ग मिळेल. पुढे ही गाडी मनमाड आणि कोपरगावमार्गे पुण्याला जात असल्यामुळे शिर्डीला जाण्यासाठी (श्री साईबाबांचे तीर्थक्षेत्र) उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील यात्रेकरूंना अधिक थेट आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे स्थानिक धार्मिक पर्यटन अर्थव्यवस्थेला भरीव चालना मिळेल. बनारस–हडपसर (पुणे) अमृत भारत एक्सप्रेसचा प्रवास बनारसहून सायंकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा हडपसर (पुणे) येथे समाप्त होईल. हा प्रवास पूर्ण करण्यास सुमारे 30 तास लागतील आणि ही गाडी 18 ठिकाणी थांबेल.

अयोध्या-मुंबई (एलटीटी) अमृत भारत एक्सप्रेस
अयोध्या हे देशातले सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी आणि पर्यटनस्थळांपैकी एक आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लाखो स्थलांतरितांचे घर आहे. या समुदायाचे आपल्या गावांसोबतच भावनिक नात्यासोबतच आर्थिक नातेही आहे. अशा परिस्थितीत, मुंबईतील लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या आणि उत्तर भारतीयांसाठी उतरण्याचे मुख्य ठिकाण असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत थेट आणि परवडणाऱ्या तिकीट दरातील अमृत भारत एक्स्प्रेस सुरू होणे प्रवाशांकरीता पर्वणी ठरेल. ही गाडी दोन शहरांना जोडण्यासोबतच कष्टकरी समुदायाला, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली त्यांची हक्काची सुविधा मिळवून देणारी ठरेल. ही रेल्वे संध्याकाळी अयोध्या कँट येथून सुटेल. सुलतानपूर आणि प्रतापगड हे या प्रवासातील सुरुवातीचे प्रमुख थांबे असतील. प्रयागराजनंतर ही गाडी मध्य प्रदेशात प्रवेश करेल आणि जबलपूरला पोहोचेल. जबलपूरनंतर इटारसी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन ओलांडून ही रेल्वे महाराष्ट्रात प्रवेश करेल.
पुढे ती महाराष्ट्रातले भुसावळ आणि जळगावमार्गे नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत येईल. हा भाग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रासाठी आणि इथल्या समृद्ध वाइन उद्योगासाठी ओळखला जातो. त्यानंतर ही रेल्वेगाडी मुंबईच्या उपनगरीय पट्ट्यातील महत्त्वाच्या असलेल्या कल्याण आणि ठाणे स्थानकामार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वे गाडीचा उद्घाटनीय प्रवास अयोध्या कँट इथून संध्याकाळी सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उशिरा ही गाडी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस इथे पोहोचेल. साधारणपणे 28 तासांत ही रेल्वे आपला प्रवास पूर्ण करेल. या प्रवासात ही गाडी महत्त्वाचे 12 थांबे घेईल.
या दोन नवीन रेल्वेगाड्यांची सेवा सुरु झाल्यानंतर देशातल्या अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्याची संख्या 66वर पोहोचेल.

