अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीत काल रात्री वॉशिंग्टन डीसीच्या हॉटेल हिल्टनमध्ये एका अज्ञात व्यक्तीने गोळीबाराचा प्रयत्न केला. या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. ट्रम्प यांच्या सुरक्षारक्षकांनी (सिक्रेट सर्व्हिस) हल्लेखोराला पकडले. या हल्ल्यात सिक्रेट एजंटच्या बुलेटप्रुफ जाकीटात एक गोळी घुसली. या हल्लेखोराला ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याचे कपडे काढून त्याला प्लॅस्टिकच्या एका चादरीखाली घेऊन त्याने स्वतःभोवती बॉम्ब तर गुंडाळला नाही ना, याची तपासणी केली. हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा निवासी असून तो ३० वर्षांचा असल्याचे कळते. त्याचे नाव कोल थॉमस एलन असल्याचे सांगितले गेले आहे. या साऱ्या घटनेबद्दल थोड्याच वेळेत स्वतः ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी फार चांगले काम केले. माझा जीव वाचवला. माझ्या मंत्रिमंडळातले सर्व सदस्य सुरक्षित आहेत. हा संविधानावर हल्ला आहे, असे ट्रम्प म्हणाले. या हल्लेखोराचा फोटोही त्यांनी समाजमाध्यमावर टाकला आहे.

काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकारांसाठी हॉटेल हिल्टनमध्ये दरवर्षीप्रमाणे रात्रभोजचे (डिनर) आयोजन केले होते. याकरीता ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलेनिया आणि उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातले सदस्य उपस्थित होते. संपूर्ण हॉटेलला सुरक्षाकवच होते. हे सुरक्षाकवच भेदत हल्लेखोर हॉटेलच्या लॉबीत घुसला. हॉलमध्ये असलेल्या ट्रम्पवर गोळी झाडण्यासाठी त्याने पोझिशन घेतली. तेव्हा सुरक्षारक्षकांच्या ध्यानात सारा प्रकार आला आणि त्यांनी हल्लेखोरावर गोळीबार करत त्याला ताब्यात घेतला. यावेळी आरोपी आणि सुरक्षारक्षक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत एका रक्षकाच्या बुलेटप्रुफ जाकीटात एक गोळी घुसली. पण, हल्लेखोराला पकडण्यात त्यांना यश आले. या सर्व घडामोडी चालू असतानाच सुरक्षारक्षकांनी ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलेनिया आणि उपराष्ट्रपती व्हॅन्स यांना व्यासपीठावर जाऊन हॉटेलमधून सुरक्षित बाहेर काढले.

त्यावेळी हॉटेलमध्ये संगीत सुरू होते. ट्रम्प संबोधनासाठी व्यासपीठावर बसले असतानाच सुरक्षारक्षकांनी व्यासपीठावर जाऊन त्यांना गोळीबाराची घटना सांगितली. त्यानंतर लगेच संगीत थांबवून रक्षकांनी हॉलमध्ये हल्लेखोर घुसल्याचे जाहीर केले. त्याबरोबर उपस्थितांनी टेबलांखाली बसत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर एकच होता आणि त्याला ट्रम्प हजर असलेल्या हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. यामुळे पुढचा अनर्थ टळला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई सुरू केल्यापासून अमेरिकेतली जनता ट्रम्प यांच्या कारभाराला दिवसेंदिवस कंटाळू लागली आहे. तेथील सर्वसामान्याच्या खिशाला याची झळ बसू लागली. अमेरिकेत पेट्रोलचे दर दुप्पट झाले आहेत. जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर भर देत निवडणुकीत निवडून आलेले ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून एकेका राष्ट्रांवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. इराणवरील हल्ल्याआधी अमेरिकेच्या लष्करी कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना उचलून अमेरिकेत आणले गेले. आजही ते अमेरिकेच्या ताब्यात बंदीवासात आहेत. इराणवरील हल्ल्यानंतर आपण क्युबाकडे लक्ष देणार असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. याआधी त्यांनी युरोपीय देशांच्या समुहातल्या ग्रीनलॅण्डला ताब्यात घेण्याचाही प्रयत्न चालवला होता. ट्रम्प यांच्या या हव्यासापोटी अमेरिकेतली जनता वैतागली असून ट्रम्पविरोधातला रोष दिवसेंदिवस वाढत असल्याचे बोलले जाते.


