सायप्रस येथे झालेल्या बुद्धिबळ विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या कॅडिडेट्स बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या २४ वर्षीय रमेशबाबू वैशालीने जेतेपदावर विजयाची मोहर उमटवून कमाल केली. भारतासाठी ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली महिला बुद्धिबळ खेळाडू ठरली. त्यामुळे तिच्या या ऐतिहासिक विजेतेपदाला एक वेगळीच किनार आहे. आता या विजेतेपदामुळे वैशालीला विश्वविजेतेपद मिळवण्याची मोठी संधी मिळाली आहे. या वर्षाच्या अखेरीस त्यासाठी वैशालीचा मुकाबला चीनच्या जू वेनजूनसोबत होईल. कॅडिडेट्स स्पर्धा जिंकून वैशाली आता वेनजूनची आव्हानवीर ठरली आहे. विश्वविजेतेपदाची लढत खेळणारी वैशाली केवळ दुसरी भारतीय बुद्धिबळ खेळाडू ठरली आहे. याअगोदर २०११ साली कोनेरु हम्पी विश्वविजेतेपदाची लढत खेळली होती. २००९ ते २०११दरम्यान झालेल्या फीडे ग्रांप्री विविध स्पर्धा मालिकांमध्ये हम्पी उपविजेती होती. त्यामुळे तेव्हा ती चीनच्या होऊ यिफान विरुद्धच्या जग्गजेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरली होती. पण हम्पीला शेवटी जग्गजेतेपदाच्या या लढतीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
१९५२पासून कॅडिडेट्स स्पर्धेला सुरुवात झाली. पण महिला गटात जेतेपदासाठी भारताला बराच काळ वाट बघावी लागली. त्यावरुन ही स्पर्धा किती कठिण आहे याची कल्पना येते. पुरुष गटात विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने दोनवेळा १९९९, २०१४मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. नंतर २०२४मध्ये गुकेशने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. गेल्या तीन वर्षांत भारतीय महिला बुद्धिबळपटूनी विश्वातील तीन मोठ्या स्पर्धा जिंकून आपला चांगला दबदबा निर्माण केला आहे. २०२४मध्ये हम्पीने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी दिव्या देशमुखने वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. आता वैशालीने कॅडिडेट्स स्पर्धेत बाजी मारताना आजवरच्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद मिळवले. स्पर्धा सुरू झाली तेव्हा ती जेतेपदाच्या शर्यतीत नव्हती. या स्पर्धेतील ८ अव्वल खेळाडूंमध्ये वैशालीचे सर्वात कमी फिडे रेटिंग होते. या स्पर्धेत तिची सुरुवातदेखील काहीशी संथ होती. तिचे पहिले ४ सामने बरोबरीत सुटले. ५व्या सामन्यात तिला हार खावी लागली. पण त्यानंतर तिने जोरदार कमबॅक केले. त्यानंतरच्या आठ सामन्यांत तिने आपला खेळ चांगला उंचावत नेला. शेवटच्या निर्णायक फेरीत आपल्या विजेतेपदाच्या आशा पल्लवीत केल्या. तेरा फेऱ्यांनंतर तिचे साडेसात गुण झाले होते. चौदावी फेरी जिंकल्यास वैशालीला विजेतेपदाची संधी होती. या संधीचा फायदा घेत तिने रशियाच्या कॅटरिनाला ४८व्या चालीत नमवून आपले जेतेपद निश्चित केले.

या सामन्यात वैशालीने सुरुवातीपासून आक्रमक व्युहरचना करुन कॅटरिनाला वांरवार चुका करण्यास भाग पाडले. त्याचा पुरेपूर फायदा वैशालीने घेत तिची चांगली कोंडी करुन टाकली. वैशालीच्या यशात दिव्या देशमुखचादेखील वाटा होता. शेवटच्या फेरीत कझाकिस्तानच्या बिबिसारालादेखील जेतेपदाची संधी होती. तिचेदेखील साडेसात गुण झाले होते. पण दिव्याने तिला बरोबरीत रोखून वैशालीच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत तिला झू जिनरकडून दोनवेळा हार खावी लागली. तर कॅटरिना, जोनगयी, गोयचाकिना या बड्या खेळाडूंना तिने पराभूत केले. लॅगोविरुद्ध वैशालीने आपल्या दोन्ही लढती सहज जिंकल्या. दिव्या देशमुखला पहिल्या सामन्यात वैशालीने नमवले. दोघींची दुसरी लढत मात्र बरोबरीत सुटली. तिने एकूण चौदा फेऱ्यांच्या या स्पर्धेत ५ सामने जिंकले. ७ सामने बरोबरीत सोडवले. दोन सामन्यात झू जिनरकडून ती पराभूत झाली. आपले जेतेपद निश्चित करताना वैशालीने आपल्या इतर सात प्रतिस्पर्धी खेळाडूंना अर्ध्या गुणाच्या फरकाने मागे टाकले.
टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्यात आणि भाऊ प्रग्यानंदमध्ये चित्रकला, बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण केली. प्रग्यानंदने बुद्धिबळात चांगले यश मिळवल्यानंतर वैशालीची या खेळातील आवड आणखी वाढली. २०१२मध्ये ती १२ वर्षांखालील गटात राष्ट्रीय विजेती झाली. त्याचवर्षी तिने या गटाचे जागतिक विजेतेपद मिळवले. मग मात्र तिने मागे वळून बघितलं नाही. चेन्नई येथील वेलमाल विद्यालयाची वैशाली ही विद्यार्थिनी. ही शाळा बुद्धिबळ खेळाडूंची चेन्नईमधील फॅक्टरी म्हणून ओळखली जाते. ग्रॅन्डमास्टर किताब मिळवणारा प्रग्यानंद, वैशाली हे बुद्धिबळ विश्वातील पहिले सख्खे भाऊ-बहिण ठरले. या दोघांचे वडील बँक कर्मचारी असून आई गृहिणी आहे. २०२४मध्ये केंद्र सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. वैशालीच्या यशात कुंटुंबियांचा मोठा वाटा आहेच. पण विश्वनाथ आनंद, त्याची डब्लूएसीए चेस अकादमी आणि तिचे प्रशिक्षक आर. रमेश, त्यांची पत्नी आरती यांचेदेखील मोठे योगदान आहे.

सायप्रस येथे प्रशिक्षक रमेश पारितोषिक वितरणसमारंभ सुरू होण्यापूर्वी जेमतेम पाच मिनिटे अगोदर २० तासांचा विमान प्रवास करुन, तीन विमाने बदलून त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. हम्पी, हारिका हे वैशालीचै आर्दश खेळाडू आहेत. कॅडिडेट्स स्पर्धा ही खेळाडूची शारीरिक आणि मानसिक अशी कस बघणारी खडतर स्पर्धा असते. वैशाली नेहमी संघाला प्राध्यान देते. स्वतःपेक्षा इतर खेळाडूंची ती नेहमी काळजी घेत असते. खेळातील शिस्त, शांत स्वभाव, प्रामाणिकपणा, झटपट विचार करण्याची क्षमता हे वैशालीचे वैशिष्ट्यं आहे. भक्कम बचाव आणि जोरदार आक्रमण याची ती उत्तम सांगड घालते. तिच्या खेळात विविधता असून नवनवी व्यूहरचना करुन प्रतिस्पर्धी खेळाडूला अडचणीत आणण्याची वैशालीची खासियत आहे. मेहनत, चिकाटी, संघर्ष यातून ती तावून-सुलाखून बाहेर पडल्यामुळे आता परिपूर्ण खेळाडू बनली आहे.
कॅडिडेट्स स्पर्धा म्हणजे विश्व बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्य फेरी म्हणून ओळखली जाते. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा घेतली जाते. यातील विजेता खेळाडू जग्गजेत्याला आव्हान देण्यासाठी पात्र ठरतो. विश्वातील अव्वल आठ यलो रेटिंग असलेले खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. राऊंड रॉबिन पद्धतीनुसार सामने होतात. प्रत्येक खेळाडू एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळतो. विजयी खेळाडूस १ गुण मिळतो. सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळतो. ज्या खेळाडूचे गुण जास्त होतील तो खेळाडू या स्पर्धेचा विजेता ठरतो. तब्बल दहा वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर जग्गजेतेपदाची लढत दोन चिनी खेळाडूत नसेल. याअगोदर २०१६मध्ये चीनच्या होऊ याफेन आणि युक्रेनच्या मारिया मुझाचुंक या दोघीत जग्गजेतेपदाची लढत झाली होती. त्यामध्ये होऊनेच बाजी मारली होती. त्यानंतर गेली दहा वर्षे दोन चिनी खेळाडूंमध्ये जग्गजेतेपदासाठी लढत होत आहे. आता जग्गजेतेपदाच्या लढतीत वैशालीचा मुकाबला चीनच्या जू वेनजूशी होणार आहे. त्यात बाजी मारुन वैशाली भारतीय महिला बुद्धिबळ विश्वात आणखी एक नवा अध्याय लिहणार का याची उत्सुकता आहे.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

