Homeब्लॅक अँड व्हाईटगतविजेता बेंगळुरु यंदादेखील...

गतविजेता बेंगळुरु यंदादेखील आयपीएलचे जेतेपद राखणार?

यंदाच्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेला नेहमीप्रमाणेच उत्साही वातावरणात सुरूवात झाली आहे. गतवर्षीच्या विजेत्या बेंगळुरु संघाने आपल्या सलामीच्या लढतीत हैद्राबादचा आरामात पराभव करून आपल्या विजयी अभियानाला जोमात प्रारंभ केला आहे. दुसऱ्या लढतीतदेखील त्यांनी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नईचा ४३ धावांनी सहज पराभव केला.
आता हाच फॉर्म बेंगळुरु संघ यंदादेखील कायम राखून आपले मागील जेतेपद यंदादेखील कायम राखणार का, याकडे त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आयपीएल

या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात केवळ मुंबई आणि चेन्नई या दोनच संघाना जेतेपद कायम ठेवण्यात यश आलेय. त्यांच्या पंक्तीत आता बेंगळुरु संघ बसतो का याबाबतची उत्सुकतादेखील त्यांचा चाहत्यांमध्ये असेल. तब्बल १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर गतवर्षी ही स्पर्धा जिंकण्यात बेंगळुरु संघाला यश आले. याअगोदर २००९, २०११, २०१६मध्ये त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. ३ जून २०२५ हा दिवस बेंगळुरु संघासाठी ऐतिहासिक ठरला. त्याचदिवशी त्यांनी आयपीएल चषकावर आपले नाव कोरताना पंजाबचा रंगतदार निर्णायक सामन्यात अवघ्या ६ धावांनी पराभव केला. कागदावरतरी बेंगळुरु संघ समतोल वाटतोय. वेंकटेश अय्यर, जेकब डफीची खरेदी करून संघाने आपली ताकद वाढवली आहे.

गतवर्षी त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज जोशल हेजलवूड दुखापतीमुळे सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. गेल्या मोसमात त्याने २२ बळी घेतले होते. नोव्हेबर २०२५पासून‌ तो दुखापतीमुळे त्रस्त असून ‌ तेव्हापासून‌ तो मैदानाबाहेर आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेलादेखील तो मुकला होता. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह आहे. तो बेंगळुरु संघाच्या कुठल्याच सराववर्गात सामील झाला नाही. गेल्या वर्षी तो १५ सामने खेळला होता. त्यामुळे यंदा‌ बेंगळुरु संघातर्फे पदार्पण करणारा न्युझिलंडचा युवा वेगवान गोलंदाज जेकब डफीवर मोठी जबाबदारी असेल. अनुभवी भुवनेश्वर कुमारला त्यामुळे सुरूवातीच्या लढतीत बेंगळुरुचा तेज मारा संभाळावा लागणार आहे. तसेच‌ त्याचा सहकारी कृष्णाचीपण सुरूवातीला कसोटी लागेल.

फलंदाजीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवर त्याची मोठी मदार असेल. तोच त्यांच्या फलंदाजीचा कणा आहे. गतवर्षी त्याने ६५७ धावा केल्या होत्या. वनडेमधील त्याची अलिकडची धमाकेदार कामगिरी पाहता यंदादेखील तो या स्पर्धेत धावांचा रतीब टाकेल, असे त्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहता वाटते. कर्णधार रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिकल, टिम डेव्हिड यांनादेखील आपल्या बॅटचा तडाखा द्यावा लागेल. गतवर्षी या सर्वांनी बेंगळुरुची मधली फळी चांगली संभाळली होती. गोलंदाजांना सूर गवसला नाही तर बेंगळुरुच्या फलंदाजांचा खरा कस लागेल. गतविजेते म्हणून बेंगळुरु संघावर दडपण असेल. त्याचादेखील ते कसा मुकाबला करतात ते बघणे महत्त्वाचे असेल. आतापर्यंत बेंगळुरु संघाने या स्पर्धेत २०३ सामन्यात ९७ विजय मिळवले आहेत. तर त्यांना १०१ सामन्यात हार खावी लागली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आता या संघाची मालकी नव्या मालकाकडे गेली आहे. आता आपले जेतेपद यंदादेखील कायम राखून बेंगळुरु संघ नव्या मालकांना खूश करेल अशी आशा करुया.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार‌‌ आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...
Skip to content