Homeटॉप स्टोरीलग्नासाठी भाड्याने मिळणार...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले आहेत.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची 168वी बैठक मुंबईतल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय, विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात चित्रनगरीचा पुढच्या वर्षाचा 18 कोटी महसूलवाढीचा आर्थिक ताळेबंद मंजूर झाला. या बैठकीत शेलार बोलत होते.

राज्यातले चित्रनगरी व स्टुडिओ संकुलांमध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त मोकळी जागा आणि आकर्षक लोकेशन्स उपलब्ध आहेत. या सुविधांचा वापर नियोजनपूर्वक केल्यास चित्रिकरणाच्या कामावर परिणाम न होता पूरक स्वरूपात विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आदींसाठी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते. यामुळे संस्थेच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना चित्रिकरणास प्राधान्य देत वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन, स्वतंत्र झोन निश्चिती, कार्यक्रमांसाठी परवानगीप्रक्रिया, भाडेदरांची पारदर्शक रचना, ऑनलाईन बुकिंगप्रणाली, सुरक्षाव्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, स्वच्छता व देखभाल यांसारख्या सर्व बाबींचा सविस्तर विचार करावा, स्टुडिओमधील तांत्रिक उपकरणे, सेट्स आणि सर्जनशील वातावरण सुरक्षित राहील यासाठी आवश्यक ती काळजी घेणे बंधनकारक राहील, असे निर्देश शेलार यांनी यावेळी दिले. या उपक्रमामुळे चित्रनगरींचा वापर अधिक परिणामकारक होऊन महसुलात वाढ होईल, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content