Homeकल्चर +'आठवणीतले बाळासाहेब' व्याख्यानाने...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या बोरीवलीत जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु केली. अखंडपणे सुरु असलेल्या या व्याख्यानमालेने आपल्या ४४व्या व्याख्यानमालेचा प्रारंभ ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावरील व्याख्यानाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवार, २४ एप्रिलपासून ही वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. शिवसेना (उबाठा) नेते खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम आणि डॉ. सुकृत खांडेकर ‘आठवणीतले बाळासाहेब’, या विषयावर शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी सांगून या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतील.

जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेल्या विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची तसेच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्यसमीक्षक तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय डहाळे यांना देण्यात येणार आहे. शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपटसमीक्षक दिलीप ठाकूर यांना, तर प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या आधारस्तंभ पल्लवी वायंगणकर यांना तसेच जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पडकील यांना देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्वा. वि. दा. सावरकर यांच्या अपरिचित कवितांचे गायन कांचन सावंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी, २५ एप्रिलला करणार आहेत. याचवेळी निवेदिका दीपाली केळकर, कवितांशी संबंधित निवेदन करणार आहेत. रविवारी, २६ एप्रिलला गायक मंदार आपटे आपल्या ‘कितीदा नव्याने तुला आठवावे’ या संगीतमय कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी गीतांचा नजराणा पेश करतील.

एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली (पूर्व) येथे २४ ते २६ एप्रिलला रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content