आपल्या बहुसांस्कृतिक देशात आपण आपल्या आवडत्या चित्रपट कलाकार, क्रिकेटपटूसारखं दिसावं, असावं यासाठी आपल्या चेहऱ्यावर, केसांवर, हसण्यावार, पाहण्यावर मेहनत घेणारे, ब्यूटी पार्लरवर चकरा मारणारे ‘दीवाने’ (की येडे?) कमी नाहीत. ती वेडी मानसिकता वेगळी. राजेश खन्नाच्या अक्राळविक्राळ क्रेझच्या युगात आमच्या गिरगावात एक दोन नव्हे तर चक्क चार डिक्ट्टो राजेश खन्ना इकडेतिकडे फिरत होते. तरी बरं ‘ओरिजनल’ राजेश खन्ना आमच्याच गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावरील सरस्वती निवासचा रहिवासी. ‘सुपर स्टार’ होताच वांद्र्याच्या कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्यात राहायला गेला. म्हणून आता त्याच्यासारखे राजेश खन्ना पाहून आम्ही समाधान मानायचो. हे म्हणजे स्काॅचची तहान उसाच्या रसावर भागवण्यासारखे होते. आता हेमासारखी दिसणाऱ्या कियारा अडवाणीचा जमाना आला आहे.
एकीकडे असं… तर, सचिन तेंडुलकरसारखा दिसणारा खुद्द सचिन तेंडुलकरसह चक्क एका जाहिरातीत दिसला. त्यात जाहिरातपट मेकरची कल्पकता दिसली. असं कोणासारखे तरी दिसणं कसं असतं बघा. कियारा अडवाणी चक्क हेमा मालिनीसारखी दिसतेय. अगदी हेमा मालिनीसारखंच स्मितहास्य, हलकासा कटाक्ष, तसंच भुवया उंचावणे, तशीच चेहऱ्याची ठेवण. बरं हे अजूनपर्यंत तितकसं वाटत नव्हतं, दिसत नव्हतं. सिद्धार्थ मल्होत्रासोबतचे सुखी वैवाहिक जीवन, पुत्रलाभाचा आनंद यातून वाढलेल्या आत्मविश्वासातून, कारकीर्दीतील यशातून (संदीपा रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘कबीर सिंग’ खणखणीत यशस्वी) हा एकप्रकारचा व्यक्तिमत्त्व विकास म्हणता येईल. ती ‘मधुबाला’ चरित्रपटाची मधुबाला म्हणून निवडली गेली होती हेही तिला सुखावणारं. पण आपण ‘मधुबाला’ दिसू शकत नाही हे तिचं भान जास्त महत्त्वाचे.

हेमा मालिनीसारखं दिसणं तसं सुखावणारं. यापूर्वीही घडलंय. सत्तरच्या दशकातील बिंदीया गोस्वामी अशीच दिसायला हेमा मालिनी. पण तशा दिसण्याचा फार फायदा तिला झाला नाही. ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गोलमाल’ (१९७९)मध्ये अमोल पालेकरची नायिका होती ही मोठी झेप. विनोद मेहराची नायिका. प्रेयसी.. मग पत्नी हा प्रवास घटस्फोटापर्यंत पोहोचला. मग दिग्दर्शक जे. पी. दत्तासोबत लग्न करुन सुखी वैवाहिक जीवनात रमली. ऐंशीच्या दशकातील मधु मालिनी अशीच डिक्ट्टो हेमा मालिनीसारखी दिसायची. आपण हेमा मालिनीसारखं दिसतोय म्हणून तिने आपले आडनाव मालिनी ठेवलं असावं. काही चित्रपटांमधून भूमिका केल्या, पण लक्षात नाही राहिल्या. दिव्या भारतीही काहीशी हेमा मालिनीसारखीच दिसायची. आईच्या बाजूने महाराष्ट्रीय. आईचे मूळचे आडनाव होते वाळिंबे. मला आठवतंय, अंधेरीतील सेठ स्टुडिओत दीपक आनंद दिग्दर्शित ‘बलवान’ (१९९२)च्या सेटवर तिने अतिशय उत्तम मराठीत मला मुलाखत दिली. हेमा मालिनी दिग्दर्शित ‘दिल आशना है’ (१९९३)च्या जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील काॅकटेल पार्टीत हेमाजी आणि त्यांच्यासारखी काहीशी दिसणारी दिव्या भारती या एकाचवेळी असणे, दिसणे, पाहणे हे म्हणजे एकप्रकारे ‘सीता और गीता’चा योग होता.
ईशा देओल आपल्या आईसारखीच, म्हणजेच हेमा मालिनीसारखी दिसणं अगदी स्वाभाविक. पण दिसणं आणि असणं यात बराच फरक असल्याने ईशा देओलचे काही चित्रपट पडद्यावर आले आणि गेलेदेखील… ती ‘स्टार’ बनू शकली नाही यात आश्चर्य नाही. हेमा मालिनी यांची ग्रेसफुलता आजही कायम आहे. असं कोणासारखे तरी दिसणं सुरुवातीला बरं दिसतं. त्यातून फार काही साध्य होत नाही. फरहीन नावाची एक अभिनेत्री होती, याची कदाचित गुगललाही माहिती नसेल. ती तर आपण माधुरी दीक्षितसारख्या दिसतो, अशा भ्रमात वावरायची. काही दिवस गाॅसिप्स मॅगझिनमधून ती पिनअप गर्ल म्हणून चमकली इतकेच. पुढे काही नाही. ओरिजनल असणं केव्हाही चांगले. कियारा अडवाणी आता आता हेमा मालिनीसारखी दिसतेय आणि सोशल मीडियात तिच्या तसं दिसण्याला भरभरुन लाईक्स मिळताहेत हे या माध्यमाचे विशेष. येथील फाॅलोअर्स मोठ्या पडद्यावर काय दिसतेय याची वाट पाहत नाहीत हेही खरेच!
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

