भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्वच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जात असे आणि आठ तासांत तीस पाऊंड म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेलाचे प्रमाण पूर्ण न झाल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदुभूषण राय यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्त्या केल्या. उल्हासकर दत्त यांच्यासारख्या अनेक वीरांचे मानसिक संतुलन ढळले. ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’ हेच आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. पण असंख्य क्रांतिकारकांच्या अपार त्याग आणि बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्याचं हे मोल, क्रांतिकारकांच्या यातना जाणून घेण्याची संधी मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने उपलब्ध केली आहे. भारतमातेच्या सुपुत्रांनी भोगलेल्या असह्य यातनांचा अनुभव राष्ट्रप्रेमी स्वतः कोलू चालवून घेऊ शकतात. यानिमित्ताने भारतातल्या युवा पिढीला खरा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल.

बंदीवानांना ८-८ तास कोलू फिरवावा लागत असला, तरी त्याचा थोडासा अनुभव म्हणून उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना अधिकाधिक १५ मिनिटे कोलू फिरवण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यातनांचा थोडातरी अनुभव घेता यावा, यासाठी पायात बेड्या घालूनच हा कोलू फिरवायचा आहे. दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शनिवार, ४ आणि रविवार ५ एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा अनोखा उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गूगल फॉर्म भरून वेळेची निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीविषयी कोणतीही शंका असल्यास ९२२००७०३८६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पायात बेड्या घालायच्या असल्याने फूलपँट / सलवार घालून यावे, जेणेकरून पायाला इजा होणार नाही. गूगल फॉर्मची लिंक- https://forms.gle/SVexjX6RbcNCTJFz6 कोलू फिरवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्याच दिवशी देण्यात येणार आहे. स्मृती म्हणून कोलू फिरवून निघालेले तेलही उपक्रमानंतर २ दिवसांनंतर सर्वांना देण्यात येईल. स्वातंत्र्याचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे.

