अशोक पाटोळे यांनी लिहिलेले “आई रिटायर होतेय” हे नाटक चाळीस वर्षांपूर्वी रंगमंचावर आले होते. भक्ती बर्वे यांच्या मुख्य भूमिकेने ते गाजले होते. बाळ कर्वे यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. पण प्रभाव भक्ती बर्वे यांचा राहिला. सध्या चर्चा सुरु असलेल्या एका विषयाशी सुसंगत असा नाटकाचा विषय वाटला, म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने इथे मांडावा असे वाटले.
रिटायर होते म्हणजे एखाद्या कामातून बाजूला होणे. वर उल्लेख केलेल्या नाटकात घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना सगळ्यांचे मूड सांभाळणे आले. विशेषतः एकत्र कुटूंबपद्धती असते तिथे स्वयंपाकघर जिच्या हाती किंवा जबाबदारीवर असते ती आई, ती आता पन्नाशी उलटलेली आहे. सगळ्या कुटुंबाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी धडपडत आहे. पण तिची ओढाताण होते आणि मग या जबाबदारीतून मुक्त होऊन आपल्या मनासारखे आयुष्य जगावे असा ती विचार करते. या सगळ्या विषयात मुले, सुना यांना धडा मिळतो. अशा विषयावर अनेक चित्रपटदेखील आहेत. मुद्दा असा की, कोणत्याही ठिकाणी कोणा व्यक्तीची अपरिहार्यता नसते. कोणाचे कोणावाचून काही अडत नाही. जगरहाटी सुरु राहतेच राहते.
राज्यसभेत महाराष्ट्रातून निवडून पाठविण्याच्या सात जागांचा विषय सध्या चर्चेत आहे. काही वेळा चर्चा मुद्दाम घडवली जाते तर काही वेळा दुसरा काही विषय नाही, म्हणून एखाद्या विषयाचे चर्वण सुरु राहते. कोणत्या राजकीय पक्षाने कोणाला कोणत्या सभागृहात पाठवावे हा त्या पक्षाचा प्रश्न असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून जे सभागृहात जाणार आहेत त्यांची बांधिलकी जनतेशी असायला हवी एवढी अपेक्षा आहे. साठ वर्षे राजकीय जीवनात सक्रिय राहिल्यानंतर आता आपण शांतपणे आपल्या मनासारखे काम करणार आहोत, असे जर कोणी म्हणाले तर लोक स्वागत करतील. पण एका पद्धतीच्या जीवनाची सवय लागली की, ते सगळे सोडावे असे वाटेलच असे नाही. शरद पवार यांनी आता राज्यसभेत पुन्हा जाण्यासाठी धडपड करु नये असे मला वाटत होते. पण, त्यांना सल्ला देणारा मी कोण? त्यासाठी काही संदर्भ मात्र अवश्य द्यावे असे वाटते. सन २००९च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार बारामती मतदारसंघातून विजयी झाले होते. पुढच्या निवडणुकीत त्यांनी बारामती मतदारसंघात आपली कन्या सुप्रिया यांच्यासाठी उपलब्ध करुन दिला आणि स्वतः माढा मतदारसंघात लढले. त्या काळात किंवा त्यानंतर शरद पवार यांनी केलेली काही विधाने मला आठवतात. त्यांनी आता धावपळ कमी करुन रचनात्मक कार्यात झोकून द्यावे, मनासारखे वाचन करावे असे म्हटल्याचे आठवते. २०१९मध्ये पवार लोकसभेसाठी लढले नाहीत. माढा मतदारसंघात प्रतिकूल वातावरण होते, कदाचित. नंतर एक वर्षाने ते राज्यसभेत पोहोचले. मधले काही महिने ते संसदेत सभासद नव्हते.

शरद पवार यांचे समवयस्क आणि केरळमधील काँग्रेसचे नेते ए. के. अँथनी यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला, तो म्हणजे आता सक्रिय राजकारणात राहायचे नाही. त्यांनी पक्ष सोडला नाही, पण दिल्लीत न राहता आपल्या जन्मगावी केरळमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि ते खरोखरच तिकडे गेले. कदाचित त्यांनी तिथे पारंपरिक शेतीत लक्ष घातले असेल. त्यांच्या पत्नी शिक्षिका म्हणून काम करायच्या, तेव्हा अँथनी मुख्यमंत्री होते तेव्हादेखील त्या त्यांच्या शाळेत बसने जात असत. साधेपणाचे प्रतीक म्हणून अँथनी यांच्याकडे बघितले गेले. आता त्यांचे चिरंजीव भारतीय जनता पक्षात आहेत. पवार यांना राज्यसभेत पुन्हा पाठवण्याचा विषय त्यांनी स्वतः उपस्थित केला नाही, बाकीच्या लोकांनी त्याचे राजकारण केले. या काळात पवार यांनी काही भूमिका मांडणे अपेक्षित होते. परंतु महाराष्ट्रातील तथाकथित महाआघाडीत निर्माण झालेली रस्सीखेच आणि स्पर्धा बघितली तर पवार यांच्यासंदर्भात कुतूहल निर्माण होण्यासारखेच वातावरण होते. पवार यांचे राजकीय महत्त्व किंवा ताकद या विषयावर चर्चा कमी आणि कुजबूज अधिक असते. कशासाठी एवढी धडपड असादेखील जनप्रवाह होता. आणि २०१९मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्रात जे राजकारण घडवले तेव्हा पवार यांना डोक्यावर उचलून घेणारे पत्रकार आणि निरीक्षक वगैरे पवार यांच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात उघडपणे काही लिहिताना दिसत नव्हते.
सत्ताधारी गटाशी पवार नेहमी जुळवून घेतात हे एक निरिक्षण वारंवार नोंदवले जाते. पण माझा मुद्दा असा की, आपली प्रत्यक्ष मैदानात गरज नसते तिथे संघात जागा अडवून बसण्याने चुकीचा संदेश जातो. वास्तविक मनासारखे रिटायर होण्याची इच्छा असली तरी तसे सगळ्यांना जमते असे नाही. बहुतेकांना जमतच नाही. नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी गाव सोडून आलेल्या लोकांना गाव खुणावत असते. पण संसाराचा गाडा हाकत असताना जवळपास सगळे आयुष्य संपते आणि गावातील कुठलाच दगड आठवत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. इथे आहे ते घरदार सोडून जाणार कुठे आणि पोटापाण्यासाठी करणार काय हाही प्रश्न असतो. राजकारणी लोकांची परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात सहा दशके वावर असलेल्या नेत्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेतला तर पुढच्या पिढ्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल. शिवाय चांगले वाचन करुन लोकांना चांगले वाचण्यासाठी उत्साह निर्माण करता येईल. पवार यांनी बारामतीत त्यांच्या शेतात अनेक चांगले प्रयोग केले आहेत. ते लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

यातील महत्त्वाचा भाग म्हणजे एक चांगले राजकारणी म्हणून पवार यांची जी प्रतिमा आहे ती उजळावी असे अपेक्षित असेल तर पवार यांनी नवे पाऊल उचलायला हरकत नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सन २०२३मध्ये विभाजन होण्यास जी काही कारणे घडली त्यामध्ये पवार स्वतः बाजूला होऊन इतरांना संधी देण्यास तयार नाहीत हा मुख्य मुद्दा होता. अजित पवार यांनी जाहीरपणे तो मांडला होता. औद्योगिक क्षेत्रातदेखील लोक योग्यवेळी बाजूला होतात आणि पुढच्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवतात, हे आपण बघत आहोत. राजकारणात मात्र हे दिसेलच असे नाही. मुळात भारतात राजकारण हा पेशा कमी आणि व्यवसाय अधिक मानला जातो. काही अपवाद असू शकतात. पण राज्य आणि केंद्रीय सभागृहात असण्यामध्ये जी सुखासीन जिंदगी असते त्याचा त्याग करण्याची क्षमता असलेले राजकारणी दुर्मिळ आहेत. आम्ही सामान्य माणसे यावर फारसा विचार करीत नाही. कोणाला काय दिले आणि कोणाला कोणते पद दिले या चर्चेत आपण मग्न असतो. लोकप्रतिनिधी निवडून येण्याआधी पुढे वाकतात आणि निवडून आल्यानंतर ते सरळ ताठ उभे राहतात. सर्वसामान्य लोक त्यांच्या खिजगणतीतही राहत नाहीत. मग लोक आपले वैफल्य एकमेकांवर काढत राहतात.
तब्येतीची तक्रार, राजकीय परिस्थिती फारशी सकारात्मक नाही. आपल्याला नेमके काय पाऊल टाकायचे आहे याची स्पष्टता नाही, राज्यसभेत ज्या पक्षाची ताकद नाही त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून जाण्याने काय साध्य होणार, अशी एकंदर परिस्थिती असताना आपल्या उमेदवारीची आयुष्याच्या या टप्प्यावर चर्चा व्हावी. घरातून उमेदवारीअर्ज पाठवला जावा, हे फारसे आशादायी वातावरण नाही. रिटायर होण्याची गंमत वेगळी. रिलॅक्स होण्याचा आनंद वेगळा. जगाची चिंता किती आणि कशासाठी? Allow the World Run..
(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

