लंडनमधील बर्मिंगहॅम शहरात झालेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू २४ वर्षीय लक्ष्य सेनने दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. लंडनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्व ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला आहे. त्यावरुन या स्पर्धेची महती आपल्याला कळेल. या स्पर्धेचा इतिहास बराच जुना आहे. अनेक वर्षांची मोठी पंरपरा स्पर्धेला लाभली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळायचे आणि विजेतेपद मिळवायचे हे प्रत्येक बॅडमिंटन खेळाडूचे स्वप्न असते. भारतातर्फे या स्पर्धेत महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या दोघांनी विजेतेपद मिळवले. प्रकाश नाथ आणि सायना नेहवालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पदुकोणने दोनवेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. २०२२नंतर लक्ष्यने ४ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर परत एकदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण दुसऱ्यांदा त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली. यंदा तो जरी पराभूत झाला असला तरी त्याने दाखवलेल्या लढाऊ बाण्याला तोड नव्हती.

या स्पर्धेत खरं म्हणजे तो “जायंट किलर” होता. त्याने पहिल्याच सामन्यात माजी विश्वविजेत्या आणि विश्व क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या चीनच्या शी युकीला तीन गेममध्ये नमवले. दुसऱ्या फेरीत लक्ष्यने हाँगकाँगच्या नीज का लॉगलादेखील तीन गेममध्ये पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या चीनच्या ली शी फेंगवर सरळ दोन गेममध्ये धक्कादायक विजय मिळवला. उपांत्य फेरीत लक्ष्यने कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या व्हिक्टर लाइवर अटीतटीच्या लढतीत तीन गेममध्ये २१-१६, १८-२१, २१-१५ असा जबरदस्त विजय मिळवला. तब्बल १ तास ३७ मिनिटे हा सामना रंगला. या सामन्यात लक्ष्यची चांगली दमछाक झाली. शेवटच्या गेममध्ये त्याच्या पायात गोळे आले. त्याने मेडिकल ब्रेकदेखील घेतला. मग शांत चित्ताने संयमी खेळ करीत मोक्याचा क्षणी आपला खेळ उंचावत लक्ष्यने हा सामना जिंकत दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
निर्णायक सामन्यात त्याचा मुकाबला या स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱ्या तैवानच्या लीन चुनयीशी होता. लीनने आपले सर्व सामने सरळ दोन गेममध्ये जिंकले होते, तर लक्ष्यला अंतिम फेरी गाठण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागला. त्यामुळे शाररिकदृष्ट्या तो लीनसमोर काहीसा कमजोर वाटत होता. मानसिकदृष्ट्या तो शंभर टक्के या सामन्यासाठी सक्षम होता. पण अंतिम लढतीत त्याच्या दमलेल्या शरीराने साथ दिली नाही. त्याचा फायदा लीनने घेत हा सामना २१-१५, २२-२० असा दोन गेममध्ये जिंकला. दुसरा गेम जिंकून सामना बरोबरीत आणण्यासाठी लक्ष्यने शर्थीचे प्रयत्न केले. पण नशिबाची साथ त्याला मिळाली नाही. या पूर्ण स्पर्धेत लक्ष्य पाच तासांपेक्षा दीर्घ काळ बॅडमिंटन कोर्टवर होता. त्यामुळे त्याची चांगलीच दमछाक झाली. ही स्पर्धा जिंकणारा लीन तैवानचा पहिला बॅडमिंटनपटू ठरला. लीनने सलग पाचव्या सामन्यात लक्ष्यला लक्ष्य केले. आता भविष्यात लक्ष्यला लीनला नमवण्यासाठी काही नवी रणनिती आखावी लागेल. “हार मे भी शान है” असाच या स्पर्धेतील लक्ष्यचा प्रवास होता. काही वर्षांपूर्वी लक्ष्यच्या खांद्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्याला आक्रमक खेळाला काहीशी मुरड घालावी लागली. पण भविष्यात यावर मात करून आपला फिटनेस त्याला वाढवावा लागेल. तरच तो आजच्या या स्पर्धात्मक खेळात टिकून राहिल. त्याकडे त्याचे मुख्य प्रशिक्षक विमलकुमार आणि मानसिक प्रशिक्षक इस्त्रायलचे मॉन ब्रॉकमॅन हे लक्ष देतील.

उतराखंडमधील अल्मोडा येथे त्याचा जन्म झाला. त्याचे आजोबा, वडील आणि मोठा भाऊ, हे सर्व चांगले बॅडमिंटनपटू. त्यामुळे खेळाला घरी पोषक वातावरणात होते. लक्ष्य या खेळाच्या प्रेमात पडला नसता तर नवलच होते. आज तो सेन घराण्याचे या खेळात तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतोय. वडील, मोठा भाऊ हेच त्याचे सुरूवातीचे प्रशिक्षक होते. मग त्याने या खेळातच कारकीर्द करावी म्हणून त्याला वयाच्या १०व्या वर्षी बेंगळुरु येथील विमलकुमार यांच्या अकादमीत पाठवले. विमलकुमार यांनी लक्ष्यमधील गुणवत्ता हेरुन त्याला घडवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे हा हिरा भारताला गवसला. भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण लक्ष्यचे दैवत. त्याचेही काही काळ लक्ष्यला मार्गदर्शन मिळाले. लक्ष्यने अल्प काळात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. त्याने भारतीय बॅडमिंटनमध्ये नवनवी शिखरे पार केली. ज्युनिअर विश्व क्रमवारीत त्याने अव्वल क्रमांकावर झेप घेतली. ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला बॅडमिंटनपटू होता. ऑलिंपिकच्या पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवणारा लक्ष्य पहिला खेळाडू ठरला. ऐतिहासिक थॉमस चषक स्पर्धा विजेत्या भारतीय संघात लक्ष्यचा समावेश होता. ऑस्ट्रेलियन, स्विस, डच, कॅनडा, बेल्जियम, स्कॉटीश, थायलंड या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्यने जेतेपदाची मोहोर उमटवलीय. बचाव आणि आक्रमण याचा सुंदर मिलाफ त्याच्या खेळात दिसतो. जोरदार फोरहॅन्ड, बॅकहॅन्डचे फटके, स्मॅशेस, हलकेच ड्रॉपशॉट ही त्याची खासियत आहे. केंद्र सरकारने त्याला “अर्जुन” पुरस्काराने गाैरवलेय. टाईम्स ऑफ इंडिया, स्पोर्ट्सस्टारने त्याला वर्षातील सर्वोतम युवा खेळाडू म्हणून सन्मानित केले. आताच त्यांची संपत्ती ४० कोटींपेक्षा जास्त आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्याचे प्रेरणास्थान असलेल्या प्रकाश पदुकोणने भारतासाठी पहिले जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. आता ती स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्यचे स्वप्न आहे. त्याची पूर्तता तो पुढील वर्षी आपल्या तिसऱ्या प्रयत्नात करेल अशी आशा त्याचे लाखो चाहते करत असतील.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

