Homeमाय व्हॉईसहा पाहा ठाणे...

हा पाहा ठाणे स्टेशनवरचा प्रवाशांसाठीचा विश्रांतीकक्ष!

दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने ठाणे रेल्वेस्थानक (प.) परिसरात बोगस डियोडरंट विक्रीचा भांडाफोड केला. त्याबाबत अभिनंदनच! परंतु, ठाणे स्थानक व स्थानक परिसर, हा दिवसेंदिवस बकाल व बेवारस लोकांचं आश्रयस्थान बनत असल्याचे दिसत आहे, त्याचे काय? (अनेकांच्या मते हे स्थानक बेवारस परप्रांतीयांचे वसतीस्थान आधीपासूनच बनलेले आहे.) रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरच प्रवाशांसाठी एक रेस्टरूम (विश्रांतीकक्ष) आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत हा कक्ष बराच मोठा होता. पण आता याच्या अर्ध्या भागात रेल्वे विभागाच्या खानपानाचे एक हॉटेल सुरु करण्यात आले आहे. अर्धा भाग प्रवाशांच्या विश्रांतीसाठी राखून ठेवलेला आहे.

या विश्रांतीकक्षात प्रवाशांपेक्षा बेवारस मंडळीच हातपाय पसरून विश्रांती करताना नेहमीच दिसतात. काहीजण जण तर अक्षरशः डाराडुर अवस्थेत झोपलेले दिसतात. शेजारीच प्रसाधनगृह आहे.त्याचीही स्वछता नीट राखत नसल्याचे दिसून आले. याच कशात खाण्यापिण्याचे जिन्नसही बनत असतात, याचे साधे भानही या प्रांतीयांना नाही. फलाट क्रमांक एकवर काही महिन्यांपूर्वीच एक नवीन प्रसाधनगृह सुरु करण्यात आलेले आहे. त्याचीही स्थानक परिसरासतील चरसी व गुंडानी काय दशा करून ठेवलेली आहे तेही सोबतच्या छायाचित्रात दिसत आहे. ठाणे रेल्वेस्थानक परिसराच्या व्यवस्थापक वा त्यांच्या सहायकांनी फलाटावर कधीतरी फेरी मारून प्रवाशांसाठीच्या सुविधा योग्य स्थितीत आहेत की नाही, याची पाहणी करावी, अशी जनतेची मागणी असेल तर त्यात चूक आहे का?

या विभागातील या ज्येष्ठ नगरसेवकांबाबत आदरच आहे, पण तो डोळस आहे. बोगस माल विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई हवीच, पण नगरसेवकहो, आपले कार्यालय ज्या दादा पाटील वाडीत आहे तेथील पदपथ पहिल्यांदा ठाकठीक करा.. एका पदपथावर तर एका बाजूला छोटे मंदिर, त्याच्याच बाजूला मोठे झाड आणि त्याला लागूनच पिण्याच्या पाण्याचा माठ… म्हणजे समाजकार्याच्या पाठीमागे पदपथ बळाकवणे हाच उद्देश्य नसेल असे कशावरून? बरं, तो रस्ताही अरुंद म्हणजे शेवटपर्यँत अंग वाकडे करूनच चालावे लागते. काही ठिकाणी तर शहाण्याने पाऊण फुटाच्या उंचीवर पदपथ बांधलेला आहे. त्यांना माझे आवाहन आहे की, यापेक्षा त्यांनी विमानतळावर असतो तसा सरकता रस्ताही बांधावा…

या राज्यमातांना प्रशस्त गोशाळा (गोठा हो आपला..) बांधून द्या!

ठाणे शहराच्या पश्चिमेस माजिवाडा कापुरबावाडीच्या पुढच्या वळणावर कोलशेत रोड लागतो. मार्ग प्रशस्त आहे, पण रस्त्याच्या एका बाजूस ओगळवाणे प्रसाधनगृह (म्हणजे आपले सार्वजनिक शौचालय हो..) आणि कचराकुंडी आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस छायाचित्रात दिसणारा छोटेखांनी गोठा.. या चारपाच गाई व त्यांचे इमानेइतबारे सांभाळ करणारे झोपडीवासीय याठिकाणी गेले सुमारे दोन वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. महापौरताईंनी खास माणसे कामाला लावून (सुमारे २५०) आपला प्रभाग स्वच्छ चकचकित केल्याचे वाचनात आले आहे. ताईंच्या उपक्रमाचे स्वागतच आहे. पण उसंत मिळेल तेव्हा त्यांनी कोलशेत, ढोकाळी, मनोरमा नगर, मानपाडा, माजिवाडा या परिसराला आवर्जून भेट द्यावी, असे इथल्या नागरिकांना वाटतं. महापालिका आयुक्तानी माजिवाडा प्रभागाधिकाऱ्यांना कामाला लावून हा गोठा तरी हलवावा किंवा त्यांना अधिकृत म्हणून मान्यता देऊन प्रशस्त गोशाळा बांधण्यास परवानगी तरी द्यावी…

गोमातेचे मलमूत्र औषधी असतेच असे सिद्ध झालेले आहेच. त्यातच हा गोठा मुंबई महापालिकेच्या पाणी खात्याच्या केंद्राच्या पदपथावरच असल्याने भांडुप येथे होणारी पाणी शुद्धीकरणाची उपाययोजना करण्याचे काहीच प्रयोजन उरणार नसल्याने त्या शुद्धीकारण केंद्रास कायमचे टाळे लावण्यास हरकत नसावी. तेवढेच पालिकेचे लाखो रुपये वाचतील.. या प्रशस्त गोशाळेचा फायदा ठाण्यातील विविध मंदिरांनाही करण्याची योजना आखली जावी. चारा-पाण्याची व्यवस्था करण्यास तमाम भक्तगण तयार आहेतच! शिवाय या गोमातांमुळे सुमारे १० झोपडीवासियांचे पोट भरण्यास मदतच होत आहे, हे ध्यानात घेऊन पालिका आयुक्तानी एक उत्तेजनार्थ योजना करावी अशी समस्त ठाणेकरांची आग्रहाची मागणी आहे. कारण, शहराच्या हद्दीत गाई-म्हशींचे गोठे नसावेत असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही शहरात सुमारे १५/२० गोठे नाकावर टिच्चून अजूनही उभे आहेत. उदाहरण म्हणून खोपटच्या गोठ्याचे देता येईल. या गोठेमालकांनी पुनर्वसनासाठी सरकारकडून जमीनही हडपलेली आहे. आता ही तमाम मंडळी फुकटात मिळालेल्या जमिनी परस्पर बिल्डरमंडळींना विकून आयजीच्या जीवावर बाजीराव होण्याची स्वप्ने पाहात आहेत. ठाणेकरांनो सावधान!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

रोहित शेट्टींच्या बंगल्यावरचा गोळीबार, एक स्टंट?

काही महिन्यांपूर्वी वा सुमारे वर्षांपूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेता सलमान खान यांच्याही बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा तर बांद्रा पूर्व येथे भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. यानंतरही कुणाकुणाला कोट्यवधी रुपयांच्या...

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना खुले पत्र!

नवनिर्वाचित महापौर शर्मिलाताई यांना सविनय प्रणाम. शर्मिलाताई, प्रथम आपले अभिनंदन! आज आपण ठाणे शहराच्या महापौर म्हणून अधिकृतरित्या पदभार सांभाळला. त्याबरोबरच आपले अभिनंदन करण्याचा मान मी घेत आहे. महापौरपदाचा भार सांभाळल्यानंतर आपण शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजेच सत्तारूढ महायुतीचे सरकार ठाणे...

जेलवारी करणारे छगन भुजबळ होते ‘राजबंदी’?

महाराष्ट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या आरोपतून सरकारच्या इडी यंत्रणेने आरोपमुक्त केल्याची बातमी काल आली आणि इंग्रजीतील आघाडीचे साप्ताहिक 'आउटलूक'मध्ये 'Thou Shalt Not Dissent' ही मुखपृष्ठकथाही कालच बाहेर आली! तसा भुजबळ यांचा...
Skip to content