Homeमाय व्हॉईसराष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा रिमोट...

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा रिमोट भाजपाच्या हाती!

अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर ज्या घाईने  विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली व ज्या वेगाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांना देण्यात आली, ती तत्परता पाहून सारा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. अजितदादांच्या निधनानंतर पोरका झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार किंवा जयंत पाटील ताबा मिळवतील, अशा भयगंडाने अजितदादांच्या पक्षातील अनेकांना पछा़डले आहे. खरंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे नेते यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून विलिनीकरणाची चर्चा चालू होती. पण आम्हाला त्यातले काहीच ठाऊक नाही, असे सांगत प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे हात वर करीत आहेत. विलिनीकरण म्हणजे, कोणी कोणाच्या पक्षात सामील व्हायचे? असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी विचारला आहे.

सन २०२४मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अजित पवार व शरद पवार यांचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. शरद पवार भाजपाच्या विरोधात तर अजित पवार भाजपाला सोबत घेऊन लढले होते. लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाला मोठे अपयश आले तर विधानसभा निवडणुकीत शरद पवाराच्या पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही पक्षांनी एकत्र यावे यासाठी अजितदादांनी पुढाकार घेतला. दोन्ही पक्षांनी महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे, पण आपापल्या चिन्हावर लढवल्या. पण कोणालाच लाभ झाला नाही. भाजपाच्या झंझावातापुढे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही आपला निभाव लागत नाही, हे काका-पुतण्याला कळून चुकले. जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावर दोन्ही पक्षांचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. जर विलिनीकरण हा मुद्दा नसता तर महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुका एकत्रितपणे व एकाच चिन्हावर लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला असता का?

राष्ट्रवादी

जुलै २०२३मध्ये अजित पवार बंडाचा झेंडा फडकावून चाळीस आमदारांसह भाजपासोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले तरी त्यांनी काकांबरोबरचे संबंध तोडले नव्हते. कुटुंबात एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या तरी त्यांनी सुप्रियांबरोबर भावा-बहिणीचे नाते कायम राखले होते. गेल्या काही महिन्यांत शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांबरोबर चौदा बैठका झाल्या. दादांबरोबर आपल्या दहा बैठका झाल्याचे जयंत पाटील स्वत: सांगत आहेत. या बैठकांचे फोटो किंवा व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. विलिनीकरणाच्या प्रक्रियेत अजितदादांना पक्षातील अन्य कोणाची लुडबूड नको होती. विलिनीकरणाच्या चर्चेला फाटे फुटू नयेत ह्याची त्यांनी काळजी घेतली होती. जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बारा फेब्रुवारी रोजी विलिनीकरणाची घोषणा करण्याचे ठरले होते. पण अजितदादांच्या मृत्यूनंतर हे सर्व  खोटे ठरविण्याचा उद्योग अजितदादांच्या पक्षांतील नेत्यांनी सुरू केला आहे. सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री करण्यासाठी ज्या मंडळींचा पुढाकार होता, तेच विलिनीकरणाच्या विरोधात सूर लावत आहेत.

अजित पवारांनी अडिच वर्षांपूर्वी शरद पवारांना सोडून भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा का निर्णय घेतला आणि आता ते पुन्हा दोन्ही पक्षांचे विलिनीकरण व्हावे यासाठी का आग्रही होते? भाजपामध्ये जाऊन त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. दोन्ही पक्ष एकत्र झाले तर संख्याबळ वाढेल व सौदेबाजीची ताकद वाढेल हे त्यामागचे गणित असावे. अजित पवार यांनी त्यांचे सर्वेसर्वा शरद पवार होते, हे कधीच लपवून ठेवले नाही. तुझ्या बापापेक्षा माझा काका लई मोठा आहे, हा त्यांनी दिलेला इशारा खूप गाजला होता. काकांच्या समक्ष विलिनीकरण व्हावे हीच त्यांची इच्छा होती. पण विमान अपघातातील त्यांच्या अकस्मिक मृत्यूने हे मिशन अपुरे राहिले.

राष्ट्रवादी

प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ व धनंजय मुंडे हे चार नेते सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. सुनेत्रा पवार यांना विधिमडळ पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री करण्यात त्यांनी राबवलेली कूटनीती यशस्वी ठरली. अजितदादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुप्रिया सुळे खूप सक्रिय होत्या. बारामती, पुणे, मुंबई किंवा दिल्लीतील प्रत्येक नेता त्यांना चांगला ठाऊक आहे. त्या सर्वांची व्यवस्था बघताना दिसल्या. व्हीआयपींना खुर्ची देण्यापासून ते सुनेत्राताईंचा हात धरून धीर देताना त्या दिसत होत्या. अजितदादांच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे आवाहन शरद पवारांनी त्याचवेळी केले. दादांच्या मृत्युनंतर मोठी पोकळी निर्माण झाली. आता पवार कुटुंबीय म्हणून शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, आणि जयंत पाटील हेच उद्या सर्वांचा ताबा घेतील, विलिनीकरणाच्या नावाखाली ते पक्षावर नियंत्रण ठेवतील अशी भीती या चौकडीला वाटली. अजितदादांची चिता जळत असतानाच नरहरी झिरवळ यांनी, सुनेत्राताईंनी आता पक्षाचे नेतृत्त्व करावे असे म्हटले होते. हीच पक्षाची भूमिका होती हे नंतर स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, भाजपाला विश्वासात घेऊन आणि सुनेत्राताईंचा होकार मिळवून उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी अस्थिविसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत पार पडला. आता सुनेत्राताईंच्या संमतीशिवाय पक्षात कोणताही महत्त्वाचा राजकीय निर्णय होणार नाही.

पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे हे हिरो की व्हिलन अशी माध्यमांवरही चर्चा ऐकायला मिळाली. हे नेते चौकशीच्या ससेमिऱ्यामुळेच भाजपासोबत आले आहेत. यातले कोणी अजितदादांना मनापासून साथ देत नव्हते. कोणी छातीत दुखते म्हणन घरीच बसले होते. कोणी भाजपाचे हस्तक असल्यासारखे काम करीत होते. कोणी मंत्रीपदासाठी अगतिक झाले होते. स्वत: सुनेत्रा पवार राज्य सहकारी बँकेच्या पंचवीस हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात इडीच्या चौकशीत आहेत. साहेबांना (शरद पवार) काहीही न सांगता सुनेत्राताई रातोरात शपथविधीसाठी बारामतीहून मुंबईला निघून गेल्या. यातूनच पुढील राजकारणाची दिशा आखली गेली. शरद पवारांनी त्यांच्या पतीला बोट धरून राजकारणात आणले. त्यांचे बंधु पदमसिंह पाटील तर शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. मग दादांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील वडिलधारे म्हणून शरद पवारांना भेटून मुंबईकडे निघता आले नसते का? सोनिया गांधींना जसा विरोध केला, तसा सुनेत्राताईंना शरद पवार विरोध करतील, असे भाजपाशी सलगी ठेवणाऱ्या नेत्यांना वाटले का? सुनेत्राताईंच्या शपथविधीनंतर, सगळं जैसे थे आहे, फक्त नेता बदलला आहे. विरोधकांना संधी मिळू नये व नेतृत्त्वात पोकळी राहू नये म्हणून घाई करणे गरजचे होते, असे सांगण्यात येत आहे. पण भाजपाच्या संमतीशिवाय एवढा मोठा निर्णय घेणे शक्य होते का?

राष्ट्रवादी

मला सांगितल्याशिवाय विलिनीकरणाचा एवढा मोठा निर्णय अजित पवार कसा घेतील असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विचारला आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना मला सांगितला पाहिजे हाच संदेश देवाभाऊंनी नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना दिला आहे. अजितदादा हयात असताना विलिनीकरण प्रक्रियेचा केंद्रबिंदू ते स्वत: होते. त्यांच्या मृत्यूनंतर या प्रक्रियेला ब्रेक लागलाय. त्याचे श्रेय पटेल, तटकरे, भुजबळ व मुंडे या चौकडीला दिले जात आहे. विलिनीकरण ही अजितदादांची इच्छा होती असे शरद पवारांच्या पक्षातील नेते बोलत आहेत. पण त्यासंदर्भात अजितदादांच्या पक्षातील कोणी ब्र काढत नाहीत. जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुक पक्षात भाजपाने लक्ष घातले होते. राम विलास पासवान यांच्या मृत्यूनंतर लोकजनशक्ती पक्षाला भाजपानेच दिशा ठरवून दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर भाजपाचे नियंत्रण आहे, अशी उघड टीका होत असते. आता अजितदादा यांच्या पक्षाचा रिमोट भाजपाकडे असणार आहे. अजितदादांच्या उपस्थितीत विलिनीकरणासाठी डझनभर बैठका झाल्या, हे मोदी, शाह किंवा फडणवीस यांना ठाऊक नव्हते का?

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अजितदादाच म्हणाले होते- नियतीने बोलावल्यावर जावेच लागते!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने सारा देश हादरला. बारामती येथे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच कोसळले, काही क्षणातच मोठा स्फोट झाला, आगीचा मोठा लोळ उसळला आणि अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक, अटेंडंट यांचाही मृत्यू झाला....

शरद पवारांना अंधारात ठेवून सुनेत्राताईंनी काय साधले?

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी मुंबईतील लोकभवनात त्यांच्या पत्नी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या मृत्यूनंतर सारा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही दु:ख अनावर झाले होते. बारामतीत झालेल्या अत्यंस्काराच्यावेळी परत या.....

तुमच्या बापापेक्षा माझा काका मोठा आहे…

जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे घड्याळ चिन्हावर या निवडणुकांना सामोरे जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी एकच आहे. निवडणूक काळात जेव्हा अजितदादांवरआरोप झाले तेव्हा ते म्हणाले- तुमच्या बापापेक्षा माझा काका मोठा आहे... दादांचे हे वाक्य...
Skip to content