Homeमाय व्हॉईसचंदा चोरांनी घातला...

चंदा चोरांनी घातला अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा

अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीत भक्तांकडून आलेल्या देणग्या व दागदागिने अशा मौल्यवान वस्तुंच्या झालेल्या चोरी प्रकरणात मंदिरातील आठ सेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यायाचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य विश्वस्त अनिल मिश्र यांना राजीनामे देणे भाग पडले आहे. राममंदिरातील दानपेटीवर पडलेल्या दरोड्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी)ची नियुक्ती करण्यात आली आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी छापे टाकून आजवर ऐंशी लाखांची रक्कम वसूल करण्यात आहे. सापडलेली रक्कम ही तर हिमनगाचे टोक असावे. देशभरातून रोज येणाऱ्या हजारो भक्तांकडून दानपेटीत देणग्यांचा वर्षाव होत असताना त्यावर हात मारण्याचे काम पद्धतशीरपणे पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दीर्घकाळ चालू होते. राममंदिरात सर्वत्र सीसीटीव्ही आहेत, जिथे रोख रक्कम मोजली जाते तिथेही सीसीटीव्ही आहेत, पाचशे रूपयांच्या नोटा सतत कमी होत असल्याचे लक्षात येत होते. तरीही प्रभू रामाच्या नावावर लूटमार होत असल्याचे आजवर कुणाच्या लक्षात कसे आले नाही?

राम जन्मभूमी आंदोलनानेच भारतीय जनता पक्षाला संजीवनी दिली. जय श्रीराम घोषणेनेच भाजपाकडे हिंदू व्होट बँक आकर्षित झाली. १९९२मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली तेव्हा रथयात्रा काढलेल्या भाजपाने आम्ही नाही त्यातले, अशी भूमिका मांडली होती. बाबरी मशीद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल मला त्यांचा अभिमान वाटतो, असे सांगण्याची हिम्मत तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या देशातील एकाच नेत्याने दाखवली. खरेतर राममंदिर उभारणी हा भाजपाचा पक्षाच्या स्थापनेपासून अजेंडा होता. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाचे सरकार आल्यानंतरच देशातील कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. देशातील कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले व २०१९मध्ये राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. राम जन्मभूमी आंदोलनात शेकडो कारसेवकांनी रक्त सांडले. तेव्हाच्या मुलायम सिंग यांच्या सरकारच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शरयू नदी कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली, अशी वर्णने प्रसिद्ध झाली होती. राममंदिर उभारणीचे सर्व राजकीय श्रेय भाजपाने घेतले व देशात हिंदुंचे आपण एकमेव कैवारी आहोत असा बँड वाजवला. मग राममंदिराच्या दानपेटीवर दरोडा पडल्याचे उघडकीस आल्यावर भाजपाचे नेते तोंडावर पट्टी बांधून का बसले आहेत?

राम

दानपेटीवर दरोडा पडल्याप्रकरणी एसआयटी नेमल्यानंतर मंदिराच्या बेलगाम कारभाराविषयी रोज सुरस कहाण्या ऐकायला मिळत आहेत. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या संशयास्पद कारभारानंतर हा ट्रस्ट पुढे चालू राहणार की बरखास्त केला जाणार अशी चर्चा चालू आहे. तसेच मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाच्या कारभाराची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे. तिरूपती व वैष्णौदेवी मंदिराच्या कारभारावर नियंत्रण कसे ठेवणार, असेही प्रश्न विचारले जात आहेत. श्रीराम जन्मभमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्वायत्त आहे. अयोध्येत भव्य राममंदिर उभारणी, वित्त व प्रशासनवर देखरेख करण्याचे काम या ट्रस्टवर सोपविण्यात आले. नोव्हेंबर २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर भव्य राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. ५ फेब्रुवारी २०२० रोजी केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. या ट्रस्टला सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असून ट्रस्ट स्वायत्त असेल असे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच संसदेत जाहीर केले. सरकारने अधिग्रहण केलेली जमीन या ट्रस्टकडे सोपविण्यात आली. या ट्रस्टवर एकूण पंधरा सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्यांची नेमणूक सरकारने केली आहे. ट्रस्टचे एक सदस्य विलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांचे ऑगस्ट २०२५मध्ये निधन झाले. ते अयोध्येच्या राजघराण्याचे वंशज होते.

के. परासरन हे ट्रस्टचे संस्थापक सदस्य आहेत. सर्वोच्य न्यायलयातील ज्येष्ठ कायदेपंडित आहेत. त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी वादात रामलल्लाचा जन्म तिथेच झाला होता अशी बाजू मांडली होती. महंत नृत्य गोपाल दास हे राम जन्मभूमी व श्रीकृष्ण जन्मभूमी न्यायाचे अध्यक्ष आहेत व अयोध्येतील छोटी छावणीचे पीठाधीश्वर आहेत. चंपत राय विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. रामजन्मभूमी ट्रस्टचे माजी सरचिटणीस आहेत. (नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.) मंदिरातील दैनंदिन प्रशासन संभाळणे, सार्वजनिक कामांवर व मंदिर उभारणीवर देखरेख ठेवणे हे त्यांचे काम होते. स्वामी गोविंद देवगिरी महाराज हे प्रमुख अध्यात्मिक गुरू आहेत. ते ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवणे हे त्यांचे काम आहे. नृपेंद्र मिश्र हे मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आहेत. ते निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. २०१४ ते २०१९ या काळात ते पंतप्रधानांचे सचिव होते. डॉ. अनिल मिश्र हे होमिओप’थिक डॉक्टर आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. ट्रस्टचे निर्णय घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. याखेरीज शशांक त्रिपाठी, आयएएस व जिल्हाधिकारी अयोध्या, संजय प्रसाद, आयएएस व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव, प्रशांत लोखंडे, आयएएस व सीबीएसईचे चेअरमन, युगपुरूष परमानंद गिरी, अयोध्या निर्मोही आखाड्याचे प्रतिनिधी दिनेंद्र दास, बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, कर्नाटक येथील उडुपी येथील श्री पेजावर अधोक्षज मठाचे पीठाधीश्वर स्वामी विश्व प्रसन्न तीर्थ असे धार्मिक-अध्यात्मिक व प्रशासनीक क्षेत्रातील मान्यवर लोक श्री राम जन्मभूमी तीर्थक्षत्र ट्रस्टवर विश्वस्त म्हणून काम करीत असताना राम मंदिरातील दानपेटीवर रोज लूटमार चालू कशी राहिली?

राम

राममंदिर परिसरात ३५ दानपेट्या आहेत. दान केलेल्या रकमेची मोजणी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली आहे. या कामात एका बाहेरच्या खाजगी कंपनीलाही सहभागी करून घेण्यात आले आहे. देणग्या मोजण्यासाठी पन्नास कर्मचारी आहेत. त्यावर ट्रस्टचे १२ कर्मचारी देखरेख करीत असतात. बँकेकडे रक्कम सोपविण्याअगोदर नोटांची बंडले करण्याचे काम कर्मचारी करीत असतात. तिथे सीसीटीव्हीपण आहेत. शिवाय मंदिरात ट्रस्टचे १५०० कर्मचारी काम करीत असतात. देणग्यांमध्ये झालेला अपहार शोधून काढण्याचे काम चालू आहे. ऐंशी लाख वसूल झाले असले तर एका अंदाजानुसार किमान २०० कोटींचा घपला असावा. ज्या कर्मचाऱ्यांना दरमहा अठरा ते वीस हजार वेतन मिळते. ते गेल्या वर्षात मालामाल कसे झाले, त्यांची संपत्ती कशी वेगाने वाढली, त्यांनी मोठ्या मालमत्ता खरेदी कशा केल्या व त्यासाठी पैसे कोठून आणले याचा शोध घेणे गरजेचे आहे. विश्वस्तांचे काही नातेवाईक मोक्याच्या ठिकाणी कर्मचारी म्हणून कसे काम करतात, हासुद्धा तपासाचा मुद्दा आहे. मंदिरात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची संपूर्ण नावे, त्यांच्या वडिलांचे नाव किंवा त्यांचा पू्र्ण निवासी पत्ता यांची ट्रस्टकडे नोंदच नाही. ज्या देणग्या येतात त्यांची अचूक नोंद ठेवण्याची पद्धतच नाही. गेल्या अकरा महिन्यांत ट्रस्टकडे वेगवेग‌‌ळ्या माध्यमातून ८३ कोटी जमा झाले आहेत. त्यापैकी ५५ कोटी दानपेटीतून जमा झाले आहेत. मंदिराकडे जमा होणारे सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती यांचा हिशेब कुठे आहे? त्यातले दागदागिने किती गायब झाले वा चोरीला गेले? राममंदिरासाठी देशातील सर्व भागातून श्रद्धाळू भक्तांनी चांदीच्या वीटा पाठवल्या होत्या, किती आल्या, कुठे ठेवल्या व हिशेब कुठे आहे?

काँग्रेस पक्षाने तर राममंदिर देणगी घोटाळ्याची सर्वौच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी केली आहे. उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर राममंदिर लुटारू हे नवे बाबर आहेत असा टोला लगावला आहे. ठाकरे म्हणतात- राम मंदिरासाठी शिवसेनेने चांदीच्या वीटा दिल्या होत्या, त्याचे काय झाले माहित नाही. शिवसेनेने एक कोटींची देणगी दिली होती, तिचा वापर झाला की नाही, हे ठाऊक नाही. राममंदिरात जे काही चालले आहे हे भंयकर आहे. भाजपाचे हिंदुत्व मंदिर लुटणारे आहे… ठाकरे यांनी काल रामरक्षा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत मतांसाठी भाजपाने राममंदिराच्या मुद्द्यावर प्रचार केला. रामाच्या नावावर मते मागितली. मंदिरातील चोरांना आता चंदा चोर म्हणून हिणवले जात आहे. या चंदा चोरांना अद्दल घडायलाच हवी!

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आरशात बघणार तरी कधी उद्धव ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री कोलकात्याच्या रायटर्स बिल्डींगमध्ये बसला म्हणून पक्षाने मोठा...

भाजपाशी केलेल्या दगाफटक्याची फळे भोगताहेत उद्धवजी!

मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेना स्थापन केली. बाळासाहेबांच्या करारी आणि लढाऊ नेतृत्त्वाने शिवसेना नेहमीच धगधगत राहिली. मुंबईतील मराठी माणसाला ताठ मानेने उभे करण्यामागे ठाकरे व त्यांनी स्थापन केलेली शिवसेनाच होती. माझा...

दीर्घकाळ सत्तेत राहूनही काँग्रेसचे टिळक भवन लिफ्टविना!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्यावतीने मुंबईत दादर येथील टिळक भवन या मुख्यालयात, भारतात येणारी आर्थिक सुत्नामी या विषयावर नुकतेच चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, दिल्लीच्या जेएनयुमधील अर्थशास्त्राचे प्रा. अरूणकुमार, अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र...
Skip to content