Homeडेली पल्ससहभागी व्हा 'आविष्कार',...

सहभागी व्हा ‘आविष्कार’, या संशोधन महोत्सवात!

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही ‘आविष्कार’, या राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याकरीता ५ डिसेंबर २०२५पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करता येतील. महाराष्ट्रातल्या विद्यापीठ स्तरावर उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळावी म्हणून शैक्षणिक वर्ष २००६-०७पासून राज्यस्तरीय संशोधन महोत्सव ‘आविष्कार’ची सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी या संशोधन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यानिमित्त प्र. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, हा एक अविभाज्य घटक आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे डॅाक्टर आणि संशोधक आहेत, ज्यांच्या हाती समाजाच्या आरोग्याची जबाबदारी असेल. आविष्कार-२०२५,  हा केवळ एक वार्षिक कार्यक्रम नाही, तर वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य निश्चित करणारा एक महत्त्वपूर्ण मंच आहे. आविष्कारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनमूल्ये रुजवली जातात. सखोल संशोधनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये आणि प्रभावी विश्लेषणात्मक व संवादकौशल्ये विकसित होतात. ही कौशल्ये आज जागतिक स्तरावर अत्यंत फायदेशीर ठरतील. पदवी, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी मोठया संख्येने आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रकल्प सादर करावेत. या महोत्सवात सादर होणारे संशोधन भविष्यात आरोग्यसेवेत मोठे परिवर्तन घडवून आणतील.

याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीस चालना देणे आवश्यक आहे. संशोधनामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या नवीन क्षेत्राचे आकलन होते तसेच समाजामध्ये असलेल्या विविध समस्यांवर उपाय शोधण्यास ते सक्षम बनतात. ‘आविष्कार-२०२५’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनकौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कौशल्याचा आणि विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास होईल.

या स्पर्धेसाठी आहेत सहा विषय-

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांचे तीन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. पदवी विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थी. त्यांना या सहा विषयांमध्ये संशोधन प्रकल्प सादर करता येतील.

१. कला, भाषा आणि ललित कला
२. वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, श्रेणी
३. शुद्ध विज्ञान, श्रेणी
४. कृषी आणि पशुसंवर्धन, श्रेणी
५. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, श्रेणी
६. वैद्यकशास्त्र आणि फार्मसी

प्रत्येक सहभागीला २०० शब्दांत संशोधन सारांश/शोधनिबंध/प्रकल्प सादर करावा लागेल, ज्यात प्रकल्पाचे उद्देश (Aim), उद्दिष्टये (Objectives), गृहितक (Hypothesis), साहित्य व पद्धती (Materials & Methods), निकाल (Result) आणि निष्कर्ष (Conclusion) या बाबींचा समावेश असावा.

स्पर्धेच्या वेळी, सहभागीने १ मीटर X १ मीटर पलेक्सवर तयार केलेला पोस्टर किंवा कार्यरत/स्थिर मॅाडेल सादर करणे आवश्यक आहे. पोस्टर किंवा सादरीकरणावर महाविद्यालयाचे, विभागाचे किंवा विद्यार्थ्यांचे नाव उघड करु नये. एका प्रकल्पासाठी एकाच संशोधकाला सादरीकरणाची परवानगी आहे.

प्रवेशिका सादर करण्यासाठी ऑनलाइन लिंकः https://automation-muhs-ac-in/, प्रवेशिका सादर करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास, कार्यालयीन वेळेत खालील क्रमांकावर संपर्क साधावा- भ्र.क्र.: ८०८७९९५८८३ किंवा ९९६०६९७८८३  ई-मेलःmuhs-application-helpdesk@gmail-com

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ०५ डिसेंबर २०२५पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका स्वीकारल्या जातील.

Continue reading

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...
Skip to content