“व्हनी तो चेतवारे| चेतवीताच चेतीतो||”…
टाइप भाषण करून समाज थोडाच बदलणार आहे?? चळवळ हवी..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे काल रात्री शिवतीर्थावर गुढी पाडव्याच्या निमित्ताने दणक्यात भाषण झाले, हे मान्यच केले पाहिजे. दोन वर्षांनंतर शिवतीर्थावर मेळावा होत असल्याने मोठी गर्दी होणार हे ठरलेलेच होते. राज ठाकरे यांच्या राजकारणाबाबत वाद असतीलही. परंतु ते क्राऊड पुलर आहेत, हे मान्य केलेच पाहिजे. त्यातच कोरोना काळानंतर निर्बंधमुक्त वातावरणात जाहीर सभा होत असल्याने मनसे सैनिकांनी गर्दी केली नसती तरच नवल होते. राज यांनी केलेल्या राजकीय टीकाटिपण्णीबाबत सध्यातरी मी काही बोलणार नाही. ज्या राजकीय पक्षांवर त्यांनी टीकाटिपण्णी केली आहे ती मंडळी राज यांना उत्तर देण्यास समर्थ आहेत.
राज यांनी आपल्या भाषणातील बराच वेळ मतदार अथवा समाजावर खर्ची घातला होता. एका वेगळ्या अर्थाने काहीशा सौम्य भाषेत, त्यांनी मतदारांवरील नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. जे राजकीय पक्ष मोठमोठी आश्वासने देऊन निवडून आल्यावर मतदार वा समाजाकडे चक्क पाठ फिरवतात तरीही नेहमीच जनता त्यांच्यामागे जाते, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या संबंधात नारायण कुलकर्णी-कवठेकर यांनी एका कवितेत फार वर्षांपूर्वी म्हटले आहे…
“पाहात राहा नुसते फतवे
रोज नवे नवे;
म्हणू नकोस तयांना फसवे
काढ थोडी कळ
आणून चंद्रबल
(हात येतील दुखून
पण मिळणार नाही दाद,
या नव्या जहागिरदारांच्या राज्यात
फक्त नकारघंटा)
कवीला खरोखरच सलाम! आजची तंतोतंत परिस्थिती कित्येक वर्षे आधी त्याला दृगोचर झाली.

सध्याचे प्रमुख राजकीय पक्ष तुमच्याकडे फक्त मताचा जोगवा मागायला येतात आणि आपले काम झाले की, तुम्हाला ते ओळखही दाखवत नाहीत. वेगवेगळी कटकारस्थाने करायची. जनतेला त्यात गुंतवून ठेवायचे. जनतेच्या प्रश्नांना हातच लावायचा नाही. हे दुष्टचक्र गेली अनेक वर्षे या राज्यात आणि देशात सुरू आहे. तरीही जनतेच्या लक्षात हे येत नाही. आम्ही नाशिकला केलेला विकास जनतेला दिसला नाही आणि त्यांनी जुनाट राजकीय पक्षाचे ऐकून आमचा पराभव केला, ही सलही त्यांनी बोलून दाखवली.
समाजात वा मतदारांमध्ये सतर्कता आली पाहिजे, तो अजून सजग झाला पाहिजे याबद्दल दुमत असू शकत नाही. परंतु राजसाहेब, समाज सजग होण्यासाठी समाज ढवळून काढणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाला हे जुनाट राजकीय पक्ष कसे चुना लावतात हे पटवून द्यावे लागेल. त्यासाठी मनसेची खळखट्याक स्टाईल कामाची नाही. पण हा काही एकट्या मनसेचा प्रॉब्लेम नाही. थोड्याफार फरकाने प्रत्येक राजकीय पक्षाकडे समजूतदार कार्यकर्तेच उरलेले नाहीत. आता फक्त पगारी कार्यकर्ते उरले आहेत आणि यांना उद्या दुसऱ्या पक्षाने जादा पगार दिला तर तत्त्व वगैरे सोडून ते दुसऱ्या पक्षाचा हात धरतील. यात नवल ते काय? कारण कार्यकर्ते काय किंवा समाज काय असेच म्हणत असतो…
“मी तुमच्यासमवेत कड्यावरून उडी टाकणार नाही
पुसू देत — वाळवंटातल्या पाऊलखुणा
पुसल्या गेल्या असतील तर
मी परत येईन..
असा अनिच्छेचा कडेलोट स्वीकारण्यापेक्षा
मी मृगजळाच्या आशेने
वाळवंटात टाचा घासून मरण पसंत करीन..”
समाजमनाची मानसिकता जर इतक्या टोकाची झाली असेल तर तुम्ही-आम्ही करणार तरी काय?
राजसाहेब, तुमची चिंता, तुमची तळमळ, तुमची तडफ समजू शकते. परंतु समाजच बदलायला तयार नसेल तर कोण काय करणार? शिवाय दरवेळेस समाजाला बोल लावत बसलात तर समाजच भाषण ऐकायला येणार नाही किंवा आले तरी तुम्ही सांगितलेले काही ऐकणार नाही. राज यांच्या भाषणाने एक मात्र जरूर केले ते म्हणजे माध्यमांची तोंडे बंद केली. गेले सात-आठ दिवस राज ठाकरे आयोध्येला कधी जाणार याची तारीख जाहीर करणार.. असा घोषा लावला जात होता. असो. आता नजीकच्या काळात होणाऱ्या मतदानातून या भाषणाने समाजाचे मत आणि मनपरिवर्तन किती झाले ते समजेलच!!

