Homeएनसर्कलपत्रकारांचा हसतमुख मित्र...

पत्रकारांचा हसतमुख मित्र नागेश फोवकार हरपला!

नागेश कृष्णराव फोवकार याचे बुधवारी सकाळी निधन झाले. गेली सुमारे अडीच-तीन वर्षे तो बराच आजारी होता. स्ट्रोकमुळे बिछान्याला खिळून होता. मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. व्हीलचेअरवर बसून काही काळ तो घरभर फिरतही असे. पण अचानक दुखणे वाढले आणि त्यातच त्याचे निधन झाले. सदा हसतमुख आणि धावपळीत असलेल्या नागेशला बिछान्यावर पाहून अस्वस्थ व्हायला होत असे. कोरोनामुळे त्याला एक-दोनदाच भेटता आले. तेव्हा त्याचे केविलवाणे डोळे, त्याची अस्वस्थता सांगूनच गेले. वाढत्या दुखण्यामुळे तो मानसिकदृष्ट्या बराच खचला होता.

नागेश आणि माझी मैत्री गेली 40/45 वर्षे अखंड होती. नागेश फोवकार माझाच मित्र होता असे नाही, तर त्यावेळच्या पत्रकारितेत जे छोटेमोठे पत्रकार होते त्यांचाही तो मित्र होताच! अनेक राजकीय नेते आणि मंत्रालयातील ज्येष्ठ तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांशीही त्याचे मैत्रीचे संबंध होते. काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार गुरुदास कामत यांच्या नात्यातील असूनही त्याने कधी ‘शाईन’ मारली नाही किंवा गुरूच्या प्रचारासाठी काही वेगळे प्रयत्नही केले नाहीत.

नागेशचे कार्य केवळ पत्रकार आणि राजकीय नेत्यांच्या वर्तुळात फिरणारे नव्हतेच. तो वडाळा येथील जीएसबी गणपती तसेच राम मंदिराशी संबंधित होता. गेल्या काही वर्षांत राम जन्मोत्सवाला आपल्या देशात सर्वत्र महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु नागेशने वडाळा येथे पूर्वीपासून राम जन्मोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. तो भक्ती करायचा. परंतु दररोजच्या जीवनात केवळ भक्तीने काही होत नाही, आर्थिक बळ असेल तर भरारी घेण्यास पंखात बळ येते हे तो पक्के जाणून होता. म्हणूनच प्रथम त्याने पतपेढी सेवा सुरू केली आणि कालांतराने नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत बँकेकडे (एनकेजीएसबी) आपला मोर्चा वळवला. गेली 27 वर्षे तो या बँकेचा संचालक होता. मध्यंतरी तीन वर्षे तो या बँकेचा उपाध्यक्षही होता.

गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मदत करण्याससाठी तो शुश्रूषा रुग्णालयाशी संबंधित झाला. तेथेही त्याने संचालकपद भूषवले होते. इतकेच नव्हे तर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारत उभारणीतही त्याचे योगदान होते. माझी त्याची मैत्री घनिष्ठ होण्याचे प्रमुख कारण माझी पत्रकारिता! उमेदीच्या काळात सोर्स किंवा सूत्र मिळवण्यासाठी फक्त राजकीय नेत्यांशी मैत्री करून भागत नाही. मंत्रालयातील व मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तुमच्याशी बोलणे गरजेचे असते. अधिकारीवर्ग तर पत्रकार म्हटले की मख्ख चेहऱ्याने ‘नो कॉमेंट’ इतकेच म्हणून तुम्हाला कटवणार. याच वेळी नागेशची मदत झाली.

नुसते त्याला सांगितले की, अमुकतमुक अधिकारी दाद लागू देत नाही. त्याला असे सांगितल्यावर मी विसरूनच जात असे. परंतु एकदोन दिवसांनी ऑफिसमध्ये नागेशचा फोन यायचा. तुला तो अधिकारी हवा होता ना? त्याला जाऊन भेट. सगळी माहिती मिळेल. पण लक्षात ठेव, ‘चावटपणा करायचा नाही..’ असे ठणकवायला तो विसरायचा नाही. अशाप्रकारे मी कित्येक अधिकाऱ्यांच्या गोटातील माणूस बनलो होतो. लोकसत्तेच्या विद्याधरअण्णा गोखले आणि माधवराव गडकरी यांच्याशी नागेशचे ‘खास नाते’ होते.

“Truly great friend are hard to find, difficult to leave and impossible to forget” याच जातकुळीचा नागेश होता. सिव्हिल इंजिनिअर होता. अनेकांना घरबांधणीत मदत केली. पहिली काही वर्षे तो शापुरजी पालनजीमध्ये होता. पण नोकरी करणे त्याच्या रक्तात नव्हते. काही वर्षांतच त्याने शापुरजीला रामराम ठोकला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एकट्याच्या ताकदीवर यशस्वी करून दाखवला. “ठेचकाळून पडताना सावरणारा हात म्हणजे मैत्री..”. आता मला सावरायला कधीच येऊ शकणार नाही.. याचे अतीव दुःख.. फक्त दुःख..

Continue reading

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची 'प्रतिमा' बदलणार! दरवेळेस 'पिछवाडा' काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे 'पिछवाडा', 'मादxxx', 'घुसा देंगे', 'दादीके मय्यतमे नहीं आये...
Skip to content