यावेळी हज यात्रेकरूंच्या वैद्यकीय सेवेसाठी 356 डॉक्टर आणि पॅरामेडिक्स नियुक्त करण्यात आले होते. यावेळी सुमारे 2 लाख बाह्यरुग्ण विभागांची निर्मिती करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल दिली.

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल नवी दिल्लीत, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, “हज यात्रेसाठी वैद्यकीय सेवा व्यवस्था” नावाचे एक दस्तऐवज प्रकाशित केले. त्यावेळी ते बोलत होते. जेद्दाहमधील भारताचे महावाणिज्य दूत मोहम्मद शाहिद आलम दूरदृश्य प्रणालीमार्फत कार्यक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर भागधारकदेखील यावेळी उपस्थित होते.

या दस्तऐवजात आरोग्यसेवांचा आराखडा आणि यात्रेकरूंना त्या सेवांचा कसा लाभ घेता येईल याची माहिती देण्यात आली आहे. या वर्षी भारतातील सुमारे 1,75,025 यात्रेकरूंनी हज यात्रा केली. त्यापैकी अंदाजे 40,000हून अधिक यात्रेकरू 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. या वर्षीच्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी यात्रेकरूंना चोवीस तास आरोग्यसेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षापासून मुख आरोग्य आणि दंत आरोग्यसेवादेखील आरोग्य सेवेमध्ये जोडल्या गेल्या आहेत. वैद्यकीय पथकांनी यात्रेकरूंच्या गटांना भेटी देण्यासह या वर्षी जवळपास 2 लाख बाह्यरुग्ण विभाग उघडण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने एक लाइव्ह पोर्टल विकसित केले गेले आहे. हे पोर्टल वैद्यकीय सेवांची गरज असणारे यात्रेकरू आणि त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा यांचा रियल टाईम डेटा आणि विश्लेषण प्रदान करते. यामुळे आम्हाला आमच्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात मदत होईल, असेही चंद्रा म्हणाले.