Homeटॉप स्टोरीभारताविरोधात पाकिस्तान युद्ध...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग पाडण्यासाठी आवश्यक असलेली लष्करी कारवाई करावी, अशी भूमिका भारताने घेतल्याचे दिसत आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे तर टेरीटोरियल आर्मीची मदत घेण्यास केंद्र सरकारने लष्कराला परवानगी दिली आहे.

काश्मीरमधल्या पहेलगाम येथे मुसलमानेतर पुरुष पर्यटकांची अतिरेक्यांकडून झालेल्या निर्मम हत्त्येनंतर या अतिरेक्यांना तसेच त्यांच्या आकांना धडा शिकवण्यासाठी भारताने सहा तारखेच्या मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केली. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधल्या अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये काही कुविख्यात दहशतवादीही मारले गेले. मसूद अजहरचा भाऊसुद्धा त्यात मारला गेला. यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने सात तारखेच्या रात्री तसेच आठ तारखेच्या रात्री भारतातल्या नागरी वस्तींवर तसेच काही प्रमुख महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा हा प्रयत्न विफल केला. सात तारखेच्या रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील एका गावावर अंधाधुंद गोळीबार करत तिथल्या 16 नागरिकांना ठार केले. पाकिस्तानच्या या भूमिकेला सडेतोड उत्तर देताना भारतीय सैन्याने अगदी थेट इस्लामाबादपर्यंत धडक देत पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. पाकची तीन लढाऊ विमाने पाडण्यात आली, त्याचप्रमाणे पाकिस्तानची संरक्षण क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली निष्प्रभ करण्यात आली.

काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्या वतीने संपूर्ण ऑपरेशनची माहिती देण्यात आली. यावेळी सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या भूमिकेला एकमुखी पाठिंबा जाहीर केला. आज सकाळी राजनाथ सिंह यांनी सर्व सैन्य दलाचे प्रमुख अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी तसेच हवाई दलप्रमुख अमर प्रीत सिंह यांची बैठक घेऊन पुढच्या रणनीतीवर चर्चा केली. गृहमंत्री अमित शाह यांनीही एक उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातल्या सर्व विमानतळांची सुरक्षा तसेच सीमावर्तीय राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. युद्ध झाल्यास कोणती उपाययोजना केली पाहिजे याबाबत यावेळी चर्चा झाली. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनीही एक उच्चस्तरीय बैठक घेत देशातल्या विविध रुग्णालयांमध्ये असलेल्या औषध तसेच रक्ताच्या साठ्याची माहिती घेतली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत सायबर हल्ल्यापासून बँकांचे संरक्षण कसे करायचे यादृष्टीने चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तान

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून दररोज वेगवेगळ्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा करून आपल्या देशाची भूमिका मांडत आहेl. आपला देश म्हणजेच भारत स्वतःहून आक्रमण करत नाही तर पाकिस्तान करत असलेल्या आगळीकीला चोख प्रत्त्युत्तर देत आहे, असे सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. भारताची सध्यातरी भूमिका ‘आले अंगावर तर घेतले शिंगावर..’ अशीच असल्याचे म्हणावे लागेल. भारताकडून स्वतःहून पाकिस्तानवर हल्ले केले जात नसले तरी पाकिस्तानची एकूण भूमिका पाहता भारतानेही युद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून लष्कराला टेरिटोरियल आर्मीची मदत घेण्याची मुभा देण्यात आली आहे. टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना. या सेनेत सर्वसामान्य नागरिक त्यांची नोकरी सांभाळत सैन्यात दलात आवश्यकतेनुसार सहभाग नोंदवतात. या सहभागासाठी त्यांना लष्कराकडून प्रशिक्षण दिले जाते. पण आर्थिक मोबदला दिला जात नाही. हा आर्थिक मोबदला ते ज्या आस्थापनांत नोकरी करतात त्या आस्थापनांकडून दिला जातो. 1948पासून भारतात टेरिटोरियल आर्मी कार्यरत आहे. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर असेच एक जवान आहेत. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोणीही टेरिटोरियल आर्मीचा मानद जवान आहे. सर्व राज्यांनी त्यांच्यात्यांच्या राज्यात सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेऊन आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून (काही अपवाद वगळता) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या रजा अजूनपर्यंत रद्द करण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे भारत आक्रमणाच्या भूमिकेत आल्याचे संरक्षणविषयक जाणकार मानत नाहीत. मात्र एकूण सगळ्या हालचाली लक्षात घेऊन भारत कधीही युद्धाला सामोरे जाऊ शकतो.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content