Homeन्यूज अँड व्ह्यूजठेवी शाबूत राखण्याचे...

ठेवी शाबूत राखण्याचे आव्हान मुंबईच्या आयुक्त पेलतील का?

महाराष्ट्रात आयएएस पोस्टिंग झाली की प्रत्येक अधिकाऱ्याची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव हे स्वप्न असते. त्याचबरोबर आयपीएस अधिकाऱ्याची पोस्टिंग महाराष्ट्रात झाली की त्यांचे स्वप्न मुंबई शहराचे पोलीस आयुक्तपद हे असते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपद नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयातल्या अतिरिक्त सचिव आणि मेट्रो वुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारीच त्यांनी मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. काही बिहारी अधिकाऱ्यांनी कट करून भूषण गगराणी यांना त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयातून जाण्यास भाग पाडले. मात्र त्यांच्यासाठी ती इष्टापत्ती ठरली. त्यानंतर त्यांची नियुक्ती थेट नगरविकास सचिव (१) या महत्त्वाच्या पदावर झाली. नितीन करीर यांच्यासारख्या दिग्गज अधिकाऱ्याला मुंबई महानगरपलिकेच्या आयुक्तपदाने हुलकावणी दिली. मात्र भूषण गगराणी यांना ही संधी मिळाली.

खरे म्हणजे भूषण गगराणी यांचे गुण तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी ओळखले होते. सध्याचे संभाजीनगर आणि त्यावेळेचे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना भूषण गगराणी यांनी तयार केलेल्या राज्यातील सरपंचांच्या अहवालाबाबत खूप चर्चा झाली होती. अतिशय मेहनती आणि प्रामाणिक अधिकारी अशी गगराणी यांची महती होती. नारायण राणे यांनी प्रथम भूषण गगराणी यांना सिंधुदूर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आणले. त्यानंतर मुख्यमंत्री होताच त्यांनी गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयात आणले. 1999 साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गगराणी यांची कार्यशैली पाहून आपल्या कार्यालयात कायम ठेवले. पुढे सिडकोचे महाव्यवस्थापकीय संचालक आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना भूषण गगराणी यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

मुंबई

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात भूषण गगराणी यांना घेतले. परंतु एका बिहारी अधिकाऱ्याने कट करून गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालय सोडण्यास भाग पाडले. पुढे ते नगरविकास सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. मराठीतून आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भूषण गगराणी यांनी महापालिकेचे प्रशासक असताना काही वेगळा ठसा उमटवला नाही. शांत आणि राजकारण्यांना न दुखावणारे अशी त्यांची ख्याती असल्याने मुंबई महापालिकेतील त्यांची कामगिरी चमकदार झाली नाही. त्यांच्याच काळात मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या. विकासकामांसाठी ठेवी वापरताना असलेल्या ठेवींमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. याला कारणीभूत फक्त आयुक्त म्हणून गगराणी जबाबदार नाहीत तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हेसुद्धा जबाबदार आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत जकात बंद झाल्यानंतर विकासकामातून मिळणारा प्रीमियम एवढाच महापालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. मुंबई सोडून मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका डबघाईला आल्या आहेत. शिवसेनेचे सरकार असताना महापालिकेच्या ठेवी वाढल्या होत्या. त्याचे श्रेय निश्चितच उद्धव ठाकरे यांना द्यावे लागेल. साडेचारशे फुटाच्या आतील सदनिकांना मालमत्ता कर माफ करताना महापालिकेच्या ठेवी वाढवणे ही फार जिकिरीची गोष्ट होती. ती उद्धव यांच्या सेनेने साध्य करून दाखवली होती.

नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. मुंबईचा विकास करताना भविष्यात महानगरपालिका वाचवायची असेल तर असलेल्या ठेवी शाबूत ठेवणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. प्रामाणिक आणि शिस्तीच्या जोरावर त्यांनी मुंबईच्या मेट्रोचे काम प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे. आता मुंबईला एका वेगळ्या टप्प्यावर देऊन मुंबईसाठी भविष्यात आर्थिक तरतूद करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. हे आयुक्तपद म्हणजे काटेरी मुकूट आहेच, पण या काटेरी मुकुटाचे संधीत कसे रूपांतर करणे हे नव्या आयुक्तांच्या हाती आहे.

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आहेत. संपर्क- 9892514124)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

चमत्कार को नमस्कार! भय्यू महाराज ते कॅप्टन खरात!!

2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू...

राज्यसभेची सातवी जागा आणि महाविकास आघाडीतली बेकी!

राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 16 मार्चला या निवडणुका होत असून राज्यातून सात खासदार नव्याने राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रायगडमधील पेणचे धैर्यशील पाटील, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि...

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे पानीपत!

नगरपरिषदेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडीने पराभूत मनोवृत्तीत लढवल्याने अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला यश मिळाले. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सोमवारी, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाले, ज्यात महायुतीने (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) स्पष्ट विजय मिळवला....
Skip to content