Homeचिट चॅटओडिसी नृत्यगुरु शुभदा...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शुभदा वराडकर यांना २०२४-२५ या वर्षासाठी नृत्य क्षेत्रातील ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते १३ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

भारतातील ओडिसी नृत्याच्या अग्रगण्य कलाकार, नृत्यदिग्दर्शिका, संशोधक, लेखिका आणि गुरु म्हणून शुभदा वराडकर सुपरिचित आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी अविरत साधना केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कलासाधनेचा गौरव संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२४ या प्रतिष्ठित सन्मानाने करण्यात आला आहे. त्यांनी प्रारंभी गुरु मणी यांच्याकडून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आणि पुढे पद्मविभूषण गुरु केळुचरण महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिसी नृत्याची सखोल साधना केली. त्यांच्या नृत्यात तांत्रिक कौशल्य, लयबद्ध सौंदर्य, भावपूर्ण अभिनय आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा सुरेख संगम आढळतो.

खजुराहो नृत्य महोत्सव, ताज महोत्सव, कालिदास महोत्सव, नेहरू सेंटर, लंडन, फेस्टिव्हल ऑफ इंडिया, घाना तसेच मुंबईतील एनसीपीए यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘मृत्युंजय’, ‘कानुप्रिया’, ‘चित्रांगदा’, ‘मयूरपंख’, ‘ऋतुसंहारम्’ आणि ‘प्रकृती नर्तन’ यांसारख्या त्यांच्या नृत्यनिर्मितींमधून शास्त्रीय नृत्य, साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान आणि समकालीन विचारांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. त्या एक अभ्यासू लेखिका व संशोधक असून ‘मयूरपंख’, ‘द सेलेस्टियल प्लूम’ आणि ‘ओड्र मागधी ते ओडिसी – एक प्रवास’ यांसारख्या साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत. संस्कृता फाउंडेशनच्या माध्यमातून त्या कला, संस्कृती, शिक्षण आणि समाजोपयोगी कार्याला चालना देत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देत त्या ओडिसीची परंपरा पुढील पिढीकडे समर्थपणे सुपूर्द करीत आहेत. नृत्य ही केवळ त्यांची कला नसून ती त्यांची साधना, संस्कृतीची उपासना आणि आयुष्यभराची अध्यात्मिक यात्रा आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content