Homeमाय व्हॉईसअमितभाई, खरं कुणाचं??

अमितभाई, खरं कुणाचं??

“Alliances, to be sure, are good, but forces of one’s own are still better”, या निष्कर्षापर्यंत भारतीय जनता पक्ष आला असेल तर त्यात चूक काहीच नाही. राजकीय पक्षाने असाच विचार केला पाहिजे. परंतु मग आपण पूर्वी जे युती वा आघाड्यांचे राजकारण केले त्यावेळी मदत करणाऱ्या पक्षांना सर्वस्वी दूर करून आपल्या स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची ठरवले पाहिजे. परंतु भाजप असे करताना दिसत नाही, असे खेदाने म्हणावे लागत आहे. मागच्या आठवड्याच्या प्रारंभी देशाचे गृहमंत्री व भाजपचे प्रमुख नेते अमितभाई शाह मुंबईत आले होते. राज्यातील भाजपचे प्रमुख नेते, आमदार, खासदार तसेच माजी नगरसेवकांच्या बैठकीला त्यांनी संबोधित केले. अमितभाईंनी यावेळी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. १९च्या राज्य विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती केली असतानाही निवडणूक निकालानंतर शिवसेनेने युती मोडून वेगळी वाट धरल्याचा शाह यांना राग येणे स्वाभाविक आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्वादीशी हातमिळवणी करणे भाजपला मुळीच पसंत पडलेले नव्हते. याचाच वचपा शाह यांनी आपल्या भाषणात काढला.

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचा आदेशच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला भुईसपाट करण्याचा आदेशही त्यांनी दिला. विश्वासघातकी उद्धव यांना महापालिकेच्या सत्तेबाहेर फेका असाच एकूण सूर त्यांच्या भाषणाचा होता. भाजप नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांना हुरूप यावा आणि ते अधिक जोमाने कामाला लागावेत असे प्रमुख नेत्याला वाटणे श्रेयस्कर आहेच. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका येतात तेव्हा अशाच आक्रमक शैलीत बोलत असताना खंजीर खुपसणाऱ्या आरोपाला उद्धव यांनी दिलेल्या उत्तरात आणि त्यावरही भाजप नेत्यांनी त्यांना दिलेल्या उत्तरात जाण्याचे हे ठिकाण नाही. तसेच त्याची गरजही नाही. परंतु ज्या पक्ष बैठकीत अमितभाईंनी उद्धव ठाकरे यांच्या दलबदलू विरोधात जहाल टीका केली त्याच बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मात्र मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला होता.

मुंबई महापालिकेवर भाजपला आपला झेंडा फडकवयाचा आहे हे आतापर्यंत उघड झाले आहे. त्याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना गट किती मदत करेल हे निवडणुकीत दिसेलच. शिवाय भ्रष्टाचाराच्या आरोपांना शिवसेना कशाप्रकारे उत्तर देईल हे आपण सर्व पाहणारच आहोत. परंतु वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. गेल्या तीन वर्षांआधी सुमारे २५ वर्षे महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचेच राज्य होते. स्थायी समितीसह इतर प्रमुख समित्यांमध्ये शिवसेनेबरोबर भाजपलाही सदस्यत्व होते. महापालिकेचा आर्थिक कारभार हाकणाऱ्या स्थायी समितीमध्ये काही वर्षे आशिष शेलार यांचेही सदस्यत्व होते. महापालिकेतील भाजपचे अन्य नेतेही स्थायी समितीत होते. शेलार यांचे सख्खे भाऊही स्थायी समितीचे सदस्य होते. माझ्या आठवणीप्रमाणे ना आशिष शेलार वा त्यांच्या भावाने भ्रष्टाचाराचा मुद्दा कधी उपस्थित केला नाही, ना याबाबत शेलार यांनी कधी पत्रकार परिषद घेतली. मागील युतीच्या काळातही मुख्यमंत्री फडणवीस व तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यासंबंधात एक चकार शब्दही बोललेले आठवत नाही.

समजा.. एकनाथ शिंदे आता याबाबत बोलू लागले तर शिवसेना वा इतर पक्ष शिंदे यांच्या गटाच्या नगरसेवकांनी कसा धुमाकूळ घातला होता हे बाहेर काढतील आणि याला ठाणे भाजपचे काही माजी नगरसेवक माहिती पुरवतील. म्हणजे येत्या सहा-आठ महिन्यांत राज्यातील जनतेच्या कानावर भ्रष्टाचाराच्या सुरस आणि चमत्कारिक कथाच पडणार आहेत. हल्ली जनता हुशार झालेली आहे. म्हणून याला जनता किती प्रतिसाद देईल याबाबत शंका वाटते. भाजपचे एकहाती सत्ता मिळवण्याचे ध्येय आहे आणि त्यात जर ते यशस्वी झाले तर शिंदे गटाला ते  मोठा अंगठा दाखवतील यात तिळमात्र शंका नाही. शिवाय आजकाल राजकीय पक्षांना अनामिक ‘भयाची’ चिंता वाटून राहिली आहे…

“जगताना भय| भय मरताना

भयाचाच पान्हा| सोडीलासी

भय इतरांचे| भय माझे मला

भयाचाच झाला| स्वर्ग मोक्ष” (विंदा)

अशी एकूण परिस्थिती असताना उदधव यांना जमीन दाखवा काय आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे काय, जनता फक्त ऐकणार. ती तरी बिचारी काय करणार.. मुकी बिचारी कुणीही हाका!!

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content