Homeमुंबई स्पेशलमुंबईत १ एप्रिलपासून...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट-काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही यामध्ये समाविष्ट आहे. मुंबईत २०२५मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले होते. १ हजार ४६० झाडांवरील जाहिरात फलक हटविण्यात आले होते. यासोबत झाडांवरील तब्बल १७.४३ किलो खिळे काढण्यात आले होते. या अभियानामुळे वृक्षांना आवश्यक पाणी व प्राणवायू मिळून सुदृढ वाढ होण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, वृक्षांच्या मुळांभोवती काँक्रिट असल्यास पाणी जमिनीत मुरत नाही, परिणामी मुळांची वाढ खुंटते आणि झाडे कोमेजण्याचा धोका वाढतो. खिळे, वायर व जाहिरातफलकांमुळे झाडांच्या खोडाला इजा होऊन भविष्यात झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होते. जनजागृती करणे, हे वृक्ष प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारीही यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, उपलब्ध संसाधनांचा वापर करुन ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content