Homeमाय व्हॉईसदेवेंद्रभाऊ, नेत्यांमधल्या कार्यकर्त्यांचे...

देवेंद्रभाऊ, नेत्यांमधल्या कार्यकर्त्यांचे आता क्रियाकर्मही झाले!

“आंख मे पानी रखो…

होटो पे चिंगारी रखो…

जिंदा रहना है तो…

तरकीबे सारी रखो”…

देवेंद्रभाऊ… राहत इंदोरी यांच्या या ओळी आठवायचे तसे काही खास कारण नव्हते. पण, यानंतरच्या काही ओळी मात्र मार्मिक आहेत. शिवाय प्रत्येक राजकीय पक्षाला लागू आहेत. विशेषतः सत्तारूढ पक्षाला (मग तो कोणताही असो…) 

“ये जरुरी हैं की आखों का भरम कायम रहे…

निंद रखो या न रखो ख्वाब मेयारी रखो”…

याच न्यायाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाशिक मुक्कामी भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी जोरदार भाषण केले. पक्ष कार्यकर्ते आणि नेते यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी भाषणे आवश्यक असतात आणि देवेंद्रभाऊ भाषणकामात वाकबगार आहेत, हे नव्याने सांगायला नकोच. देवेंद्रभाऊंचा उठताबसता नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क येत असणार. हजारो नेते त्यांच्या नजरेखालून जात असणार. म्हणूनच काही बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

देवेंद्रभाऊ, आजकाल तुम्हाला कार्यकर्ते दिसतात का हो? प्रामाणिक उत्तर द्या. जाहीर नका देऊ… पण, तुमच्या मनाला तरी याचे उत्तर द्या. कठीण आहे. आपल्यासमोरचे नेते कधी आणि कोणत्या शिड्या वापरून वर गेले आणि वर जाताक्षणीच त्या शिड्या कुचकामी करून गेले. शिवाय, नेतेपदाचा टिळा एकदा लागला की तो नेता काही निवृत्त होण्याचे नावच काढत नाही. मंत्रालयात एक साधी चक्कर जरी मारली तरी मत्र्यांच्या आजुबाजूला कार्यकर्त्यांऐवजी छोट्यामोठ्या नेत्यांनीच गर्दी दिसून येते. कुठलाही राजकीय पक्ष याला अपवाद नाही. सत्तारूढ पक्षात याचे प्रमाण सर्वात जास्त असते. इतकाच काय तो फरक. त्यातूनही देवेंद्रभाऊ… इतके थेट बोलण्याचे कारण म्हणजे अमरावती शिक्षक मतदारसंघात झालेला भाजपाचा दारुण पराभव कुजवलेल्या मतांचीच संख्या सात-आठ हजारांवर गेल्याने झाला. त्याने सर्वांनाच अंतर्मुख होण्याचा सल्ला दिला आहे.

त्यानंतर मात्र त्यांनी निवडणूक प्रचारसदृश्य भाषण केले. राज्य विधानसभेत २०० आमदार निवडून आणण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत यापेक्षा जास्त काय बोलणार? फक्त फरक इतकाच आहे की देवेंद्रभाऊंप्रमाणेच अन्य राजकीय पक्षही आपले रणशिंग फुंकणारच! “There are many men of principles in all political parties in India, but there is no party of principle” अस खेदाने म्हणायची वेळ देशात आली आहे, हे मात्र नाकरता येणार नाही. आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे भाषण केले हे समजून येतेच. त्याहीपेक्षा आगामी काही महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका निवणुकांवर भाजपाचा अधिक भर असणार हे सांगायला नकोच.

महापालिका निवडणुकांची तयारी म्हणून काही महापालिकांच्या कारभाराची कॅगकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्या चौकशीविषयी सध्या काही नाही, फक्त काही गोष्टी आठवल्या त्या नमूद करणे आवश्यक वाटते. कॅगची चौकशीही काही नवीन गोष्ट नाही. देवेंद्रभाऊंनी आपल्या पक्षातील काही ज्येष्ठ व अतिज्येष्ठ सदस्यांना विचारले तरी त्यांना कळून चुकेल. काँग्रेस सत्तारूढ असताना अनेक ठिकाणी काही नगरपरिषदा आणि नगरपालिकांमध्ये जनसंघ व भाजपा सत्तेत होते. जास्त लांब जायला नको. आपल्या जवळच्याच कल्याण-डोंबिवली नगरपरिषद वा नगरपालिकेत जनसंघ सत्तारूढ होता. तेव्हा तत्कालिन सरकारने त्याचीही चौकशी केली होती. कॅगच्या चौकशीत आक्षेप जरुर घेतले जातात, परंतु संबंधित प्रशासनाला त्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा हक्क असतो. अगदी तेव्हाही डोंबिवली आणि कल्याणच्या रस्तेदुरुस्ती आणि बांधणीविरूध्द आक्षेप घेण्यात आलेले होते.

हा सर्व आटापिटा मुंबई, ठाणे, पुणे आदि महापालिका निवडणुकांसंदर्भात केला जाणार आहे. हा संघर्ष सर्वच राजकीय पक्ष करणारच. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंगच फुंकले असून घोरपड महापालिकेच्या बुरुजावर सोडलीही आहे. ती घोरपड पकड घट्ट करते की, थेट खालीच येते हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होईल. भाजपा जसा प्रयत्न करणार तेव्हढाच नेटाचा प्रयत्न शिवसेनेचा ठाकरे गट करणार. आरोप-प्रत्यारोप तर होणारच.

थोडक्यात काय तर एकेकाळचे सख्खे मित्र कट्टर शत्रू कसे होतात, हे अधिक तीव्रतेने कळून येईल. जाता जाता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक सूचक वाक्य आठवले व अनायासे ते सापडलेही… ते असे “I do not write off any political party.. I believe in strengthen the BJP and wining election and not depending on writing of parties”. राजकीय नेत्याचे हे विधान आहे. किती गांभीर्याने घ्यायचे ते विविध राजकीय पक्ष आणि जनतेने ठरवायचे आहे. या सर्वांमध्ये आपण कशाला पडायचे? नाही का?

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content