Homeमाय व्हॉईससिद्धू.. अब बोलिए.....

सिद्धू.. अब बोलिए.. छा गये गुरू और ठोको ताली!

नवज्योतसिंग सिद्धूने प्रांताध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याहीपेक्षा काँग्रेससाठी अधिक धक्कादायक घटना होती ती माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट. जर कॅप्टन साहेबांनी भाजपाबरोबर हातमिळवणी केली तर तो पंजाबसाठी मोठा भूकंप ठरणार आहे. कारण त्या निर्णयामुळे 2022च्या सुरुवातीलाच फेब्रुवारी-मार्चमध्ये  होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

सध्या भारतीय जनता पार्टीला पंजाबमध्ये फारशी आशा नाही. तिथे त्यांना जो काही सत्तेचा वाटा मिळाला होता तो अकाली दलामुळेच होता. पंजाबच्या 117 सदस्यांच्या विधानसभेत सध्या काँग्रेस 80 सदस्यांसह प्रचंड मोठा पक्ष आहे. पण पक्षाच्या सरकारविरोधी असणारे जनमत, सिद्धूविरुद्ध कॅप्टन या खेचाखेचीत दुबळी झालेली पक्षयंत्रणा आणि सध्या तिथे सुरू असणारी पक्षाची हास्यास्पद अवस्था, यामुळे पुढच्या निवडणुकीत काय होईल सांगणे कठीण आहे.

2012पासून सत्तेत असणाऱ्या अकाली व भाजपा दोघांनाही 2017मध्ये जनतेने फेकून दिले होते. अकालींचे 14 तर भाजपाचे फक्त दोन आमदार तिथे सध्या आहेत. त्यामानाने सोळा आमदारांचा पक्ष असणाऱ्या आपकडे विधानसभेतील विरोधी बाकाचे नेतृत्त्व आहे. पंजाबमधील हिंदू काही प्रमाणात भाजपाबरोबर असले तरी तिथल्या सर्वात मोठ्या व प्रभावी अशा शिख समुदायामध्ये भाजपाला स्थान नाही. मोदी-शाहांकडे शिख समाजातील एकही महत्त्वाचा व मोठा नेता नाही. जर कॅ. अमरिंदर सिंग भाजपाकडे वळले, तर तो भाजपासाठी फार मोठा विजय असेल. अद्याप माजी मुख्यमंत्र्यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यांनी शाहांची भेट घेतल्यानंतर जे ट्वीट केले त्यात शेतकरी आंदोलनात तोडगा निघावा, यासाठीच ती भेट होती असा दावा केला आहे.

शेतकरी आंदोलनाला आता वर्ष होत आले आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागेच घेतले पाहिजेत, यासाठी शेतकरी हट्टाला पेटले आहेत. त्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पठिंबा आहे की नाही अथवा देशभरातील शेतकरी त्या आंदोलनाबरोबर आहेत की नाही हा प्रश्न आता निरर्थक ठरतो आहे. कारण पंजाब व हरयणामधील हजारो शेतकरी आंदोलनात आहेत व त्यांनी दिल्लीच्या सीमा आजही जाम करून ठेवल्या आहेत. ही फार मोठी गोष्ट झाली आहे. त्याचे देशातच नव्हे तर तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिणाम भारताला भोगावे लागत आहेत. त्यामुळे या चिघळलेल्या व दोन्ही बाजूंनी अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या प्रश्नातून तोडगा निघाला तर तो भाजपा नेतृत्त्वाला हवाच असेल हेही उघडच आहे.

अमरिंदर सिंगांच्या निमित्ताने ते झाले तर बरे असेच भाजपा नेते म्हणत असतील. पण हे कायदे मागे घेणार नाही ही भूमिका केंद्र सरकारने घट्टपणे धरली आहे. सध्या ते कायदे दीड वर्षांसाठी स्थगित केले आहेत. ही स्थगिती कॅप्टन यांच्या मध्यस्थीने आणखी वाढवली जाऊ शकेल. जर शेतकरी कॅप्टनवर भरवसा ठेवून आंदोलनापासून हटणार असतील तर तेही केंद्र सरकार आनंदाने करेल. पण कॅप्टन यांनी शाह यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींना खणखणित इशारा दिलेला आहे की भाजपात जाणे हा एक पर्याय मला खुला आहे.

आम आदमी पार्टी सध्या पंजाबमधील या रहस्यपटाकडे बारीक लक्ष ठेवून आहे. कारण सर्वात अधिक फायदा आपला होईल. काँग्रेसने एकाचवेळी चांगले काम करणारे, चांगली प्रतिमा असणारे मुख्यमंत्री गमावले आणि त्याचवेळी प्रांताध्यक्ष म्हणून गाजावाजा करून सिंहासनावर बसवलेले सिद्दूही पळाले. सिद्धू यांची प्रसिद्धी क्रिकेटपेक्षाही हास्यप्रधान अशा टीव्हीतील कार्यक्रमांतील सहभागासाठी अधिक आहे. तिथे ते महागुरूच्या आसनावर बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या टपलीत मारण्याचे उद्द्योग करतानाच, छा गये गुरू आणि ठोको ताली ही लोकप्रिय वाक्ये फेकत असत. आता त्याच अनुषंगाने समाजमाध्यमांतून सिद्धूच्या काँग्रेसलाच धोबीपछाड देण्याच्या वागण्या-बोलण्यावर टीकेचे प्रहार केले जात आहेत.

राहुल गांधी सध्या कँग्रेसचे माजी व कदाचित भावी अध्यक्ष म्हणून वावरत असतात. त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी वाड्रा पक्षाच्या सरचिटणीस आहेत. या दोघांनी मिळून कॅप्टन साहेबांची उचलबांगडी केली. त्याआधी कॅप्टननी प्रखर विरोध करूनही सिद्धू यांना प्रांताध्यक्ष म्हणून बसवले. नवज्योतसिंग सिद्दू हे अस्थिर गृहस्थ आहेत. त्यांना स्वतःच्या टीव्ही पडद्यावरून वाढलेल्या प्रतिमेच्यापलिकडे काहीही दिसत नाही व त्याहीपेक्षा सिद्धू हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत असे अमरिंदर सिंगाचे प्रमुख आक्षेप होते व ते आजही त्याच बाबी सांगत असतात. सिद्धूंनी अचानक पदत्याग केल्यानंतर कॅप्टन यांचे ट्वीट असेच आले की बघा हेच तर मी तुम्हाला सांगत होतो!

क्रिकेटर म्हणून सिद्धूंची कामगिरी चमकदार होती. त्यांनी 1987मध्ये पाच वर्षांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना थेट शतक झळकावले होते. पण राजकारणाच्या विकेटवर मात्र सिद्धूंची डाळ तितकी शिजली नाही. त्यांनी अमृतसरमधून भाजपाच्या तिकिटावर दोन वेळा निवडणूक जिंकली. पण 2014मध्ये त्यांना दूर सारून तिथे अरूण जेटलींना पक्षाने संधी दिली. तेव्हा सिद्धू भडकले व पक्षाने दिलेली राज्यसभेची जागा दीडच वर्षात सोडून 2017मध्ये ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसमधून त्यांनी आमदारकी मिळवली व कॅप्टन साहेबांच्या मंत्रिमंडळात ते पर्यटन मंत्री बनले. पण सुरवातीपासूनच या दोघांचे जमलेच नाही. सिद्धूंनी मंत्री म्हणून, केंद्र व राज्य सरकारांची परवानगी नसतानाही, पाकिस्तानात जाण्याची संधी घेतली व तिथे पाक लष्करप्रमुख बाजवांच्या कानात काही बोलून, मिठीही मारली. ती दृष्ये भारतीयांना आजही त्रास देतात.

कॅप्टन अमरिंदर सिंगांनी सिद्धूविरोधात जे तोफगोळे अलिकडे सोडले त्यात पाकबरोबरच्या अशा वाह्यात दोस्तीचा मुद्दा प्रमुख होता. पंजाबसारख्या पाकिस्तानी सीमेवर असणाऱ्या राज्यात सिद्धूसारखा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, कारण तो राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचा आहे, असा घणाघातच माजी मुख्यमंत्र्यांनी केला. कदाचित त्यामुळेच सिद्दूच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेचा अकाली बळी गेला. ती जखम वागवतच चन्नींच्या शपथविधीत सिद्धू सहभागी झाले. पण आठवड्याभराच्या आताच पद सोडून मोकळे झाले.

पंजाबच्या भवितव्यासाठी पंजाबी जनतेच्या भल्यासाठी मला पदाची फिकीर नाही असे ते सध्या सांगत आहेत. पण आपण राजीनामा दिल्याबरोबर राहुल वा प्रियंका धावत चंदीगढला येतील व आपली समजूत काढतील अशी जर आशा सिद्धूंना असेल तर ती विफल ठरली आहे, असेच म्हणावे लागेल. करण चन्नी यांच्या शपथविधीला हजेरी लावून राहुल गांधी कुलू-मनालीमध्ये सुट्टीसाठी गेले होते. सिद्धूच्या राजीनाम्यावर कोणतीही प्रतिक्रिया राहुल यांनी दिलेली नाही. ते थेट केरळमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. सिद्धू आता हिरमुसले होऊन वाट पाहत असतील की आता पुढे काय करावे. पण काँग्रेसच्या एक प्रवक्त्या अलका लांबा यांनी पक्षाची प्रातनिधिक प्रतिक्रिया दिली आहे. अर्थातच हे माझे व्यक्तीगत मत आहे अशी दुरुस्तीही त्यांनी लगेचच केली. त्या म्हणतात की, सिद्धूंच्या राजकीय प्रवासाचा शेवट समोर आला आहे. त्यांनी आता परत आपल्या लाप्टर शोकडे वळावे. राजकारण तुमचे काम नाही!!

Continue reading

बंगालमध्ये यावेळी भाजपाने घातली नाही ‘दीदी’ला साद!

येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही...

गडकरींनी राबवले! मोदींनी रेटले!!

आखाती देशात युद्ध पेटल्यापासून जगाची चिंता वाढली आहे. गॅस आणि पेट्रोल, डीझेल यांची टंचाई केवळ भारतातच नाही तर युद्ध पेटवणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनाही जाणवू लागलेली आहे. अमेरिकन पंप तसे कोरडे वगैरे पडलेले नाहीत, पण तिथेही डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले आहेतच....

एकनाथ शिंदेंचा उधळलेला वारू रोखण्यासाठी देवाभाऊंचे ‘मिशन खरात’?

जगात "एपस्टीन" आणि राज्यात "खरात स्टिंग" अशी दोन प्रकरणा सध्या गाजत आहेत. कदाचित युद्ध सुरू आहे एपस्टीनवरून लक्ष वळवण्यासाठी. खरात स्टिंगवरून लक्ष उडवण्यासाठी एखादं दुसरे वेगळे प्रकरण घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्ध लांबले तर "घरगुती गॅसचा तुटवडा" हे...
Skip to content