Tuesday, December 24, 2024
Homeमाय व्हॉईसठाण्याचे श्री मावळी...

ठाण्याचे श्री मावळी मंडळ नाबाद १००!

आज, १ ऑगस्टला ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आपल्या १००व्या वर्षात पदार्पण केले. खास करुन ठाण्याच्या क्रीडाक्षेत्रात मावळी मंडळाचे भरीव योगदान आहे. श्री मावळी मंडळाने सुरुवातीला हुतुतू आणि नंतर कबड्डी स्पर्धा सलग ७१ वर्षे आयोजित करण्याचा आगळा पराक्रम केला आहे. शतक महोत्सव साजरा करणाऱ्या श्री मावळी मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारा हा विशेष लेख.

मावळी

ठाण्याच्या क्रीडाविश्वात आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या श्री मावळी मंडळाने आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. १ ऑगस्ट १९२५ रोजी ब्रिटिश आमदानीत टेंभी नाका, धोबी आळी या परिसरातील स्व. शंकरराव यादव आणि शंकरराव भोईर या दोन ध्येयवेड्या तरुणांनी ‘मावळी मेळा’ या नावाने संस्था सुरू केली. तो काळ पारतंत्र्याच्या विरोधातील लढ्याचा होता. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार इंग्रजी साम्राज्याचा विरोध करीत होते. त्याचवेळी यादव आणि भोईर या तरुणांनी इतर तरुण मंडळींना एकत्र करून मावळी मेळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना चिमाजी उतेकर यांची मोलाची साथ मिळाली.

१९२६ साली व्यायामशाळा सुरू झाली. त्या व्यायामशाळेत व्यायामाबरोबरच लाठीकाठी, दांडपट्टा, भालाफेक या शस्त्रकलेचेही शिक्षण दिले जाऊ लागले. मैदानी खेळास सुरुवात झाली. हुतुतू, आट्यापाट्या, विटीदांडू, लगोऱ्या हे तेव्हाचे आघाडीचे खेळ सर्रास खेळले जाऊ लागले. या खेळाच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याचे मोठे काम यादव, भोईर, उतेकर यांनी केले. त्यामुळे हळुहळू कार्यकत्यांची एक मोठी फळी निर्माण झाली. सन १९४७ साली संस्थेने रुपये ४ हजार आणि कर्जाऊ रक्कम १२ हजार अशी एकूण १६ हजार रुपये रक्कम देऊन धोबी आळी येथे जागा विकत घेतली. जागा अत्यंत अडचणीची, टेपाड, दलदल अशी होती. परंतु कमी किंमत असल्याने ती घेण्यात आली. मग कार्यकर्त्यांनी प्रचंड अंगमेहनत आणि श्रम करून या जागेला वेगळी किनार दिली. या कामात स्त्रियादेखील जोमाने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक कार्यकर्त्याचे संपूर्ण कुटूंबच या जागेचे स्वरूप पालटून टाकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. त्यामुळेच चांगले मैदान तयार झाले. तसेच एका बाजूला व्यायामशाळेसाठी पत्र्याची शेड उभारली गेली. चांगले मैदान या जागी तयार करण्यात आले. संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत खेळ आणि व्यायाम या उद्देशाकडे कधीच डोळेझाक करण्यात आली नाही.

मग याच मैदानात देशी आणि मैदानी खेळाचा श्रीगणेशा सुरू झाला. १९५१ साली मावळी मेळ्याचे रुपांतर श्री मावळी मंडळ संस्थेत झाले. १९५८ साली संपूर्ण कर्जाची परतफेड करून संस्था कर्जमुक्त झाली. १९५१ साली संस्थेची एक इमारत उभी राहिली. संस्थेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. १९५२च्या शिवजयंती उत्सवाला महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी भेट दिली होती. १९५१ साली शिवजयंती उत्सवानिमित्त हुतुतूच्या स्पर्धा सुरू केल्या. त्यानंतर काही वर्षांनी हुतुतूची जागा कबड्डीने घेतली. सलग ७१ वर्षे या स्पर्धा नियमित सुरू आहेत. अशा स्पर्धा घेणारे महाराष्ट्रात किंवा कदाचित देशात श्री मावळी मंडळ ही एकमेव संस्था असावी. श्री मावळी मंडळाने मग ठाणे जिल्ह्याला एकापेक्षा एक सरस खेळाडू दिले. सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये असलेली व्यायामशाळा १९७७ साली अद्यावत उपकरणांनी सज्ज करून ती नव्या इमारतीत सुरू झाली. आज या व्यायामशाळेत नियमित १ हजारपेक्षा जास्त सभासद लाभ घेत आहेत. २००१मध्ये पुन्हा व्यायामशाळेचे नूतनीकरण करण्यात आले. २००२मध्ये महिलांसाठीदेखील विभाग सुरू करण्यात आला.

सुरुवातीला हुतुतू त्यानंतर कबड्डी स्पर्धेच्या दिमाखदार आयोजनाने स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. महाराष्ट्रातील प्रत्येक कबड्डी खेळाडूचे स्वप्न या स्पर्धेत खेळण्याचे असते. महाराष्ट्रातील अनेक नामवंत पुरुष आणि महिला संघांनी तसेच दिग्गज कबड्डीपटूंनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेचा लौकिक साऱ्या महाराष्ट्रात करून दिला. तसेच या स्पर्धेला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावून मावळी मंडळाच्या कार्याची दखल घेतली.

६ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी विविध खेळांचे प्रशिक्षणवर्ग श्री मावळी मंडळातर्फे राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, अॅथलेटिक्स, जिमनॅस्टिक्स या खेळांचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे शरीरसौष्ठव स्पर्धा आणि आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धा याचेदेखील दिमाखदार आयोजन मंडळातर्फे करण्यात येते. गेली १९ वर्षं आंतरशालेय क्रीडास्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जात आहे, तर सलग ३३ वर्षे शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात येते. कडक शिस्तीवर मंडळाने नेहमीच भर दिला आहे. चांगल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकत्यांची मोठी फौज मंडळाकडे असल्यामुळे मंडळाने गरुडझेप घेतली आहे असेच म्हणावे लागेल. ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींशी मंडळाचे प्रेमाचे संबंध असल्यामुळे मंडळाच्या विविध कार्यक्रमांना विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांची नेहमीच उपस्थिती असते. मंडळाला माजी खासदार स्व. प्रकाश परांजपे, ठाण्याचे माजी महापौर स्व. वसंतराव डावखरे, रेमंडचे विजयपथ-गोपालपथ सिंघानिया, बाळकृष्णजी केडीया, जे. के. फाईल्सचे संजीव शेट्टी, रुपचंद हजारीमल, कॉ. कृष्णा खोपकर, विमलताई रांगणेकर, के. डी. शाह, अकबर अली चोहान, अमृतलाल छगनलाल मिस्त्री, चौधरीसाहेब, वसंतराव महाडिक, रावसाहेब हनुमानबक्ष मुंदरा, श्यामजीभाई, अशोक टिळक, बोर्डे मॅडम, वि. ह. भुमकर यांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले.

२००५मध्ये मंडळाच्या स्वतःच्या शाळेचे स्वप्न पूर्ण झाले. सुरुवातीला हुतुतू, कबड्डी, शरीरसौष्ठव, अॅथलेटिक्स या खेळामध्ये मावळी मंडळाच्या खेळाडूंनी स्वतःचा असा एक ठसा उमटवला आहे. त्यांच्या हुतुतू, कबड्डी संघाने अनेक मानाच्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. ६०च्या दशकात त्या काळातील बलाढ्य हुतुतू संघांना नमविण्याची किमया अनेकदा मावळी संघाने केली. ७०च्या दशकात सुधीर यादव, नारायण शिंदे, नारायण जाधव, तुकाराम घाग, चिमाजी भोईर, अनंत पेंडसे, हेमचंद्र ओवळेकर, जोसेफ फर्नांडिस, पॅट्रिक्स फर्नाडिस, कृष्णा डोंगरे, दत्तात्रय देसाई, लिंगप्पा गौडा, विजय हजारे, पप्पड नलावडे या तरुण दमाच्या खेळाडूंनी त्यांचा कबड्डी खेळातील झेंडा सतत फडकवत ठेवला. आज हा झेंडा मिलिंद यादव, प्रशांत देशमुख, सुशांत पाटील, चिंतामणी पाटील, निशिकांत पाटील, अभिजित घारे, मेघराज खांबे, राजेश भिल्लारे, चेतन शिंदे, सागर शिंदे पुढे नेत आहेत. सुरुवातीला हुतुतू आणि त्यानंतर कबड्डी या खेळात मावळी मंडळाने दिलेले योगदान कोणीच क्रीडाप्रेमी विसरू शकणार नाही. याचबरोबर शरीरसौष्ठव, अॅथलेटिक्स या खेळावरदेखील संस्थेने भर दिला. अॅथलेटिक्समध्ये त्यांच्या स्वाती मोरे, दिप्ती वैद्य, महेश कोकरे, श्रेयस खाडे, दर्शन देवरुखकर, प्रथमेश तांडेल, अॅरॉन फिलिप्स, अथर्व परब, पुष्कर पाटील, गायत्री कसुला, साईशा पवार या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून मंडळाचे नाव उज्ज्वल केले. शरीरसौष्ठवपटू प्रदीप नाईक, संतोषे चिंचवडे, कौत्सुभ चव्हाण, प्रकाश मोरे, अमर इंदुलकर, समीर भालेकर, परेश जागडे, शुभम जामसुतकर, राहुल पेडणेकर, सुदर्शन वरंदेकर या खेळाडूंनी अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत शानदार यश संपादन केले. कबड्डीबरोबरच आता खो-खोतही मंडळाची प्रगती सुरू झाली आहे. प्रणय कमळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खो-खो पटू तयार होत आहेत. शुभम जाधव, तनिष्क फाटे हे युवा खो-खो पटू प्रकाश झोतात येत आहेत. डिएसओ आणि कुमार गटाच्या प्रत्येकी चार-चार स्पर्धा जिंकणाऱ्या संघात या दोघांचा समावेश होता. आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धेचेदेखील यशस्वी आयोजन गेली अनेक वर्षे मावळी मंडळ करत आहे. ठाणे जिल्ह्यात ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित करणारी मावळी मंडळ ही बहुदा एकमेव संस्था आहे.

संस्थेच्या या आजवरच्या यशस्वी वाटचालीत संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीची खूप मोठी मेहनत आहे. त्यामुळेच संस्थेने एवढी मोठी भरारी घेतली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. मावळी मंडळाच्या कार्याची दखल घेऊन काही संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. ठाण्याच्या क्रीडा इतिहासात मावळी मंडळाने दिलेले योगदान ठाणेकर क्रीडाप्रेमी कधीच विसरू शकणार नाही हे मात्र नक्की.

श्री मावळी मंडळाची कार्यकारीणी:

अध्यक्ष: सुधाकर मोरे, उपाध्यक्षः मिलिंद यादव, खजिनदारः दिनेश मोरे, चिटणीसः रमण गोरे, उपचिटणीसः संतोष सुर्वे, सहचिटणीसः चिंतामणी पाटील, कार्यकारीणी सदस्य: भगवान शिंदे, निलेश मुकणे, अतुल पवळे, मनिष मुंदरा, शैलेश उतेकर, मिलिंद कदम, सुशांत पाटील, हितेश म्हात्रे, किरण डोंगरे, अंतर्गत हिशोब तपासनीसः रिक्सन फर्नाडिस, प्रमुख विश्वस्तः स्व. सुधीर शंकर यादव, विश्वस्त मंडळ: जुगलकिशोर मुंदरा, प्रभाकर सुर्वे, कृष्णा डोंगरे, पेंट्रिक फर्नांडिस, रविंद्र आंग्रे, सुधाकर मोरे, केशव मुकणे.

6 COMMENTS

  1. अतिशय सुंदर 100 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल लेख तसेच सम्पूर्ण शाळेबद्दल आणि खेळा बदल शाळेने केलेला प्रयन्त आपण योग्य रीतीने आपल्या सम्पूर्ण लेखात अतिशय सुंदर पणे मांडलेत

    • अतिशय अप्रतिम संस्था, ज्या संस्थेचे कष्ट आणि प्रचंड मेहनत करण्याची ताकत आज संस्थेला 100पर्यंत पोहचऊ शकते.समाजउपयोगी कामे करत संस्था शताब्दी कडे पोहचलीya संस्थेचे वैशिष्ट हेच कि संस्थेकडे असणारे तरुण कार्यकर्ते आणि त्यामुळे संस्थेला कधी मागे वळून पाहावे लागलेच नाही….त्रिवार वंदन या मावळ्यांना

  2. खुप सुंदर लेख, अभिनंदन श्री मावळी मंडळ १०० वर्षे पूर्ण झाल्या बद्दल

  3. सुहास जोशी आपला श्री मावळली मंडळ शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त लेख अप्रतिम होता. गेल्या १०० वर्षातील आठवणींना उजाळा दिला. धन्यवाद

Comments are closed.

Continue reading

बुद्धिबळ विश्वाचा नवा जगज्जेता: दोमाराजू गुकेश!

सिंगापूर येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनवर भारताचा युवा बुद्धिबळपटू दोमाराजू गुकेशने अटीतटीच्या लढतीत शानदार विजय मिळवून बुद्धिबळ विश्वाला नवा जगज्जेता दिला. विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश विश्वातील केवळ १८ वर्षीय आणि योगायोग म्हणजे १८वा खेळाडू...

आशियाई हॉकीत भारताचेच वर्चस्व!

ओमान, मस्कत येथे झालेल्या ज्युनियर आशियाई कुमारांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून सध्याच्या घडीला आशियाई खंडात भारतीय हॉकी संघाचेच वर्चस्व असल्याचेच दाखवून दिले आहे. याअगोदर बिहार येथे झालेल्या महिलांच्या याच स्पर्धेत भारतीय महिला संघाने...

सर्वात तरुण आयपीएल करोडपती, वैभव सूर्यवंशी!

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात लहान वयात करोडपती होण्याचा मान बिहारचा सलामीचा युवा फलंदाज, अवघ्या १३ वर्षे १८८ दिवसांच्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने मिळवला आहे. आयपीएल स्पर्धेच्या क्रिकेटपटूंच्या बोलीकडे जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असते. कुठला संघ, कुठला...
Skip to content