Homeन्यूज अँड व्ह्यूजखाजगी व पूर्वायुष्याच्या...

खाजगी व पूर्वायुष्याच्या फेऱ्यात सापडणार का तामिळनाडूचे मुख्यमंत्री?

तामिळनाडूत विरोधी पक्षनेते उदयनिधी यांना अटक करुन तीनशे किलोमीटर अंतरावर नेण्यात आले होते. अगदी कालपरवा घडलेली घटना आहे. सत्ता हाती आली आणि डोक्यात गेली की कसे व्यक्त व्हावे याचा काही परिपाठ नाही, निकष नाहीत, पण उदाहरणे आहेत. आपला प्रतिस्पर्धी हा आपला शत्रू नसतो, लोकशाही व्यवस्थेत ती एक अपरिहार्य बाब आहे. सत्ता मिळवणे ही राजकीय पक्षाची गरज असली तरी ती हाती येते तेव्हा जबाबदारीदेखील येते हे लक्षात घ्यायला हवे. तामिळनाडूतील राजकारणात दोन प्रवाह गेली अनेक वर्षे होते. अलीकडे झालेल्या निवडणुकीत एक नवा प्रवाह आला. अभिनेते विजय सत्ताधारी झाले. डीएमके आणि एआयडीएमके हे दोन विरोधी पक्ष झाले. मुख्य विरोधी पक्ष म्हणून डाएमके आहे. फक्त विरोधी पक्षनेते उदयनिधी हे अभिनेता नाहीत, पण चित्रपटनिर्मिती क्षेत्रात हे कुटूंब आहे. करुणानिधी आणि जयललिता यांनी बराच काळ आलटून पालटून सत्ता प्राप्त केली. एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा जयललिता यांच्या हाती आला. त्यांनी एकहाती अनेक वर्षे लढा दिला. जयललिता यांचा विधानसभेत अवमान करण्यात आला होता. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी घडलेली ही घटना. आता मी सभागृहात मुख्यमंत्री होऊनच येईन, अशी घोषणा करुन जयललिता यांनी लढा सुरु केला आणि खरोखरच त्या मुख्यमंत्री म्हणून पुन्हा विधानसभेत दाखल झाल्या.

आपले आव्हान त्या विसरल्या नाहीत. संधी मिळाली तेव्हा त्यांनी 2001च्या सुमारास विरोधी पक्षनेते करुणानिधी यांना मध्यरात्री झोपेतून उठवून फरपटत नेण्याची व्यवस्था केली होती. हा सूड घेणारा प्रवास त्या दोन नेत्यांच्या निधनानंतर समाप्त झाला असे म्हणता येईल. पण आता नव्या राजकीय समीकरणात हा प्रवास पुन्हा सुरु होणार असे वाटत आहे. मुख्यमंत्री विजय यांच्यासंदर्भात बोलताना उदयनिधी यांनी काही शब्द वापरले आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केली. कोणाला अटक करणे हा प्रक्रियेचा भाग आहे, पण तीनशे किलोमीटर प्रवास करुन कोणाला घेऊन जाणे आणि कोर्टाने आदेश दिल्यानंतर सोडून देणे हा छळ. भारतीय राजकारणात हा प्रवाह नवा नाही. पण आगामी काळातील राजकारण लक्षात

तामिळनाडू

घेता तमिळनाडूत राजकारण कुठे जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ता टिकवून ठेवायची असेल तर मतदार सतत खूष राहयला हवा, हे तेथील सूत्र आहे असे दिसते. विजय यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात ते दिसून आले. सोने वगैरे वाटणे सुरु झाले आहे. त्याचे आर्थिक परिणाम आगामी काळात दिसतील. अर्थात महाराष्ट्रात लडकी बहीण वगैरे उद्योग आहेत आणि हजारो कोटी रुपये दरमहा वाटले जात आहेत. तमिळनाडू त्याला अपवाद नाही. पण विजय यांचा कमी अनुभव आणि वाढलेल्या अपेक्षा, तर दुसरीकडे उदयनिधी यांना गेलेली सत्ता कशी परत आणावी याची चिंता लक्षात घेता पुढील काळात तामिळनाडू कोणत्या दिशेने प्रवास करणार हा मोठा प्रश्न आहे. सुदैवाने स्टालिन यांची भूमिका समतोल आहे असे दिसते. पण दोन तरुण राजकीय नेत्यांनी आपले राजकारण मर्यादित ठेवले तर राज्याचे हित नक्की साधेल.

तामिळनाडूच्या राजकारणात दोन डीएमके पक्ष आपले अस्तित्त्व कसे टिकेल याची धडपड करत आहेत. यातील एआयडीएमके पक्षाची परिस्थिती फारशी चांगली नाही. कदाचित या पक्षातील आमदार सत्ताधारी पक्षाला जाऊन मिळतील. डीएमके आता उदयनिधी यांच्या ताब्यात आहे आणि त्यांची टोकाची मते लक्षात घेता आणि सत्ताधारी पक्षाची मानसिकता बघता आगामी काळात संघर्ष वाढेल, ही भीती आहे. नवे सरकार आणि नव्या अपेक्षा हे समीकरण वेगळे आहे. तरुण नेत्यांनी राजकारण ताब्यात घ्यावे इथपर्यंत ठीक आहे, पण जबाबदारी काय याचा विसर पडला की परिणाम वाईट असतात. आता तामिळनाडूच्या राजकारणात एक अभ्यासू नेते अण्णामलाई यांची भूमिका काय हा प्रश्न आहे. त्यांनी भाजप सोडून आपले वेगळे राजकारण सुरु केले आहे. या राज्यात काँग्रेस किंवा भाजप या दोन पक्षांना फार मोठी संधी नाही आणि भविष्यात ती मिळेल याची खात्री नाही. अण्णामलाई यांनी ही बाब लक्षात घेऊन पावले उचलली आहेत. बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून एक वेगळी दिशा दाखवली आहे हे खरे. इतरत्रदेखील नवे नेतृत्त्व अशा पद्धतीने उभे राहिले तर हवेच आहे. परिणाम असा की, घराणेशाही हा आधार असलेल्या राजकीय पक्षांच्या पुढील पिढ्यांवर मोठे राजकीय संकट निर्माण होणार आहे. उदयनिधी यांच्यासाठी ही एक चिंतेची बाब आहे. मात्र तामिळनाडूच्या राजकारणात आता काय आणि कशा घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी आणि त्यांचे पूर्वायुष्य हेही आगामी काळात महत्त्वाचे ठरेल असे वाटते.

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

सोनियाजींच्या आत्मचरित्राने काँग्रेसमध्ये होणार तीन सत्ताकेंद्रे!

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. इंग्रजी पुस्तकांना मोठा ग्राहक आहे. वाचकदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. हा प्रकाशनव्यवहार अगाध आहे. चेतन भगतसारखा भारतीय लेखक जगातील प्रमुख लेखकांमध्ये गणला जातो. मोठी प्रसिद्धी मिळाली की पुस्तक विकले जाते....

आरक्षणाचा मुद्दा व्यावहारिक कमी तर भावनिक जास्त!

आरक्षण या विषयावर अनारक्षित लोकांनी काही लिहिणे म्हणजे अंगावर आग्यामोहोळ ओढवून घेणे आहे. इतिहासात गेलो तर आरक्षण दहा वर्षे असावे अशी सुरुवात झाली होती. आता आठ दशके होऊन गेली. यासंदर्भात कधीकधी कोणी आवाज उठवत असले तरी कोणताही सत्ताधारी किंवा...

पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह, राहुल गांधींच्या रडारवर!

नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी पेलेट गनच्या विषयावर दिवसभर आंदोलन केले आणि अखेर पोलिसांनी औपचारिक गुन्हा दाखल केला. यातून काय निष्पन्न होईल ते काळ ठरवील. पण हट्टीपणाचे राजकारण हा राहुल गांधी यांचा पाया झाला आहे एवढे नक्की. राहुल गांधी...
Skip to content