मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण, विविध राजकीय कुरघोड्या, प्रमुख नेत्यांची घसाफोड भाषणे, चित्रपट वार्ता व जाहिरातींच्या मायाजालात सामान्य नागरिकांच्या समस्या मागे राहिल्या तर समजू शकतो असेच जणू माध्यमसम्राट तसेच वर्तमानपत्रांना वाटत असावे. महापालिका निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर आली असताना वर्तमानपत्रांनी उघडलेल्या या आघाडीकडे राजकीय नेते व प्रशासनाचे लक्ष जाईल की नाही याबाबत शंकाच आहे. असे असले तरी अशा उपक्रमांचे स्वागतच करायला हवे. यामुळे शहराच्या वनागरिकांच्या समस्या समजायला मदतच होते. त्या समस्या सुटतात की नाही, यापेक्षा या शहराच्या नागरिकांना त्यांच्या समस्या काय आहेत हे तरी कळून येते!
माईकचे बोडूक दिसले की राजकीय नेतेच नव्हे तर जनताही बरंच बोलू लागते! राजकीय नेते काहीही बोलत असतात असा आरोप नेहमीच केला जातो व खराही आहे. त्याच धर्तीवर माईक मिळाला की जनताही आपल्या समस्या व तक्रारींची टेप वाजवत असते. (बिचाऱ्यांच्या हाती तेव्हडेच असते.) टेप वाजवण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात दुसरे काहीच नसते हे मान्य केले तरीही सरकार व महापालिका प्रशासनाकडून विविध अपेक्षा करणारी ही मंडळी स्वतः कसे वागतात याचा गांभीर्याने कधी विचार करतात का? हा प्रश्न निर्माण होतोच! अशाच निवडणुकीच्या संदर्भाने आयोजित केलेल्या एका चर्चेच्यावेळी आमचे स्नेही, पोलीस उपायुक्त (वाहतूक-ठाणे) पंकज शिरसाठ यांनी ठाणेकरांना शिस्त व संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. ठाणेच नाही तर राज्यातील वाहतूककोंडीचे प्रमुख कारणच शिस्त नसल्याचे अधोरेखित करून उपायुक्तांनी हे आवाहन केल्याचे लक्षात घेतले पाहिजे. उपायुक्त पंकजरावांचे आवाहन कितीही उदात्त हेतूने व ठाण्यातील (इतरही ठिकाणचीही) वाहतूककोंडीबाबत अनुभवातून केलेले आवाहन पाहून खरंतर ठाणेकर वैतागला असल्याचे दिसून आले. आम्ही कशीही गाडी चालवू, तुम्ही आधी तुमची वाहतूक शाखा सुधारा असा टोमणा ठाणेकरांनी मारलाच! आम्ही कशीही कट मारू, सिग्नल तोडू, वाहतूककोंडी झाल्यावर बिनदिक्कतपणे पदपथावरून गाड्या चालवू, माजिवड्याच्या उड्डाणपुलावरून फक्त माझीच गाडी धावत असताना बाकीच्यांनी मध्येच लुडबूड करू नये, नियमात बसत असो वा नसो आम्ही सर्व दिशांनी गाड्या पुढे घुसवण्याचा आमचा ‘हक्क’ बजावणारच, विरुद्ध दिशेने वाहने चालवून आमचा हक्क आम्ही अबाधित ठेवणारच, मग त्याने म्हाताऱ्याकोताऱ्यांना त्रास झाला तरी हरकत नाही, अशी शेरेबाजीही कोर्टनाका, टेंभी नाका तसेच माजिवडा चौकाच्या परिसरात ऐकू येत होती.
ठाणे आणि मुंबई शहरातल्या वाहतूककोंडीबाबत याआधी बरेच लिहिले असल्याने त्याची पुनरावृत्ती करणार नाही. परंतु विविध प्रकारच्या बाईक्स व मोटारगाड्यांवर काही प्रमाणात निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे आणि त्यासाठी मोठी राजकीत इच्छाशक्ती आवश्यक आहे व तीच सध्या दिसत नाही. सामान्य माणूसही वाहतूककोंडी कशी वाढवतो हे पाहण्यासाठी मुंबई व ठाण्यातील काही प्रमुख शाळांबाहेर नुसते उभे राहिले तरी बरेच नमुने पाहवयास मिळतात. बरे, ही मंडळी तर शिकलेली असतात, काही तर अधिकारीही असतात. मुलांना शाळेत सोडताना वा शाळेतून आणताना ज्या पद्धतीने मोटारगाड्या व बाईक्स वाकड्या करून उभ्या केलेल्या असतात. त्यावर ही माणसे काहीच व्यक्त होणार नाहीत. अशाच पद्धतीने मुलुंड, भांडुप, मालाड

अशा अनेक स्थानकबाहेर गाड्या उभ्या केलेल्या असतात. याचा सामान्य माणसे व लोकप्रतिनिधी कधी विचार करून सामान्य माणसाला काही सुनावणार आहे की नाही? मुंबई आणि ठाणे शहराच्या काही भागात पोलीसयंत्रणा असो वा पालिकायंत्रणा असो, त्यांच्या नियमांना आव्हान देणारे काही सुपारीबाज सामाजिक कार्यकर्ते आहेत असे खेदाने म्हणावे लागत आहे. एकटा पोलीस अधिकारी कायदे तयार करत नाही. सरकार व संबंधित यंत्रणा त्यासाठी जबाबदार असतात. सरकार वा यंत्रणा यांच्याबाबत मात्र गुलुगुलू धोरण व अधिकाऱ्यांवर मात्र निशाणा, असे चालणार नाही. समाजानेही आशी आंदोलने मुळीच चालवून घेऊ नयेत.
पर्यावरणाबाबत सरकार काहीच करत नाही हा नेहमीचा आरोप झाला आहे. याचा अर्थ सरकारने उठसुठ झाडे तोडावीत असा नाही. झाडे तोडणे आणि पर्यावरणप्रेम यात मधली बाजू घेणे पसंत आहे. मुंबई आणि ठाणे परिसरासतील अनेक टेकडयांवर अगदी पायथ्यापासून तो टोकापर्यंत नखशिखान्त झोपड्या आहेत. त्याही एकदोन नव्हेत, हजारो झोपड्या आहेत. या झोपड्या तयार होत असताना या टेकड्यांवर अनेक अत्याचार झाले. लक्षावधी खिळे, खांब ठोकले गेले. ते खांब हलू नयेत म्हणून खोलवर ठोकले गेले. अशा लक्षावधी खांबांनी टेकडी पोखरली जात होती तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे होते, असे विचारावेसे वाटते. तसेच राज्य व केंद्र सरकारनेही सीआरझेड कायद्याबाबत सर्वांना बरोबर घेऊन विचारविनिमय करण्याची गरज आहे. सध्या असे चित्र आहे की, याबाबत मुंबईला वेगळे नियम, ठाण्याला वेगळे, कोकणात तर त्याहूनही वेगळेच नियम ही परिस्थिती विनाविलंब बदलली गेली पाहिजे. आपल्याकडील शहर नियोजनकारांनीही आपल्या नियोजन विचारात बदल करण्याची गरज आहे. “Don’t focus so much on single building as a fabric. If fabric is lost, we have a few heroic buildings in parking lots” हे लक्षात ठेवून नियोजनाची आखणी केली पाहिजे. नागरिकांनी ही उठसुठ राजकीय नेत्यांच्या मागे जाण्याची गरज नाही. कारण परिस्थिती बदललेली आहे. तुम्हाला तुमचे कायदे व फायदे जसे माहित असतात तशाच जबाबदाऱ्याही जाणून घेण्याची तसदी घ्या! हल्ली अनेक चॅनेल्समुळे जगभरात काय चालले आहे हे एका क्षणात सर्वत्र पोहोचते. या माहितीचा वापर करा, टिकेसाठी तसेच स्वतःमध्ये सुधार येण्यासाठीही….

