Homeटॉप स्टोरीआता घरबसल्या मिळवा...

आता घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ!

राज्य परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहेत. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने फेसलेस सेवेमार्फत अर्ज केल्यास, आहे त्या ठिकाणाहून किंवा घरबसल्या कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.  

यापूर्वी शिकावू परवाना (लायसन्स) काढण्यापासून ते नूतनीकरण, परवान्याची दुय्यम प्रत मिळविणे, नावात बदल, पत्ता बदल, लायसन्समधील वर्ग रद्द करणे व परवाना क्रमांकाची माहिती प्राप्त करणे आदी कामकाजासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुट्टी घेऊन जावे लागायचे. तसेच कार्यालयातही मॅन्युअल पद्धतीने कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहून वेळ लागायचा. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व वेळ वाया जाऊ नये, या उद्देशाने परिवहन विभागात ही फेसलेस सुविधा सुरू केली आहे.

दुचाकी, चारचाकी वाहन संदर्भातील दुय्यम प्रमाणपत्र काढणे, वाहन हस्तांतरण, वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, पत्त्यात बदल करणे, नावात बदल करणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनाची माहिती मिळविणे आदी कामकाजासाठी नागरिक कार्यालयात येतात. या फेसलेस सेवांमुळे आता नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची गरज नाही. तसेच वाहनांच्या कामकाजाबाबत वाहनांची सर्व माहिती ऑनलाईन असल्यामुळे त्यांना त्यांचे वाहनही कार्यालयात आणण्याची आवश्यकता नाही.

परिवहन विभागातील फेसलेस केलेली सेवा ही आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार क्रमांकाची मोबाईल क्रमांकाशी संलग्नता असणे आवश्यक आहे. नमूद सेवांचा लाभ कसा घ्यावा, यासंदर्भात तपशीलवार माहिती transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्राप्त होऊ शकते. सर्व लायसन्स, दुचाकी व चारचाकी या खासगी वाहनासंबधी सर्व सेवा आधार क्रमांकावर आधारीत पद्धतीने फेसलेस प्रणालीद्वारे सुरू झाल्या आहेत. फेसलेस सेवांसाठी परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in वर संपर्क करून नागरिकांनी जास्तीतजास्त सेवांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 022-24036221 व  ई-मेल आयडी rto.03-mh@gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई (पूर्व) चे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.  

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content