मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतला पहिला सी फूड प्लाझा, माहीम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा कार्यरत झाला आहे. शनिवार, २४ ऑक्टोबरपासून माहीम सी फूड प्लाझा येथे महिला बचत गटांचे हे स्टॉल्स कार्यरत झाले आहेत. हा सी फूड प्लाझा आठवड्यात दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार, अभिनेते कमलाकर सातपुते, मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई आदींच्या उपस्थितीत हा प्लाझा नव्याने कार्यरत झाला. पालिकेचे अधिकारी, बचत गटाच्या सदस्य महिला यावेळी उपस्थित होत्या. आकर्षक रंगसंगती, सेल्फी पॉइंट, आरामदायी आसनव्यवस्था आणि स्थानिक कोळी गीतांचा आणि पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या ठिकाणी सुशोभिकरण करतानाच महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटनवृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटीलगत सुरू करण्यात आला. मागील काही वर्षांपासून या सी फूड प्लाझाला हजारो पर्यटकांनी भेट दिली आहे. सी फूड प्लाझाच्या ठिकाणी आकर्षक अशा रोशणाई करण्यात आली आहे. नागरिकांना आणि पर्यटकांना सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी छायाचित्रं घेण्याचीही उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. या महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. व्यवसायकौशल्य विकसित होतानाच महिलांचे जीवनमान उंचावेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासोबतच विकासही होईल, याचा प्रयत्न मुंबई महापालिका करत आहे.

