एका वर्षात 21 लाखांहून जास्त फसवे दूरध्वनी क्रमांक उघडकीस

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) देशभरात एका वर्षात 21 लाखांहून अधिक फसवे दूरध्वनी क्रमांक उघडकीस आणण्यात आले असून याप्रकरणी एक लाखाहून अधिक संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. फसव्या दूरध्वनी क्रमांकांमुळे भरडल्या जाणाऱ्या ग्राहकांनी फसवणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक केवळ ब्लॉक न करता TRAI DND ॲपद्वारे स्पॅम आणि फसवणुकीसंबंधीच्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन ट्रायने सर्व मोबाईल वापरकर्त्यांना केले आहे.

नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींवरून कारवाई करत ट्रायने गेल्या वर्षभरात 21 लाखांहून अधिक मोबाईल क्रमांक आणि स्पॅम तसेच फसवे संदेश पाठवण्यात सहभागी असलेल्या सुमारे एक लाख संस्थांचे क्रमांक खंडित केले आहेत. हे क्रमांक काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. देशभरातील दूरसंचार सुविधेचा गैरवापर रोखण्यात वापरकर्त्यांकडून दाखल केल्या जाणाऱ्या सामूहिक तक्रारींची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावरून दिसून येत आहे. नागरिकांनी अधिकृत TRAI DND ॲपद्वारे स्पॅमची तक्रार केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणे शक्य झाल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.

जेव्हा एखाद्या वापरकर्त्याकडून TRAI DND अ‍ॅपवर स्पॅम कॉल किंवा एसएमएसची तक्रार नोंदवली जाते, तेव्हा ते प्राधिकरणाला आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांना संबंधित मोबाइल क्रमांक ट्रॅक करण्याची, त्याची पडताळणी करण्याची आणि ते कायमचे खंडित करण्याची मुभा मिळते. याउलट, तुमच्या फोनवर असे क्रमांक ब्लॉक केल्यास तो क्रमांक फक्त तुमच्या वैयक्तिक फोनवर लपवला जातो. त्यामुळे फसवणूक करणाऱ्याला नवीन क्रमांकाचा वापर करून इतरांशी संपर्क साधण्यापासून रोखले जात नाही, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

दूरध्वनी

नागरिकांसाठी सूचना:

१. अधिकृत ॲप स्टोअर्सवरून TRAI DND ॲप डाउनलोड करा.

२. गुन्हेगारांची ओळख पटवणे शक्य व्हावे तसेच त्यांचे क्रमांक खंडित करण्यास मदत म्हणून त्यांचे क्रमांक आपल्या फोनवर ब्लॉक करण्याऐवजी TRAI DND अ‍ॅपच्या मदतीने स्पॅम एसएमएस/कॉल्सची तक्रार नोंदवा.

३. दूरध्वनी कॉल, मेसेज किंवा समाज माध्यमावरून वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करणे टाळा.

४. तुम्हाला धमकी देणारा किंवा संशयास्पद कॉल आल्यास तो ताबडतोब डिस्कनेक्ट करा.

५. सायबर फसवणुकीची तक्रार 1930 या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in वर दाखल करा.

६. दूरसंचार संसाधनांचा गैरवापर करून फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची तक्रार संचार साथीच्या “चक्षू” या फीचरद्वारे नोंदवा.

ट्रायने सर्व नागरिकांना, खासकरून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि डिजिटल तंत्राच्या नवख्या किंवा कमी अनुभव असलेल्या वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे, ही सूचना सामायिक करण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद संदेशांची त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content