मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला केवल कुळकर्णीने निर्णायक क्षणी अचूक खेळ करीत ११-१० असे पराभूत केले. श्री नारायण गुरु हायस्कूलच्या उमैर पठाणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आदी विविध जिल्ह्यातील शालेय २०० खेळाडूंच्या सहभागाने दादर येथील सिबिईयु सभागृहात झालेल्या उपांत्य सामन्यात केवल कुळकर्णीने शिवांश मोरेचा तर उमैर पठाणने सोहम जाधवचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली होती. स्पर्धेमधील उपांत्य उपविजेते शारदाश्रम विद्या मंदिरचा सोहम जाधव व आयईएस चंद्रकांत पाटकर स्कूल-डोंबिवलीचा शिवांश मोरे तर उपांत्यपूर्व उपविजेते महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी, पार्ले टिळक विद्यालयाचा जयेश कांबळे, होली फॅमिली हायस्कूलचा चैतन्य पोमेंडकर, महिला मंडळ शाळेचा विराज बर्वे आदी ३२ जण पुरस्कारविजेते ठरले.
मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेनिमित्त तज्ञ राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सराव पूर्वतयारी विनाशुल्क उपक्रम मुंबईतील विविध ५ विभागात राबविण्यात आला होता. स्पर्धेच्या प्रमुख पंचाचे काम संतोष जाधव, चंद्रकांत करंगुटकर, ओमकार चव्हाण यांनी पाहिले. विजेत्यांना आकर्षक चषकासह टी शर्ट, स्ट्रायकर व भेटवस्तू पुरस्कार स्वरुपात देऊन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, नगरसेवक महादेव शिवगण, डॉ. जितेंद्र लिंबकर, विष्णू तांडेल, प्रकाश वाघमारे, अशोक नवले, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

