Homeटॉप स्टोरीमराठा सर्व्हेक्षणाला प्राधान्य...

मराठा सर्व्हेक्षणाला प्राधान्य द्या!

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले.

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, समितीचे सदस्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील, शंभूराज देसाई, आमदार बच्चू कडू, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारोती गायकवाड, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विविध विभागांचे सचिव त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्ह्यांचे जात पडताळणी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मागासलेपण सिद्ध करण्यासाठी बिनचूक सर्व्हेक्षण आवश्यक

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मागासवर्ग आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या या सर्व्हेक्षणाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांनी प्राधान्य द्यायचे असून आपापल्या जिल्ह्यात विशेष कक्षाच्या माध्यमातून कालबद्धरितीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नावली पाठवण्यात आली असून बिनचूक काम झाले पाहिजे. मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण उत्तम रीतीने होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल. सर्व्हेक्षणाव्यतिरिक्त इतर माहितीदेखील संकलित करणे गरजेचे आहे.

मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने काही त्रुटी उपस्थित केल्या होत्या. आता आपण करीत असणारे सर्व्हेक्षण बिनचूक आणि निर्दोष असणे गरजेचे आहे. न्यायालयात क्युरेटीव्ह याचिकेवरदेखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे हे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी लक्षात ठेवावे. सर्व्हेक्षणाचे महत्त्व लक्षात घेता प्रगणकांची संख्याही वाढवावी तसेच त्याना सर्व्हेक्षणाबाबत उत्तम प्रशिक्षण द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तम समन्वय ठेवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याच्या आणि आयोगाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. प्रारंभी सामान्य प्रशासन सचिव (साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची तसेच उपाययोजनांची माहिती दिली.

मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. गोखले इन्स्टिट्यूटतर्फे प्रश्नावली तयार करून ती जिल्ह्यांना देण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात सॉफटवेअर तयार करणे सुरू असून लवकरच प्रगणकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली. यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाला ३६७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मनुष्यबळ व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

न्या. शिंदे यांच्या शिफारशीवर चर्चा

यावेळी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी विशेषत: मराठवाड्यात कुणबी नोंदी अधिक प्रमाणात मिळण्यासाठी केलेल्या शिफारशींवरदेखील बैठकीत चर्चा झाली. हैद्राबाद येथे कुणबी नोंदीसंदर्भात उपलब्ध कागदपत्रांचा डिजिटल व इतर डेटा लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावा तसेच मोडी, फारशी, उर्दू कागदपत्रांचे भाषांतर वेगाने करून ते संकेत स्थळांवर अपलोड करावे जेणे करून सर्व संबंधितांना ते सहजपणे पाहता येईल व त्यांच्या कामी येऊन कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असेही निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content