Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या ९५९ महसुली...

महाराष्ट्रातल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील लोकांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले.

मुंबईत मंत्रालयातील वॉर रुम येथे मदत, पुनर्वसन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनील चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि. र. दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील उर्वरीत तालुक्यातील काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती ९५९ महसुली मंडळामध्ये देण्यात येतील, असेही पाटील म्हणाले.

राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता १ लाख लाभार्थ्यी शेतकऱ्यांना ५ लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली. जेणेकरून राज्यातील पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच जून २०१९मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेत पिकांच्या नुकसानीकरिता  मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने अस्तित्त्वात आलेली महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत, तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

१७८ तालुक्यातील ९५९ सर्कलमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर

अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळं, अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ७३, बुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील  ७०, वाशीम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१, यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील ९, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५०, बीड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५२, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३, जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यामधील १७, लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४५, नांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३, धाराशीव जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २८, परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ३८, नागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५, वर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६, अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६, धुळे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील २८, जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७, नंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुक्यातील १३, नाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४६, कोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २०, पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१, सांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७, सातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील ६५, सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ४६,  अशी एकूण १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली  आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content