केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे मुंबईत काल ‘भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग” या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद 2024, आयोजित करण्यात आली होती. तंत्रज्ञान क्षमता व वित्तीय संसाधनांना चालना देण्यात संस्थात्मक गुंतवणूकदार, हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि खासगी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका यावर ही परिषद केंद्रित होती. सरकारी प्रयत्नांना बळकटी, नागरी समाज आणि समुदायांना सहभागी करून घेणे आणि अनुकूलन तंत्रज्ञान व नवोन्मेषी हवामान सेवा विकसित करणे, हे यामागचे उद्दिष्ट होते. ‘ग्रीन क्लायमेट फंड रेडीनेस प्रोग्राम’ अंतर्गत सक्रिय भागीदार यूएनडीपी भारत यांच्यासह आणि ज्ञान भागीदार अवाना कॅपिटल यांच्या सहाय्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
पर्यावरण सचिव लीना नंदन, जी-20 शेर्पा अमिताभ कांत, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणाचे अध्यक्ष, के राजारामन, अमेरिकेचे महावाणिज्य दूत माईक हॅन्की आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच गोदरेज अग्रोव्हेटचे अध्यक्ष नादीर गोदरेज या उदघाटन सत्राला उपस्थित होते.
हवामान बदलामुळे होणाऱ्या तीव्र घटनांचा जागतिक परिणाम, एम. ओ. ई. एफ. सी. सी. च्या सचिव लीना नंदन यांनी अधोरेखित केला आणि त्वरित कृती, नियोजन आणि आर्थिक एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी हरित पत कार्यक्रमासह मंत्रालयाच्या कृतींची माहिती दिली. पर्यावरणस्नेही जीवनशैलीची (एल. आय. एफ. ई.) आठवण करून देताना त्यांनी नमूद केले की, ग्राहकांच्या माहितीपूर्ण निवडीसाठी इकोमार्क लेबलिंगची संकल्पना नव्याने शोधण्यात आली आहे. विमा आणि जोखीम कमी करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, हवामान स्टार्टअप्सना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना उद्योग आणि व्यवसाय प्रारुपापर्यंत वाढवणे यावर नंदन यांनी भर दिला. हवामान कृतीसाठी बायोमास वापर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या कृती लक्षणीय आहेत यावर भर देण्यात आला.