एका घरगुती समारंभानिमित्त गेल्या आठवड्यात कोकणात जायचे होते. आधी मला वाटले की महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती आहे, लगेचच आरक्षण, तिकीट मिळेल. माझा फुगा लगेचच फुटला. अधिस्वीकृती असली तरी काय झाले, रेल्वेकडे तशी नोंद आहें काय? अशी विचारणा झाली. मी नाही म्हणून सांगितले. राज्य सरकारकडे तशी नोंद असल्याने इतर ठिकाणी नोंद करण्याची गरजच नाही, असे वाटल्याने तसे केले नव्हते. मी नेहमीच रेल्वेने प्रवास करत नसल्याने इतका तपशील माहित नव्हता. पण हे जरा विचित्रच वाटते. कधीकाळी प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेत नोंद असणे गरजेचे आहे, असे मला, इतर अनेकाना वाटते. प्रथम, दुसरा व तिसऱ्या वर्गात ‘रीग्रेट’ असा शेरा मिळाल्याने काहीसा निराश झालो होतो. हो ना करताकरता जनरल डब्याचे तिकीट काढले. नेत्रावती गाडीचे जनरल डब्याचे तिकीट होते. जनरल डब्यात प्रवेश करणे किती जिकरीचे आहे हे मला घरच्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण आलेल्या परिस्थितीला तोंड न देता माघारी फिरेल तर तो विजयकुमार कसला? असा स्वतःलाच धीर देत माझ्या एका ‘हनुमाना’ला साद घातली. हनुमान संदीप म्हणाला- ‘साहेब चिंता नको, मी येतो बसवून द्यायला. काळजी नको, बसायला मिळेल’ असे आश्वासन मिळाल्याने मी काहीसा निर्धास्त झालो.
कत्ल का दिन आया. सकाळी ११ वाजल्यापासूनच मी ठाणे रेल्वेस्थानकात हजर झालो व संबंधित फलाटावर गेलो, तेव्हा मला चक्करच आल्यासारखे वाटले. म्हटलं इतक्या गर्दीत माझे मटकुळे डब्यात जाईलच कसे? पुन्हा बरोबर बॅग! मनात म्हटलं बहुतेक फलाटावरच राहू आपण. पण संदीप बेफिकीर होता. तो म्हणाला- तुम्हाला बसवून देणार म्हणजे देणारच! त्या गर्दीतही त्याचा आत्मविश्वास मला कौतुकाचा वाटला. गाडी आली. त्या छोट्याश्या दरवाजात एकच झुंबड उडाली. संदीप माझी बॅग घेऊन गर्दीला मुसंडी देत कधी आत घुसला व बॅग त्याने एका सीटखाली ठेवली हे त्याचे त्यालाच माहित. इतकेच नाही तर हे माझे काका आहेत, त्यांना बसायला जागा द्या, जरा बाजूला सरका असे डटावून सांगण्यासही तो विसरला नाही. अखेर मी स्थानापन्न झालो. गाडी हलली. गाडी सुरु झाल्यावर डब्यात जरा नजर फिरवली. आजूबाजूला मराठी व कोकणी माणसे होती. त्यातील काही म्हणाले- आजोबा काळजी नसावी. आम्ही रोह्यात उतरणार आहोत. आणखी जागा होईल. या प्रवासात आणखी एका व्यक्तीची मदत झाली. ती म्हणजे चिपळूण परिसरातील एका गावाचे पोलीस पाटील असलेले विनोद मोहिते, या व्यक्तीची! स्थानकातील जेमतेम दहा-पंधरा मिनिटांची काय ती ओळख, पण या विनोद यांनी संपूर्ण प्रवासभर माझी विचारपूस केली. इतकेच काय तर तेही चिपळूणलाच उतरणार होते. मला चिपळूण स्थानकाबाहेर घेऊन जाण्यास त्यांनी मदतही केली.

मात्र, काही टक्का सोडल्यास गाडीत सर्वजण परप्रांतीय विशेषतः उत्तरेतील तरुण मंडळी दिसत होती. बसायची बाके त्यांनी अडवलीच होती, पण सामान ठेवण्याच्या जागेवरही त्यांनी कब्जा मिळवला होता. तेथे तर ते चक्क पाय लांब करून झोपलेले होते. इतर स्थानकात चढणाऱ्या प्रवाशांना ते वर चढू देण्यास तयारच नव्हते. एकप्रकारे दादागिरीच समजा ना! ही सर्व परप्रांतीय तरुण मंडळी अवघ्या २० ते २२ वयोगटातील असावीत. अगदी गरीब वेष, काहीसा गबाळा अवतार. कुणा एजन्टबरोबर प्रवास करत असावेत असा संशय घेण्यास जागा. एजन्टने त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना विनातिकीट घेऊन मधल्यामध्ये पैसे हडप करण्याची त्यांची चालखी दिसून येत होती. म्हणजेच जनरल डब्यातील बहुसंख्य परप्रांतीय तरुण मुले विनातिकीट प्रवास करत होते. याचाच अर्थ कुर्ला टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर त्यांच्या तिकिटांची तपासणीच होत नाही. जनरल डब्यात येण्यास टीसीही घाबरतात. कारण या झुंडीने हल्ला केल्यास जीव जाण्याचा धोका…
गाडी सुरु झाल्यानंतर व गाडी स्थानकात थांबल्यानंतर मी दुसऱ्या व पहिल्या वर्गात फेरफटका मारला असता बऱ्याच ठिकाणी जागा रिकाम्या असल्याचे दिसत होते. मग प्रशासनाने रीग्रेट का कळवले असा प्रश्न पडला. शिवाय कोकणासाठी म्हणून असलेल्या या गाड्या पुढे गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ येते जात असल्याने नेहमीच कोकणवासियांना तिकीट काढताना त्रासाला सामोरे जावे लागते, अशी तक्रार अनेकांनी केली. कर्नाटक व पुढे दक्षिणेत हिंदी कोणच बोलत नाही. म्हणजेच ही परप्रांतीय मुले कोकणातच विविध ठिकाणी कामधंद्यासाठी उतरतात, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. थोडेतरी पैसे मिळतील या आशेने ही मुले येथे येतात. त्याचा राजकारणासाठी उपयोग केला जातो हे मात्र चुकीचं आहे. दरम्यान, चार-पाच तासांच्या प्रवासात कोकण परिसराची काही माहिती मिळाली. विशेषतः रायगड जिल्ह्यातील काही तालेवार नेते कसे वागतात याची झलकही काही प्रवाशांनी सांगितली. परप्रांतीय मुलांवरून जेव्हा चर्चा होत होती तेव्हा काहींनी रायगड जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या आलिशान बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून परप्रांतीयच असतात, असे आवर्जून सांगितले. काहींचे बंगले तर २५/३० एकरात वसवलेले आहेत. काही नेते समाजाच्या सर्व स्तरात जातात तर बाकीचे काही आपले इस्त्रीचे कपडे सांभाळत दुसऱ्याची चौकशी करत असतात. रायगड जिल्ह्यात एमआयडीसी आल्याने जमिनीचे भाव वाढले. मिळालेल्या पैशातून अनेकांनी मोठ्या इमारती बांधल्या. परंतु आता ही सर्व मंडळी रहिवाशांची वाट पाहात आहेत. अनेक इमारती ओसाड पडल्या आहेत…
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

