Homeमाय व्हॉईसअनिल डिग्गीकरांची कोटीच्या...

अनिल डिग्गीकरांची कोटीच्या कोटी उड्डाणे!

एका दैनिकात म्हाडा व महारेरासंबंधी दोन बातम्या सविस्तर आल्याने जरा बरे वाटले. म्हाडाच्या बातमीने तर सिक्सरच मारलेली आहे. यात अनिल डिग्गीकरांनी कोटीच्या कोटी उड्डाणे करुन सर्वांचेच लक्ष खेचले आहे. आता बातमी वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकासाबाबत असल्यावर ती सिक्सर मारणार हे ठरलेलेच होते. आता हा पुनर्विकास प्रकल्प सुमारे १५/२० वर्षे रखडलेलाच आहे. त्यात परत खासदार संजय राऊत यांना याप्रकरणी झालेल्या अटकेमुळे हे सर्व प्रकरणच गरम झाले होते. पुन्हा राऊत यांची जामिनावर सुटका व इडी यंत्रणेवर उच्च न्यायालयाने मारलेल्या ताशेऱ्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार इतर संशयितांची चौकशी काही सुरू झाल्याचे दिसत नाही किंवा ही चौकशी अदृश्य स्वरूपातही असू शकते.

याप्रकरणी एकच गोष्ट चांगली झाल्याचे दिसत आहे, ती म्हणजे ज्या इमारती पूर्ण झालेल्या आहेत त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने पारित केलेला आहे हा आदेश पारित करुनही महिना, दीड महिना लोटला आहे. परंतु जोर शोरसे गृहप्रवेश झाल्याच्या बातम्या अद्यापि दिसलेल्या नाहीत. एकूणच या आघाडीवर सर्वच अनिश्चितता दिसत असताना म्हाडाचे उपाध्यक्ष व कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी मात्र तीन हजार आठशे कोटी रुपयांच्या फायद्याचे इमले मात्र जोरशोरसे उठवले आहेत. अहो डिग्गीकर साहेब या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात इतके मोठे घबाड असल्याचे आधीच नाही का कुणाच्यातरी कानात सांगायचे? म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीप्रमाणे ‘सिंडिकेट’ नसते का केले या राजकीय नेत्यांनी?? मला तर तो आकडा उच्चारताही येत नाही. बरोबरच आहे हो आमच्या जिभेला असे काही ‘वळण’च नाही जमत हो… एक मात्र नक्की होणार आहे, ते म्हणजे येत्या दोन-तीन दिवसांत तुम्हाला देवेंद्रभाऊंचे बोलावणे नक्कीच येणार. अहो, कशाला म्हणून काय विचारता? मुंबई महापालिका निवडणूक आहे. त्यानंतर विधानसभा, लोकसभा निवडणुका लागोपाठ आहेत. कोट्यवधी रुपये लागणारच ना!!

 मत्रिमंडळाच्या नाही तरी किमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून ही सर्व आकडेवारी माझ्यातरी कानावर घालाविशी वाटली नाही? आणि एकदम वर्तमानपत्राकडे धाव? वर्तमानपत्रात जाहीर झालेली आकडेवारी आमच्या काही डोक्यात शिरलेली नाही. असे झाले तर तसे होईल आणि भविष्यात विकासक राजी होतील, अशी अपेक्षा आहे. अरे काय तुमची भाषा, मराठीत असूनही आमच्या खोपडीत काही शिरे ना!! अहो डिग्गीकर साहेब, अजूनही नऊ विकासकांचा वाद मिटलेला नसताना कोट्यवधींचे इमले तुम्ही इतक्या लवकर बांधलेत तरी कधी? आणि मुख्यमंत्र्यांना हे आवडेल काय? पुढील सहा महिने तुम्ही पत्रकारांशी बोलूच नका, असा आदेश काढतो मी आता! या कोट्यवधी रुपयांच्या इमल्याचा एका माणसाला मात्र अतिशय आनंद झाला आहे. तो म्हणजे देवेंद्रभाऊंचा जिगरी दोस्त मोहित. ही बातमी छापून आल्यापासून तो पेपर काखोटीला मारून ‘एक बंगला बने न्यारा…’ हे गाणे गुणगुणत वेड्यासारखा फेऱ्या मारत आहे. त्याला कुणीतरी सावरा. नाहीतर, उगाचच आनंदाचा झटका आल्याने लीलावतीत दाखल करावं लागेल…

दुसर प्रकरण आहे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या मुलुंडमधील! निर्मल लाईफ स्टाईलने मुलुंडमध्येच युएस ओपन हा आलीशान गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली होती. २००९/२०१०च्या सुमारास याची सुरुवात झाली. ही कंपनी सुरू झाली तेव्हा काही प्रभावशाली राजकारणी आणि त्यांचे निकटतम व्यक्ती कंपनीच्या संचालकपदी होते. मात्र जसा या कंपनीकडे येणाऱ्या पैशाचा ओघ ओसरू लागला तसे या प्रभावशाली राजकारणी व्यक्तीने कंपनीतून आपला पाय काढून/सोडवून घेतला. त्या परिसरात अनेक भेटी दिल्या. अनेक संबंधितांशी बोललो. यातून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने कळली ती म्हणजे या निर्मल लाईफ स्टाईलमध्ये एका दिवंगत राजकीय नेत्याचा पैसा गुंतला होता. त्यांच्या अचानक मृत्यूने हा वारेमाप पैशाचा ओघ अचानक संपुष्टात आला आणि युएस ओपन अक्षरशः रस्त्यावर आले.

बिल्डरने, सर्व सदनिका नोंदविणाऱ्या तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत. तुम्हाला घर मिळणार, असे मधाचे बोट लावले होते. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी फेऱ्या मारल्यानंतर हा गृहप्रकल्प शापुरजी पालनजीकडे आला. निर्मलने चालुगिरी करुन प्रकल्प शापुरजीला दिला. परंतु ग्राहकांचे लाखो रुपये मात्र त्याने सोडले नाहीत. यातूनच नवा वाद निर्माण झाला. शापुरजीनेही आपल्या एका उपकंपनीला हे काम सोपवले. झाले… घरखरेदी करणाऱ्यांची ससेहोलपट सुरू झाली. फुटबॉलसारखे त्यांना खेळवले जात आहे. अधूनमधून महारेराला दात आहेत, असे जाहीर करायला सरकार विसरत नाही. पेपरवाले विसरत नाहीत. फक्त शिंचा तो प्रॉब्लेम काही सुटत नाही, सुटलेला नाही. यावर आमचे कवीमित्र महेश केळुसकर यांच्या मुंबईवरील कवितेच्या ओळीत फेरफार करुन मी म्हणेन-

“पुनर्विकासाच्या पंगतिवर पंगती उठताहेत भराभर

घाई करतोय बिल्डर – मॅनेजर…

बिल्डर शर्ट बदलतोय सारखे

… प्रत्येक एपिसोडनंतर”

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content