Homeमाय व्हॉईसअजितदादांचे किस्से आणि...

अजितदादांचे किस्से आणि भास्कररावांची मळमळ!

विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले आणि पहिल्या दिवशीच्या कामकाजाबाबतच्या प्रथा आणि संकेतांना बगल देऊन फक्त शोकप्रस्तावाचे कामकाज केले गेले. फक्त सुरूवातीला नव्याने शपथ घेऊन उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देण्याची औपचारिकता पार पाडली गेली व थेट शोकप्रस्तावाला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे या प्रस्तावावर सर्वच सदस्यांना बोलण्याची इच्छा होती. त्यामुळे सभागृह नेत्यांनी शोकप्रस्ताव मांडायचा व तो लगेच मंजूर करायचा ही रूढ पद्धती यावेळी बाजूला ठेवली गेली. अजित पवारांचे जाणे प्रत्येकच सदस्याला चटका लावणारे होते. सर्वांनाच भावना व्यक्त करायच्या होत्या. आधी ठरले असे होते की, मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडल्यावर सर्व पक्षांचे गटनेते व प्रत्येक पक्षातील एक दोन आमदार भावना व्यक्त करतील. नंतर ठराव मंजूर होऊन दिवसाचे कामकाज संपेल. सभागृहात दादांव्यतिरिक्त दिवंगत माजी मंत्री शालिनीताई पाटील, राज पुरोहित, स्वरुपसिंग नाईक अशा अन्य मान्यवरांसाठी शोकप्रस्ताव होता.

मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या भाषणात दादांची सारी स्वभाववैशिष्ट्ये, मैत्री, निर्णयातील ठामपणा, राज्याची तिजोरी सांभळतानाही लोककल्याणाच्या योजनांना त्यांचा असणारा पाठिंबा या साऱ्याचे अचूक वर्णन करून चर्चेची दिशाच ठरवून दिली. नंतरच्या प्रत्येक वक्त्याने दादांचे त्यांना आलेले अनुभव सांगून, “एकच वादा अजितदादा!” ही घोषणा सार्थ असल्याचे दाखले दिले. दादा शब्दला पक्के होते. एकदा ठरले की त्यात काही झाले तरी बदल होणार नाही. आणि व्यक्तीगत नुकसान झाले तरीही दिलेला शब्द मोडणार नाही, हा त्यांचा खाक्या होता. फडणवीसांच्या बोलण्यातून तो विख्यात पहाटेचा शपथविधीही आला. “ते कसे घडले? तर दादांनी शब्द दिला होता. तो पाळण्यासाठी ते सरकारमध्ये आले. सरकार टिकणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले. तेव्हा मग सहकारी आमदारांच्या हितासाठी त्यांना परतीचा निर्णय घेणे भाग होते”, असे ते म्हणाले.

अजित

जयंत पाटील यांची दादांबरोबरची मैत्री 80च्या दशकातील. तेव्हाचे अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी अजित पवार, जयंतराव, दिलीप वळसे, दिलीप सोपल, आर आर आबा, अशा सभागृहात एकत्र बसणाऱ्या, चळवळ्या, बडबड्या, धडपड्या तरूण आमदारांच्या गटाला “सभागृहीतील अशांत टापू” असे नाव दिले होते. ती आठवण जयंतरावांनी करून दिली. जयंतराव तसेच छगन भुजबळ, गुलाबराव पाटील अशा अनेकांच्या भाषणात याआधीचे दिवंगत सहकारी विलासराव देशमुख, आर आर आबा, गोपीनाथराव मुंडे अशांच्याही आठवणी येत होत्या. देवेन्द्र फढणवीसांनी, “महाराष्ट्राला न लाभलेला मुख्यमंत्री” असा शब्दांत दादांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. बहुतेक सर्वच आमदरांनी कधी ना कधी दादा मुख्यमंत्री झालेच असते, अशा शब्दात त्यांना दुजोराच दिला. जयंत पाटील हे सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व अजितदादा हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले होते. तेव्हा दोघांनी राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना भेटी दिल्या होत्या. तेव्हा ऊसाची उपलब्धता नसतानाही कारखाने चालवण्याचा अट्टाहास करणाऱ्या व त्यामुळे कारखाने तोट्यात गेलेल्या संस्थांच्या प्रमुखांची कशी कानउघाडणी दादा करत होते याचे काही किस्से त्यांनी सांगितले. असाच आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा त्यांनी सांगितला. २०१४-२०१७ या काळात विरोधी पक्षात असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विरोधी पक्षीय आमदारांना घेऊन महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयांत संघर्षयात्रा काढली होती. महिनाभर सारे आमदार राज्यात बसमधून फिरत होते. सारी प्रवासाची आदी व्यवस्था विखेंनी चोख केली होती. त्याकडे लक्ष वेधून दादा जयंतरावांना म्हणाले, “आपण फक्त बसमध्ये बसतोय सारी व्यवस्था किती चोख केलीय बघा! या विखेंनाच आपल्या पक्षात ओढा, जयंतराव!”

कामकाजाच्या पद्धतींबाबत एरवी जागरुक असणारे भास्करराव जाधव यांना अजितदादांबद्दलच्या शोकप्रस्तावावर बोलताना मात्र भाषेचा, शब्दाचा तोल सांभाळता आला नाही, हे खेदजनकच होते. एरवी कदाचित स्वतः भास्कररावांनीच असे बोलणाऱ्या अन्य सदस्यांला अडवून, त्याचे चांगले कान पिळले असते. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतरचे दुसरेच वक्ते म्हणून बोलण्याची चांगली संधी भास्कररावांना मिळाली होती. या चर्चेकडे महाराष्ट्राचे लक्ष टीव्ही माध्यमांवरील लाईव्ह चित्रणामुळे लागलेच होते. पण जाधवांनी जनतेची निराशाच केली. “अजितदादा हे कसे खुनशीपणाने विरोधी आमदारांची कामे टाळत होते आणि निवडणुकांच्या वेळी कसे दादांच्या शासकीय बंगल्यावरून उमेदवारांना पैशाचे वाटप सुरु होते….” अशा प्रकारचे अश्लाघ्य, अनावश्यक आणि अशोभनीय असे उल्लेख भास्कर जाधव यांनी केले. ते असे बोलू लागले तेव्हा दिलीप वळसे पाटील आदी वरिष्ठ सदस्यांनी त्यांना थांबवले. तेव्हा ते म्हणाले की, मी ते शब्द मागे घेतो. पण लाईव्ह टीव्ही प्रसारणात बोलून गेलेले शब्द मागे कसे घेतले जातील? राज्यभरात ते तत्काळ पोहोचलेही असतील.

अजित

जाधवांनी सभागृहात सांगितलेली हकिकतही शंकास्पद वाटते. २००६नंतरच्या निवडणुकीवेळी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावरून म्हणे भास्कर जाधवांना बोलावणे गेले. ते पोहोचले तेव्हा ठरलेली वेळ टळून गेली होती. दादा वरच्या मजल्यावरील खाजगी निवासस्थानी गेले होते. अधिकाऱ्यांनी दादांना निरोप दिला तेव्हा, उशिरा आल्याबद्दल दादा फोनवरूनच ओरडले व नंतर दरडावून बोलण्याच्या शैलीत दादांनी फोनवरूनच जाधवांना सांगितले की “तुमच्यासाठी एक वस्तू ठेवली आहे. ती घेऊन जा.” ते पैशांचे पुडके होते व त्यात पंचवीस लाख रुपये होते. निवडणूकखर्चाचा तो निधी होता. पण जाधव म्हणतात की, मी आयुष्यात इतकी मोठी रक्कम बघितली नव्हती. खरेतर जाधव हे व्यावसायीक आहेत. त्यांचा ट्रक, बस वगैरे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. पंचवीस लाख बघितले नाहीत यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. मग म्हणे जाधव कालांतराने ती रक्कम दादांकडे परत करायला गेले! तेव्हा त्यांनी ती घेतली तर नाहीच उलट त्यात भर टाकून ती जाधवांनाच परत केली! यावर सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनीही कपाळावर हात मारून घेतला असेल तर नवल नाही.

जाधवांचे दुसरे म्हणणे होते की, जाधवांनी सुचवलेली कामे दादांनी केली नाहीत म्हणून त्यांनी दादांकडे जाणेच सोडले होते. २०२३मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व २०२४नंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री पवारांच्या भेटी जाधवांनी घेतल्या. सुरुवातीला दादा म्हणाले की, तुमचे काम योग्य आहे मी करून देतो. नंतर त्यांनी म्हटले की विरोधी पक्षांची कामे करायची नाहीत असे आमचे धोरण ठरले आहे. त्यामुळे मी तुम्हाला मदत करू शकत नाही. याला दादांचे कौतुक म्हणावे की, शोकप्रस्तावाच्या निमित्ताने दादांवर केलेली चिखलफेक म्हणावे, हे ज्याचे त्याने ठरवावे. खरेतर, “विरोधी पक्षांची कामे न करण्याचे सरकारचे धोरण होते किंवा कसे” हे, एकनाथ शिंदे व देवेन्द्र फडणवीसांनी स्वतः किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी वा प्रवक्त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. जर खरेच असे धोरण असेल तर विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही त्यासाठी शिंदे-फडणवीसांच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत. त्यांच्या विरोधात संसदीय आयुधेही वापरून कारवाईची धडपड करायला हवी. पण तसे काहीच दोन-तीन वर्षांत जाधव वा अन्य विरोधी पक्ष सहकाऱ्यांनी केलेले दिसले नाही.

भास्कर जाधवांची पुष्कळ इच्छा आहे, पण या अधिवेशनातही त्यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी येणे कठीणच आहे. एकतर सेना उबाठा, वा काँग्रेस वा राष्ट्रवादी श.प. कोणत्याच विरोधी पक्षाकडे नेतेपदावर अधिकार व हक्क सांगण्यासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ नाही. वीस आमदारांच्या गटाचे नेते जाधव अन्य सोळा आणि दहा आमदारांच्या गटांच्या पाठिंब्यावर विरोधी पक्षनेता बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. ज्या संसदीय प्रथा, परंपरांचा दाखला ते सभागृहात वारंवार देत असतात, नियमांचे पुस्तक फडकावत असतात, त्याच प्रथा, नियम व परंपरांमध्येही संसदेत जसे निर्णय घेतले गेले तसेच विधिमंडळातही होणे अपेक्षितच असते. ज्या पक्षाकडे विधिमंडळाच्या गणसंख्येच्या दहा टक्के इतके संख्याबळ असेल त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद दिले जाते, एरवी नाही. “महाविकास आघाडी विधिमंडळ पक्ष”, अशा नावाने लेटरहेड छापून, त्या पदावर दावा करता येणे कठीण आहे, हे भास्कररावांनाही चांगलेच माहित आहे.

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

गडकरींनी राबवले! मोदींनी रेटले!!

आखाती देशात युद्ध पेटल्यापासून जगाची चिंता वाढली आहे. गॅस आणि पेट्रोल, डीझेल यांची टंचाई केवळ भारतातच नाही तर युद्ध पेटवणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनाही जाणवू लागलेली आहे. अमेरिकन पंप तसे कोरडे वगैरे पडलेले नाहीत, पण तिथेही डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले आहेतच....

एकनाथ शिंदेंचा उधळलेला वारू रोखण्यासाठी देवाभाऊंचे ‘मिशन खरात’?

जगात "एपस्टीन" आणि राज्यात "खरात स्टिंग" अशी दोन प्रकरणा सध्या गाजत आहेत. कदाचित युद्ध सुरू आहे एपस्टीनवरून लक्ष वळवण्यासाठी. खरात स्टिंगवरून लक्ष उडवण्यासाठी एखादं दुसरे वेगळे प्रकरण घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्ध लांबले तर "घरगुती गॅसचा तुटवडा" हे...

राहुलजींची मौजमजा तर काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या नेतृत्त्वाचाच कचरा!

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचलेले शरद पवार हे त्यांच्या रा.काँ.श.प. पक्षाचे एकमेव राज्यसभा सदस्य सध्या आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे नातू पार्थ अजित पवार आणि सुनबाई सुनेत्रा हेही सध्या राज्यसभेत दिसणार आहेत. याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, धनगर नेते...
Skip to content