Homeबॅक पेजकोकणकन्येच्या सन्मानानंतर कोकणपुत्राकडे...

कोकणकन्येच्या सन्मानानंतर कोकणपुत्राकडे खजिन्याच्या चाव्या!

मुंबई महापालिकेचे महापौर म्हणून कोकणकन्या रितू तावडे यांना सन्मान मिळाला आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कोकणपुत्र प्रभाकर शिंदे यांना बहुमान प्राप्त झाला. रितू तावडे व प्रभाकर शिंदे हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेवर निवडून आले आहेत. रितू तावडे घाटकोपरमधून तर प्रभाकर शिंदे मुलुंडमधून विजयी झालेत. प्रभाकर शिंदे मुळचे चिपळूणचे असून ते पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी व महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी नवीन वर्षाचा महापालिकेचा ८० हजार ९५२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

प्रभाकर पै, हे भाजपाचे मुंबईचे पहिले महापौर झाले होते. नंतर चार दशकानंतर भाजपाने महापौरपद आपल्याकडे खेचून घेतले. तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपाला प्रथमच प्राप्त झाले आहे. रितू तावडे काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये आल्या तर प्रभाकर शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपामध्ये आले. भाजपाने त्यांना त्यांची ज्येष्ठता व अष्टपैलू कामगिरीचा आदर करून गेल्यावेळी सभागृह नेतेपदही दिले होते. यावेळी तेच मुंबईचे महापौर होतील असा सर्वांचा अंदाज होता. पण महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्याने ती संधी रितू तावडे यांना मिळाली व प्रभाकर शिंदेंना अत्यंत प्रतिष्ठेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद लाभले.

कोकण

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा ८० हजार ९५२ कोटींचा अर्थसंकल्प पंचवीस फेब्रुवारी रोजी सादर झाला. मुंबईच्या विकासकामांवर व नागरी सुविधांवर होणाऱ्या खर्चाच्या तरतुदीवर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभाकर शिंदे यांचे नियंत्रण राहणार आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा रिमोट शिंदे यांच्या हाती असणार आहे. मुंबईच्या खजिन्याच्या चाव्या कोकणपुत्राकडे, ही बाब मुंबईतील तमाम कोकणवासियांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. प्रभाकर शिंदे मुलुंड पूर्वमधील वॉर्ड क्रमांक १०६मधून निवडून आले. ते फारच कमी मताधिक्याने निवडून आले म्हणून काहींनी नाके मुरडली. पण मुंबईत पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येणे ही सोपी बाब नव्हे. जो जिता वो सिकंदर… पण मुलुंडमधे सर्वपक्षीय मैत्रीचे संबंध असे निकोप राजकीय वातावरण आहे. म्हणूनच निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मॉर्निंग वॉकला सर्वपक्षीय मित्रांनी मुलुंडच्या छत्रपती संभाजी उद्यानात त्यांचा सत्कार केला, तेव्हा शिंदेशी निकराने झुंज देणारे मनसेचे सत्यवान दळवीही तेथे उपस्थित होते.

प्रभाकर शिंदे हे संस्काराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. पण त्यांनी २०१७मध्ये शिवसेनेतून भाजपामध्ये सीमोल्लंघन केले व भाजपाचे उमेदवार म्हणून त्याच वर्षी महालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पक्ष बदलला तरी मतदारांनी त्यांनाच आपले लोकप्रतिनिधी म्हणून पसंती दिली. भाजपामध्ये गेल्यावर त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्त्वावर किंवा ठाकरेंच्या शिवसेनेवर कधी टीका केली नाही. ते आपले काम करीत राहिले व भाजपाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळत राहिले. ते उत्तम वक्ते, लढाऊ कार्यकर्ते व अभ्यासू आहेत. त्यांचे वाचन भरपूर आहे. महापालिका कायदा-नियम. पोटनियम, पंरपरा त्यांना तोंडपाठ आहे. त्यांचा पत्रव्यवहार मुद्देसूद व अचूक असतो. विविध विषयांवर केलेल्या पत्रव्यवहाराची त्यांच्याकडे अद्ययावत नोंद आहे. कार्यक्षम, तडफदार नगरसेवक अशी त्यांची जनमानसात प्रतिमा आहे. पक्षात किंवा महापालिकेत कोणतेही अधिकाराचे पद असले तरी त्याचा अहंकार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. रस्त्याने जाताना ओळखीचे लोक दिसले की आपली मोटार थांबवून त्यांची चौकशी करणारा हा लोकप्रतिनिधी आहे. पूर्व उपनगरात ज्येष्ठ नागरिकांचा आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे.

प्रभाकर शिंदे यांची चिपळूणची नाळ कायम आहे. दर एक-दोन महिन्यांनी ते गावी जात असतात. त्यांचा जन्म चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारवलेल्या शिंदे यांनी शिवसेनेत उपशाखाप्रमुख व शाखाप्रमुख म्हणूनही काम केले. दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय कामगार सेनेचे ते उपाध्यक्ष होते. १९९७मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. बेस्ट समितीचे दोन वेळा अध्यक्ष होते. शिवसेनेत असताना पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामन्याला विरोध म्हणून माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून वानखेडे स्टेडियम उखडण्याचे आंदोलन, पाम व धारा तेल आंदोलन, भाडेवाढीचा निषेध करण्यासाठी रेल रोको अशा अनेक आंदोलनात ते आघाडीवर होते. मुलुंडकर असल्याचा आपणास अभिमान आहे, असे ते आवर्जून सांगतात. महापालिका प्रशासन व जनता यांच्यातील सेतू म्हणून प्रभाकर शिंदे यांची स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून झालेली निवड सार्थ ठरावी हीच कोकणपुत्राला शुभेच्छा.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

तावडेंच्या नेमणुकीने महाराष्ट्र भाजपात ‘समझनेवालोंको’…

नितीन नबीन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल दोनशेनऊ दिवसांनी पक्षसंघटनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नव्या टीममधे पियुष गोयल, स्मृती इराणी यांचा समावेश झाला आहे. पक्षाच्या आयटी सेलच्या प्रमुखपदावरून अमित मालवीय यांची उचलबांगडी झाली असून...

पहिली असताना दुसरी, आता तिसरी.. उद्या चौथी… कोणासाठी?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलगत तिसरी मुंबई उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तिसरी मुंबई हे जागतिक दर्जाचे सर्वोत्तम केंद्र उभारण्यासाठी सिंगापूरस्थित आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने सामंजस्य करार केला. तिसऱ्या मुंबईमुळे महामुंबईच्या विकासाला...

सरसंघचालकांचा हा संवाद आधीच झाला असता तर…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत, 'इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स' या कार्यक्रमात जेन झी व जेन अल्फा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीतील युवकांना संबोधित केले. नीता आंबानी इंटरनॅशनल कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक...
Skip to content