Details
राजकीय आरोपांमुळेच सीबीआय!
21-Aug-2020
| 19
”
विजयकुमार काळे, ज्येष्ठ पत्रकार
kalevijay032@gmail.com
अखेर चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्त्याप्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच अवघ्या काही तासांच्या खलबतांनंतर महाराष्ट्र सरकारने सीबीआयच्या चौकशीस सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे जाहीर करून महाराष्ट्र, बिहार आणि केंद्र सरकार या तिघांमध्ये अधिक कटूता येऊ नये याची काळजी घेतली आहे. दरम्यान गेले महिनाभर विविध वृत्तवाहिन्यांवरून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा वा त्यांच्याविरुद्ध संशय निर्माण करण्याचे काम नित्यनेमाने केले जात होते. या निकालाने त्यांच्या कानशिलात सणसणीत लगावून दिली आहे. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू होता. परंतु दोन राज्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळेच हा तपास देशातील त्रयस्थ चौकशी यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे असे स्पष्ट प्रतिपादन न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी आपल्या 35 पानी निकालपत्रात केले आहे. निकालपत्राचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या निकालपत्रात कुणाही राजकीय नेत्याविरुद्ध संशयाची सुई दर्शविलेली नाही. खटल्याच्या सुनावणीच्या वेळीस एकाही ज्येष्ठ वकिलाने कोणाचेही नाव घेतलेले नव्हते. असे असतानाही आता निकालपत्र जाहीर झाल्यावर काही नेते राजकीय भुई बडव बडव बडवत आहेत. आता सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी गप्प बसणेच अधिक चांगले..
जून महिन्याच्या 14 तारखेला तरुण आणि उमदा अभिनेता मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या घरातच हा दुर्दैवी प्रकार घडला होता. संपूर्ण चित्रपटसृष्टी सुशांतच्या मृत्यूने हादरली होती. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे मुंबई पोलिसांनी हा मृत्यू आत्महत्त्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत तरी पोलिसांच्या या संशयावर कोणीही संशय व्यक्त केला नव्हता. वडिलांसकट त्याच्या कोणाही नातेवाईकांनी यात काही काळेबेरे आहे असे वाटले नाही. तरीही मुंबई पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या सुमारे 20 / 25 जणांची चौकशी सुरू केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि चित्रपट करकीर्दीविषयी उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. त्याच्या बँक अकाउंटमधील कोट्यवधी रुपयांना अचानक पाय फुटले. सुशांत मानसिक आजाराने ग्रासला होता. इतकेच नव्हे तर तो काळी जादू करणाऱ्या मंत्रिकाची भेट घेत होता असेही प्रकाशात आले. या कालावधीत सुशांतच्या वडिलांनी काहीच हालचाल केलेली नव्हती. ते शांतपणे आपल्या मुलाचे निधन सहन करत होते. परंतु अचानक 25 जुलै रोजी सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर नोंदवला आणि मगच राजकीय नाट्य सुरू झाले. खरे तर या दुर्दैवी प्रकरणाला राजकीय वळण देणे हे खरोखरच दूर्भाग्यपूर्ण होते व आहे.
मुंबई पोलिसांवर एक आक्षेप घेतला जात आहे की त्यांनी एफआयआर नोंदवला नाही. यावर वकिलांची मतमतांतरे असतील. परंतु माझ्या अल्पमतीप्रमाणे जर एफआयआर नोंदवला असता तर कोणालातरी अटक करावी लागली असती आणि तपास सुरू असताना अटक करणे पोलिसांच्या अंगाशी आले असते. मीडियाने धुळवड साजरी केली असती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना एक पत्र लिहून दिले आहे की सुशांतच्या पश्चात मीच त्याचा वारसदार आहे. कोणाला काही व्यवहार करायचे असतील त्यांनी माझ्याशीच थेट संपर्क साधावा. इतरांशी केलेला व्यवहार मला बंधनकारक राहणार नाही. आता बोला. या पत्राच्या खाली वडिलांची स्वाक्षरीही आहे. आता श्रीयुत सिंग सांगत आहेत की माझ्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजले पाहिजे. मग मुंबई पोलीस काही वेगळे करत होते का? सर्वोच्च न्यायालयाला तसे काही दिसले असते तर त्यांनी मुंबई पोलिसांना फटकारलेच असते. परंतु निकालपत्रात तर असे काहीच नाही. निकालपत्राचा उर्वरित भाग तांत्रिक मुद्यांनी व पूर्वीच्या खटल्यांच्या संदर्भांनी व्यापला आहे. दरम्यान ज्या पोलीसठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला तेथील पोलिसांनी काहीसा ढिसाळपणा दाखवल्यानेच हे प्रकरण हाताबाहेर गेल्याची कुजबूज आहे. हा ढिसाळपणाही वरिष्ठ पातळीवर झाल्याचे समजते. झाले गेले, गंगेला मिळाले. आता सीबीआयला निवांतपणे चौकशी करू दे. थोडा संयम सर्वांनीच दाखवला पाहिजे. विशेषतः सर्व राजकीय पक्षांनी “”condemnation before investigation is the highest form of ignorance”” हे सर्वांनीच लक्षात ठेवलेले बरे. सीबीआयनी चौकशी केलेल्या प्रकरणाचे काय होते हे वेळोवेळी दिसून आले आहेच. पण त्याबाबत पुन्हा कधीतरी..
”
SUSHANT SINGH RAJPUTMURDERSUICIDECBIMUMBAI POLICEPOLITICS

