महिला आरक्षणाशी संलग्न असलेले लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजुर करण्यासाठी सरकारला संसदेत दोनतृतियांश बहुमत गरजेचे आहे. एप्रिलमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात हेच विधेयक लोकसभेने फेटाळले. सरकारच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी मिळविण्यात सरकारला अपयश आले होते. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाअगोदर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाईल का? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सरकारला वाट्टेल ते करून मंजूर करून घ्यायचे आहे. आता आमच्याकडे दोनतृतियांश बहुमत आहे, असा दावा सरकारमधील काही मंत्री करीत आहेत. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक महिला आरक्षणाशी संलग्न करण्यात आले आहे. खरेतर ३३ टक्के महिला आरक्षणाचे विधेयक अगोदरच मंजूर झाले आहे. पण महिला आरक्षण विधेयकाला जोडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करण्यात सरकारने मखलाशी केली आहे. विरोधी पक्षांचा आक्षेप मतदारसंघ पुनर्रचनेला आहे. पण विरोधी पक्ष महिला आरक्षणाला विरोध करीत आहे, असा प्रचार भाजपाने चालवला आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकानुसार देशात सध्या लोकसभेचे ५४३ मतदारसंघ आहेत, ते नंतर ८५० होतील. देशात लोकसंख्या बरीच वाढली, मतदारांची संख्याही खूप वाढली, एकेका मतदारसंघात अठरा ते पंचवीस लाख मतदार झाले. मतदारसंघांचे आकारही अवाढव्य आहेत. खासदाराला मतदारांशी नियमित संपर्क साधणेही कठीण झाले आहे. म्हणूनच बदललेल्या काळानुसार मतदारसंघ वाढविणे गरजेचे आहे. मोदी सरकारने यावर्षी १६ ते १८ एप्रिलदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून हे विधेयक मांडले होते. पण विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका व एकजूट यामुळे विधेयक मंजुर होऊ शकले नाही. महिला आरक्षणाचे नाव पुढे करून सरकारला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घ्यायचे आहे, असा स्पष्ट आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. हे विधेयक मंजूर झाले तर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा दुप्पट होतील असे सरकार सांगत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश. राजस्थान, दिल्ली, हरयाणा, छत्तीसगड. उत्तराखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र अशा राज्यांत भाजपाचे सरकार आहे. या राज्यांत भाजपाने आपला पाया भक्कम केला आहे. उत्तर भारतात लोकसभेच्या जागा जास्त आहेत. तिथे दुप्पट जागा झाल्यानंतर त्याचा लाभ भाजपालाच होणार आहे. याउलट दक्षिणेकडील राज्यांत भाजपा कमजोर आहे. त्या राज्यांत लोकसभेच्या जागाही तुलनेने कमी आहेत. त्यामुळे मतदारसंघ दुप्पट झाले तरी हिंदी भाषिक राज्यांच्या तुलनेने दक्षिणेतील राज्यांच्या जागा कमी असणार आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर-दक्षिण अंतर वाढणार आहे, त्याचा लाभ भाजपालाच मिळणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना व महिला आरक्षण हे २०२९च्या लोकसभा निवडणुकीपासूनच अंमलात आणण्याची भाजपाची योजना आहे. म्हणूनच संसदेच्या येणाऱ्या किंवा विशेष अधिवेशनात मतदारसंघ व महिला आरक्षण असे दुहेरी पॅकेज असलेले विधेयक मंजूर करून घेणे ही सरकारची मोठी कसोटी आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेसाठी घटनादुरूस्ती आवश्यक आहे. म्हणूनच विधेयक मंजुर करण्यासाठी दोनतृतियांश बहुमत गरजेचे आहे. लोकसभेत मतदानाच्या वेळी सर्व ५४३ खासदार उपस्थित असतील तर विधेयक मंजुरीसाठी ३६२ जणांचे मतदान अनुकूल पडले पाहिजे. एप्रिल महिन्यात झालेल्या विशेष अधिवेशनात याच विधेयकाच्या बाजुने २९८ मते पडली तर विरोधात २३० मते नोंदवली गेली. गेल्या सहा महिन्यांत सरकारच्या बाजूने असलेल्या खासदारांची संख्या वाढली आहे. पण दोनतृतियांश बहुमताएवढी झालेली आहे का, याचे मात्र स्पष्ट उत्तर मिळत नाही. लोकसभेत सत्ताधारी भाजपाप्रणित एनडीएसोबत असलेल्या खासदारांची संख्या आता ३१८वर पोहोचली आहे. २०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे २४० खासदार निवडून आले होते. अब की बार चार सौ पार, या भाजपाच्या वल्गनेला निकालाने मोठा धक्का बसला. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशमचे १६, नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे १२, शिवसेना शिंदे गटाचे ७, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे ५ व काही अपक्षांना बरोबर घेऊन एनडीएने बहुमताची संख्या ओलांडली व लोकसभेत एनडीएकडे खासदारांची संख्या २९२ झाली. एकेकाळचे भाजपाचे विरोधक असलेल्या नीतीश कुमार व वंद्राबाबू नायडूंच्या कुबड्या घेऊन भाजपाला केंद्रात सरकार स्थापन करावे लागले. अन्य पक्षातील खासदार खेचून आणल्याशिवाय एनडीए भक्कम होणार नाही, हे भाजपाला कळून चुकले. म्हणून भाजपाच्या विरोधात निवडून आलेल्या खासदारांना वश करून आपली संख्या वाढविण्याची खेळी चालूच ठेवली.
मे महिन्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका झाल्या. वाट्टेल ते करून ममता बॅनर्जी यांना सरकारमधून हटवायचे यासाठी भाजपाने चंग बांधला होता. केंद्रीय सुरक्षा दलाच्या फौजा बंगालमध्ये तैनात केल्या होत्या. कित्येक लाख मतदार मतदारयादीतून अपात्र ठरवले गेले. विधानसभा भाजपाच्या ताब्यात आली. राज्यात प्रथमच भाजपाचे सरकार स्थापन झाले. मग तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना बाहेर काढणे सोपे झाले. जे ममता यांच्याशी निष्ठावान होते ते बावीसपैकी वीस खासदार पक्षातून बाहेर पडले. ते थेट भाजपामध्ये गेले नाहीत. स्वतंत्र पक्ष स्थापन केला नाही तर देशात कोणालाही ठाऊक नसलेल्या नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टीत सामील झाले. या पक्षाचे समर्थन भाजपाला आहे. भाजपाच्या सल्लामसलतीशिवाय तृणमूलचे खासदार एवढ्या संख्येने नवोदित पक्षात जाऊ शकतात का? परिणामी एनडीएची लोकसभेतील संख्या वाढली. जून महिन्यात उबाठा सेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनीही शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांचा पक्ष एनडीएमध्ये आहे. त्यामुळे एनडीएच्या खासदारांची संख्या ३१८ वर पोहोचली. आसाममधील पोटनिवडणुकीत भाजपाचा खासदार निवडून आला. त्यामुळे आणखी एकने संख्या वाढली.

अजूनही ३६० आकडा गाठण्यासाठी भाजपाचा एमके स्टॅलिन यांचा द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), अखिलेश यादव यांचा सपा आणि झारखंड मुक्ती मोर्चावर डोळा आहे. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उत्तर प्रदेशातील जागा दुप्पट म्हणजे तुलनेने सर्वाधिक वाढणार आहेत. मग ३७ खासदारांच्या पक्षाचे प्रमुख असलेले अखिलेश यादव विरोध कसा करू शकतील? महिला आरक्षण ५० टक्के करणार याची हमी द्या, असे सुप्रिया सुळे म्हणत आहेत. विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एक खिडकी खुली ठेवली आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरीसाठी सरकारला लोकसभेत आणखी ४० तर राज्यसभेत ८ खासदारांचे समर्थन मिळवायचे आहे. राज्यसभेत द्रमुकचे ९, वायएसआर काँग्रेसचे ४ व बिजू जनता दलाच्या ५ खासदारांवर भाजपाचे लक्ष आहे. एप्रिल २०२६मध्ये आपच्या राज्यसभेतील ७ खासदारांनी भाजपामधे प्रवेश केला व नंतर तृणमूलचे तीन खासदार भाजपात दाखल झाले. मतदारसंघ पुनर्रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांत सध्या २०७ लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांची संख्या ३११ होईल व दक्षिणेतील राज्यात १३२ लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यांची संख्या १९८ होईल. २०२९च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना भाजपाला आवश्यक वाटते आहे. त्यासाठी हा सारा आटापिटा चालला आहे, हे मात्र निश्चित!
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

