Homeमाय व्हॉईसकायम गृहित धरू...

कायम गृहित धरू नका.. मतदारांचा भाजपाला संदेश!

केंद्रात भाजपाप्रणित एनडीएचे सरकार आणि राजस्थानात भाजपाचे सरकार आहे. विधानसभा निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक, भाजपाच्या प्रचाराचा जोर नेहमीच डबल इंजिन सरकावर असतो. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकासाला गती मिळते, असे भाजपा ठसवून सांगत असते. राज्यातील निव़डणुकांमध्ये डबल इंजिन सरकारचा भाजपाला राजकीय लाभ मिळतो. मात्र राजस्थानात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत तेथील मतदारांनी डबल इंजिनला नाकारले. ग्रामीण भागात काँग्रेसची सरशी झाली आणि भाजपाची पिछेहाट झाली. राजस्थानमधील ग्रामीण जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवला. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर काँग्रेसने वर्चस्व प्राप्त केल्याने मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राजस्थानमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाची फार मोठी पिछेहाट झाली आहे. मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. तीन वर्षांपूर्वी याच राज्यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, जिकडेतिकडे भाजपा, असे वातावरण निर्माण झाले. पंजाला हटवून कमळ आले. मग, आता ग्रामीण भागातील मतदार भाजपाला का कंटाळला? भाजपाला का नाकारले? मोदींचा करिष्मा का चालला नाही? थेट मुख्यमंत्रीपदावर बसवलेल्या भजनलाल शर्मांचे नेतृत्त्व जनतेला पसंत पडले नाही का? या प्रश्नांचे आत्मचिंतन करण्याची वेळ भाजपावर आली आहे. देशात भाजपाविरोधात नकारात्मक भावना निर्माण होत आहे, त्याचा अंदाज पक्षनेतृत्त्वाला आला नव्हता का? देशात एकवीस राज्यांत भाजपा सत्तेवर आहे. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा येथे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींची तयारी भाजपा जोरात करीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर भाजपाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. पंबाजमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपाचे आयटी सेल आटापीटा करीत आहेत. नेमके अशावेळी राजस्थानच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पराभव हा भाजपा व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासाठी वाईट व धक्कादायक घटना आहे.

भाजपा

मतदारांना कायमचे गृहित धरून चालत नाही, हा संदेश पुन्हा एकदा राजस्थानने दिला आहे. एवढेच नव्हे तर भाजपाचे दिग्गज नेते जे सत्तेच्या परिघात मोठमोठ्या पदांवर आहेत, त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसने शिरकाव केला आहे. यापुढील राज्याची विधानसभा निवडणूक सोपी नाही, हाच संदेश भाजपाला या निकालाने दिला आहे. राजस्थानमधील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील काँग्रेसला मिळालेला हा प्रचंड विजय भाजपाला मुळीच अपेक्षित नव्हता. निकाल लागलेल्या ३७पैकी २३ जिल्हा परिषदांवर काँग्रेसने आपला झेंडा फडकवला. केवळ ६ जिल्हा परिषदांवर भाजपाला विजय मिळाला आहे. विरोधी पक्षाने पंचायत समित्यांमध्ये भाजपाच्या तुलनेने जवळपास ७० टक्के जागांवर कब्जा केला आहे. पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रसचे राज्यात ३, ७५८ सदस्य निवडून आले तर भाजपाचे २, २१३ सदस्य विजयी झाले. जिल्हा परिषदांमध्ये विरोधी पक्षांचे ७९४ सदस्य निवडून आले तर भाजपाचे ३५७ विजयी झाले. राज्यातील ३७ जिल्ह्यांत पंचायत समित्यांवर ७५४३ जागा आहेत तर जिल्हा परिषदांमध्ये १२७५ जागांसाठी निवडणूक झाली होती. अन्य चार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी नंतर होणार आहे.

सन २०२०-२१मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची निवडणूक झाली होती. पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला ३९.५४ टक्के मते मिळाली तर भाजपाला ३८.०६ टक्के मते मिळाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत तेव्हा काँग्रेसला ४२.५९ टक्के मते मिळाली तर भाजपाला ४२. ४२ टक्के मते प्राप्त झाली होती. राजस्थानात काँग्रेस व भाजपा हे पक्ष एकमेकांचे परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. यावर्षी दोनच महिन्यांपूर्वी राजस्थानात महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस यांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ ०.९१ टक्के एवढेच अंतर होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आणखी मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेस बाळगून होती. जयपूरमधील संगनेर हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा याचा विधानसभा मतदारसंघ आहे. संगनेर पंचायत समितीच्या १५पैकी ८ जागांवर हनुमान बेनीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने विजय मिळवला. काँग्रेस व भाजपाच्या पदरात प्रत्येकी तीन जागा पडल्या. मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या भरतपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने ३१पैकी २१ जागांवर विजय मिळवला. भाजपाने ९ जिंकल्या तर १ जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला मिळाली. राज्याचे नगरविकास व गृहनिर्माणमंत्री जाबरसिंग खर्रा यांच्या पत्नीसह परिवारातील चौघांचा श्रीमाधोपूर पंचायत समितीत पराभव झाला. भाजपामधील घराणेशाहीला मतदारांनी धडा शिकवला. कॅबिनेट मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या मतदारसंघातील झोलवारा पंचायत समितीत भाजपाला १५पैकी एकाच जागेवर जेमतेम विजय मिळाला. चुरूमध्ये भाजपाचे मंत्री राजेंद्र राठोड यांनी त्यांचा मुलगा व सून यांच्या प्रचारासाठी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी कलमा पढला होता. पण जिल्हा परिषदेत काँग्रेसला बहुमत मिळाले.

भाजपा

नागौर जिल्हा परिषदेत राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने आश्चर्यकारक यश मिळवले. जिल्हा परिषदेच्या ३७पैकी १९ जागा या पक्षाने जिंकल्या. काँग्रेसने ११ जागांवर तर भाजपाने ७ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे जिल्हा परिषदांमध्ये ५१ व पंचायत समित्यांमधे ४९७ सदस्य निवडून आले आहेत. राज्यातील एकूण ४१ जिल्ह्यांत २ कोटी ७० लाख मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत काँग्रेसला कौल दिला आहे. या निकालाकडे दुर्लक्ष करणे भाजपाला परवडणार नाही. राज्यातील दिग्गजांना दूर ठेवून प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांना थेट मुख्यमंत्री करण्याचा मोदी-शाहंचा निर्णय चुकला तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राजस्थानमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालांचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते नेते राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे यांनी स्वागत केले आहे. भाजपा सरकारने पंचायत समित्यांचे अधिकार कमी केले. त्यामुळे ग्रामीण जनतेने भाजपाला नाकारले असे त्यांनी म्हटले आहे. चलनवाढ, बेरोजगारी, स्थलांतर या मुद्यांकडे भाजपाने दुर्लक्ष केले म्हणून मतदारांनी त्यांची भाजपावरील नाराजी मतदानातून व्यक्त केली, असे काँग्रेसने म्हटले आहे. भाजपाचे दिवस भरले आहेत, भाजपाने आता गाशा गुंडाळण्याची तयारी करावी, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सर्वमान्य व भक्कम नेतृत्त्व नसेल तर केवळ मोदींच्या करिष्म्यावर लोक मतदान करणार नाहीत, हा संदेश या निकालाने दिला आहे.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘महानंद’प्रमाणे ‘गोकुळ’ केंद्राच्या घशात घालण्याचा डाव?

कोल्हापूर जिल्हा दूध महासंघ म्हणजेच गोकुळ, या दूध महासंघावर वाट्टेल ते करून कब्जा मिळवायचा, हे महायुती सरकारने ठरवलेलेच होते. राज्याची सत्ता आहेच. जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगर परिषदांची सर्वाधिक सत्ता आज भाजपाकडे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

मजबूर धनखडांना सन्मान देण्यामागचा संघाचा हेतू तो कोणता?

जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांचे नागपूर येथील दसरा मेळाव्यातील भाषण समाजासाठी व सरकारसाठीही मोलाचे आहे. केंद्रात गेली बारा वर्षांहून अधिक काळ भाजपाप्रणित एनडीए सरकार आहे. एकवीस राज्यांत भाजपा सत्तेवर आहे. सतरा...

शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतला दसरा मेळावा आणि आता…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेनेचे स्थापना केली. याच शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी दादर येथील शिवाजीपार्क मैदानावर झाला. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्क गर्दीने ओसंडून वाहत होते. यावर्षी २०...
Skip to content