संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. दहावीत शिकणाऱ्या निधी पावसकर या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी नुकतीच सुपूर्द केली. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित भेटीदरम्यान तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मदतनिधी सुपूर्द केला. तिचे वडिल मिरर महाराष्ट्र तसेच गोरेगाव मिररचे संपादक महेश पावसकर तसेच तिचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लागावा, या संवेदनशील हेतूने तिने वर्षभरात आपल्या पिगी बँकेत खाऊ आणि इतर खर्चातून वाचवलेली रक्कम या निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिच्या या संवेदनशीलतेचे आणि समाजसेवेच्या वृत्तीचे विशेष कौतुक केले. “कमी वयात दुष्काळग्रस्तांसाठी दाखवलेली ही आपुलकी आणि दिलेले योगदान समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

